क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो; पण तो जिवावर बेतणारा होता का कधी? महान फलंदाज ब्रायन लाराच्याच शब्दांत सांगायचे तर, क्रिकेट हा ‘धोकादायक’ खेळ आहे. हे खरे की, १९३२ मध्ये शरीरवेधी गोलंदाजी करण्याची ‘बॉडीलाइन’ रणनीतीसुद्धा याच खेळातली. वेस्ट इंडिजचे तेजतर्रार गोलंदाज एके काळी आग ओकायचे, असे म्हटले जाते; परंतु आता विंडीजचा मारा बोथट झाला आहे. कालांतराने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नियमांच्या चौकटीने गोलंदाजांवर अंकुश ठेवण्यात आला; पण फिलिप हय़ुजेसच्या निधनामुळे अवघे  क्रिकेटविश्व हादरले आहे. जगभरातील क्रिकेट सामने थबकले आहेत. सर्वमान्य धारणा अशी की, क्रिकेट हा तसा अतिशय सुरक्षित खेळ. हेल्मेटपासून लेग पॅड, शूजपर्यंत अगदी आपादमस्तक ‘गार्ड’ वा ‘पॅड’सारख्या संरक्षक सामग्रीसह खेळता येणारा खेळ. त्यामुळे अपघाताची शक्यता अत्यंत कमी. १९९८ मध्ये भारतीय क्रिकेटपटू रमण लांबाचासुद्धा क्षेत्ररक्षण करताना चेंडू डोक्याला लागल्यामुळे मृत्यू ओढवला होता; परंतु लांबाने फॉरवर्ड शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण करताना हेल्मेट न वापरण्याचा निष्काळजीपणा केला होता. हय़ुजेस मात्र सुरक्षेच्या सर्व सामग्रींसह खेळत होता. आता ‘मसुरी’ नामक हेल्मेटनिर्मिती कंपनीने, हय़ुजेसने वापरलेले हेल्मेट हे पुरेसे अद्ययावत नव्हते, असे स्पष्टीकरण घाईघाईत केले आहे. सीन अ‍ॅबोटचा उसळणारा चेंडू चुकवताना हय़ुजेसने नजर चुकवली आणि चेंडू त्याच्या डोक्याच्या मागल्या बाजूला लागला. जखमी हय़ुजेस दोन दिवसांनी हरपला, मात्र त्याला मार लागताच ऑस्ट्रेलियाची आपत्कालीन यंत्रणा कार्यरत झाली होती. दोन रुग्णवाहिका व एक हेलिकॉप्टर त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी विद्युतवेगाने तिथे सज्ज झाले. शेफिल्ड शील्ड या तेथील राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत ही घटना घडली. भारतात रणजी सामन्यांनासुद्धा रुग्णवाहिका उपलब्ध नसते. याशिवाय राष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट सोडले, तर देशात अन्य क्रिकेट स्पर्धाना अद्ययावत सुरक्षासामग्रीचा वापर केला जातो का, हा प्रश्नच. त्यामुळे आयसीसी आणि राष्ट्रीय क्रिकेट संघांचे डोळे आता तरी उघडोत. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील  कसोटी मालिका आठवडय़ावर येऊन ठेपली आहे. मायकेल क्लार्क दुखापतीने खेळू शकणार नसताना त्याची जागा हय़ुजेस भरेल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला वाटत होते; परंतु उमेदीच्या पंचविशीतल्या हय़ुजेसला काळानेच ऑस्ट्रेलियाकडून हिरावून नेले आहे. पाच वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने २६ कसोटी आणि २५ एकदिवसीय सामन्यांत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. वयाच्या १२व्या वर्षीपासून क्रिकेटच्या मैदानावर कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या हय़ुजेसने रग्बी खेळातही आपले नैपुण्य दाखवले आहे. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना पुढे ढकलण्यात यावा, असे आवाहन केले आहे; परंतु ऑस्ट्रेलियाला ‘शो मस्ट गो ऑन’ हे ब्रीदवाक्य जपत पहिल्या कसोटीसाठी सज्ज व्हावे लागणार आहे. गेल्या महिन्यात फॉम्र्युला-वन ड्रायव्हर ज्युलेस बियांचीचा गंभीर अपघात झाला होता. तो कोमातून बाहेर आला असला तरी पूर्ण सावरलेला नाही. काही दिवसांपूर्वी बॉक्सिंगसारख्या खेळातही डोईसंरक्षक हेडगार्ड वापरणे बंद करण्यात आले आहे. खेळ म्हटले की स्पर्धा आली. जिंकण्याची ईर्षां आली. लांबा, हय़ुजेसप्रमाणे आणखी काही क्रिकेटपटू आणि पंचांचा मैदानावरील घटनांमुळे मृत्यू झाला आहे. अर्थात, यात निव्वळ अपघातांची संख्या अधिक आहे. तूर्तास तरी हय़ुजेसमुळे बसलेल्या धक्क्यातून क्रिकेटविश्वाने सावरण्याची व त्यातून धडा घेऊन सुरक्षासामग्री आधुनिक करण्याची, सक्षम आपत्कालीन व्यवस्थापन राबवण्याची गरज आहे.