एकविसाव्या शतकातही राजेशाही टिकून आहे, ती अर्थातच नामधारी. त्या नामधारी राजेशाहीच्या नामावळीत स्पेनचे राजे म्हणून सहावे फिलिप यांचे नावही आता घेतले जाईल. शुक्रवारीच फिलिप यांचे वडील युआन कालरेस यांनी स्पेनची सूत्रे त्यांच्याकडे दिली. स्पेनची राजेशाही ही १९७८च्या घटनादुरुस्तीमुळे घटनात्मक पदासारखी आहे. पण राजाला त्याचा उत्तराधिकारी म्हणून त्याच्या अथवा अन्य राजघराण्यातील व्यक्तीचे नाव सुचवण्याचा अधिकार आहे, पण राजाने सुचवलेले नाव स्पॅनिश लोकप्रतिनिधीगृहाने मान्य केल्याखेरीज या नियुक्तीवर शिक्कामोर्तब होत नाही. ही काहीशी आधुनिकतावादी प्रथा युआन कालरेस यांच्या कारकिर्दीत सुरू झाली. त्यांच्याच मावळतीला, ‘लोकप्रतिनिधीगृहास राजा-निवडीचा अंतिम अधिकार’ हा कसा औपचारिकच आहे हेही दिसून आले. कारण १९७८ची घटनादुरुस्ती होण्याआधीच, २२ जानेवारी १९७७ रोजी कालरेस यांनी फिलिप यांना युवराज म्हणून घोषित करून टाकले होते. आंतरराष्ट्रीय राजकारण व राजनीतीचा रीतसर अभ्यास करून द्विपदवीधर झालेले आणि स्पेनच्या वतीने रशिया आदी देशांशी चर्चा करण्यात यापूर्वीही अग्रेसर असलेले फिलिप यांच्या नावाबद्दल कुणाला कधी तक्रार नव्हती. पण २ जून रोजी कालरेस यांनी राजेपद सोडण्याचे जाहीर केल्यावर लगोलग आठवडाभरात लोकप्रतिनिधीगृहाने पावले उचलली, हे काही टीकाकारांना खुपले. या टीकेस उत्तर देण्याच्या फंदात न पडता, स्पेनचे नवे राजे फिलिप यांनी देशापुढील आर्थिक आणि अन्य प्रश्नांना पहिल्याच भाषणात हात घातला.
स्पेन २०१० मध्ये जवळपास दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर पोहोचला होता. त्यातून मोठय़ा प्रमाणावर लोकक्षोभही उसळला होता. तो आता शमला असताना, लोकक्षोभ हे समस्यांवरील उत्तर नसते आणि ऊर्जितावस्थेसाठी सर्वाचे एकदिलाने प्रयत्न आवश्यक असतात, याची आठवण फिलिप यांनी दिली. कॅटलोनिया आणि बास्क प्रांत स्पेनपासून फुटून वेगळय़ा राष्ट्राची मागणी करीत आहेत, त्याचा थेट उल्लेख टाळून त्यांनी बहुविधता टिकवूनच एकसंध स्पेन प्रगतीकडे झेपावेल, अशी घोषणा केली.
आपल्या राष्ट्रपतींप्रमाणे स्पेनच्या राजाकडे, तिन्ही सेनादलांचे सर्वोच्च प्रमुखपद असते. आर्थिक निर्णय घेण्याचे प्रत्यक्ष अधिकार मात्र त्याच्याकडे नसतात. नवे राजे फिलिप हे सुविद्य आहेत, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा त्यांना अनुभव आहे आणि अनेक संस्थांना त्यांचा आश्रय आहे, यात नवल नाही. मात्र, सहा फूट सहा इंच उंचीच्या आणि अवघ्या ४६ वर्षे वयाच्या या राजाने युवराजपदी असताना १९९२ मध्ये बार्सिलोना ऑलिम्पिकच्या नौकानयन (यॉटिंग) स्पर्धेत सांघिक गटात सहभाग नोंदवला होता! स्पेन त्या स्पर्धेत सहावा आला.