तालेवार नेत्यांच्या जिल्ह्य़ात उच्चवर्णीय तरुणीच्या प्रेमात पडल्याची शिक्षा म्हणून दलित तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह झाडावर लटकत ठेवण्याची तालिबानी मुजोरी, पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक होणाऱ्या स्त्रीभ्रूणहत्या, राज्याला चार मुख्यमंत्री देणारा मराठवाडा वीजगळतीमध्ये अव्वल.. उठताबसता फुले-आंबेडकरांच्या नावाचा जप करणाऱ्या राज्यकर्त्यांना ही सामाजिक विषवल्ली ठेचता न येणे हे दुर्दैवच!
एखाद्या प्रदेशाचे नेतृत्व जितके वांड तितका तो प्रदेश सभ्यता आणि सुसंस्कारिततेच्या पातळीवर उनाड हे महाराष्ट्राचे वर्तमान आहे. व्यक्तीप्रमाणे प्रदेशाची सभ्यता कशी मोजावी याचेही काही मापदंड असतात. या निकषांत महिलांना, अबलांना मिळणारी वागणूक हा जसा मुद्दा येतो तसेच घेतलेल्या सेवेचे मोल मोजण्याची सभ्यता त्या प्रदेशात आहे की नाही, हेही तपासता येते. त्याचमुळे महाराष्ट्रातील जो प्रदेश दांडग्या नेतृत्वासाठी ओळखला जातो त्याच प्रदेशात स्त्री भ्रूणहत्या सर्वाधिक नोंदविल्या जातात हे जसे समजून घ्यावयास हवे तसेच सर्वाधिक वीजचोरीही महाराष्ट्रातील अत्यंत तगडय़ा नेत्यांच्या प्रदेशातूनच होते, याचाही अर्थ आपण जाणून घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील हे प्रदेश आणि त्यातून येणारे नेतृत्व अनुत्तीर्ण ठरेल अशी आणखी एक दुर्दैवी बाब समोर आली आहे. ती म्हणजे प्रेमप्रकरणातून दलितांच्या हत्या आणि त्यातून दिसणारी सवर्ण म्हणवून घेणाऱ्यांची मुजोरी. दलित तरुणाने उच्चवर्णीय तरुणीच्या प्रेमात पडण्याची जुर्रत केली म्हणून या तरुणास भरदिवसा, भर गावात ठार करून त्याचे प्रेत झाडावर लटकत ठेवण्याची तालिबानी मुजोरी राज्यातील पुढाऱ्यांची बजबजपुरी असलेल्या अहमदनगर जिल्हय़ातील सवर्णानी दाखवली असून या घटनेने साऱ्या राज्याची मान शरमेने खाली जावयास हवी. आतापर्यंत हिंदी चित्रपटांतून मागास जमीनदारी वृत्तीच्या उत्तर भारतात घडणारे प्रसंग वर्तमानातील महाराष्ट्रात घडताना दिसतात. त्यामुळे उठता बसता फुले, आंबेडकर यांचे नाव घेणारे नेतृत्व या महाराष्ट्रास कोणत्या दिशेने घेऊन निघाले आहे, याचा अंदाज येऊ शकेल.    
हा घृणास्पद प्रकार नगर जिल्हय़ातील खर्डा या खेडय़ात घडला. या गावातील एका मागास तरुणाचे मन त्याच्याच वर्गातील एका तरुणीवर जडले. या तरुणाच्या दुर्दैवाने ही तरुणी कथित उच्चवर्णीय होती आणि हा वर्णसंकर तिच्या कुटुंबीयांना अमान्य होता. परिणामी या तरुणीच्या तरुण भावाने आपल्याच जातीजमातीच्या अन्यांना हाताला धरून या मागास तरुणाच्या शाळेत जाऊन त्याला बेदम मारहाण करीत त्याचा जीव घेतला. या सवर्णाचा उद्दामपणा इतका की त्यांनी नंतर या मागास जातीतील तरुणाची गळा आवळून हत्या केली आणि त्याचे पार्थिव झाडावरून लोंबकळत ठेवले. असे करण्यामागे त्यांचा हेतू सदर तरुणाने आत्महत्या केली असे दाखवण्याचा होता, असे सांगितले जाते. ते असत्य आहे. त्या तरुणाचा मृत्यू ही हत्या नाही तर आत्महत्या आहे असेच भासवण्याची त्यांची इच्छा असती तर त्यांनी भर दिवसा, सर्वाच्या देखत त्याची हत्या केली नसती. ती त्यांनी केली आणि वर त्याचे प्रेत टांगून ठेवले या मागे एकच हेतू असू शकतो. तो म्हणजे दहशत पसरवणे आणि ‘बघा.. आम्ही काय करू शकतो’ हे इतरांना दाखवणे. केवळ जातीच्या जोरावर मस्तवाल झालेल्या या तरुणांना ही अत्यंत नीच कृती करताना जराही लाज वाटली नसेल तर त्यामागे एक कारण आहे. ते म्हणजे अशा कृत्यांचा नगर जिल्हय़ाचा अलीकडचा इतिहास. गेल्याच वर्षी याच जिल्ह्य़ातील सोनई गावातील सवर्णानी तीन तरुणांची ऊस कापण्याच्या यंत्रातून खांडोळी करून त्यांच्या देहाचे तुकडे गावच्या गटारांत टाकलेले आढळले होते. यापैकी एका तरुणाचे पाप हेच की त्याने सवर्ण तरुणीवर प्रेम केले. त्याचा फारच बभ्रा झाल्यावर लाजेकाजेस्तव सरकारने जाग आल्यासारखे दाखवले आणि काही किरकोळ कारवाई केली. पण ती फक्त सरकार नावाची व्यवस्था जिवंत आहे हे सिद्ध करण्यापुरतीच हे त्याचवेळी स्पष्ट झाले. कारण पुढे काहीच घडले नाही आणि सरकारही पुन्हा आपल्या कायमस्वरूपी निद्रितावस्थेत गेले. सोनई गावातील तरुण हे करण्यास धजावले कारण त्यांच्यापुढे कोठेवाडीचे उदाहरण होते. १३ वर्षांपूर्वी- २००१ साली याच नगर जिल्ह्य़ातील कोठेवाडीने अत्यंत नृशंस बलात्कार प्रकरण पाहिले. पोटाची खळगी भरण्यासाठी ऊस तोडणी करणाऱ्या कामगारांची वस्ती या प्रकारात हल्लेखोरांनी जाळपोळ करून उद्ध्वस्त केलीच. परंतु सामुदायिक पाशवी बलात्कारांनी त्यांनी त्या वस्तीतील महिलांचे आयुष्यही बेचिराख केले. त्या प्रकरणाची दखल घेण्यातदेखील सरकारी अनास्था इतकी होती की पहिली दोन-अडीच वर्षे या संदर्भातील खटला देखील उभा राहिला नाही. नागरिक, स्वयंसेवी संस्था आदींकडून फारच आरडाओरडा झाल्यावर याप्रकरणी तपास झाला आणि जवळपास दशकभरानंतर संबंधित गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा झाली. तेव्हा या असल्या घृणास्पद गुन्हय़ांची चौकशी करून त्यास जबाबदार असणाऱ्यांना योग्य ते शासन व्हावे यासाठी सरकार किती जागरूक आहे, ते या उदाहरणातून कळावे. सरकारच्या या लौकिकामुळेच या असल्या नतद्रष्टांचे फावते आणि कायदा हाती घेण्यात त्यांना काही वाटत नाही. त्यातही पुन्हा त्यामागे जातीपातीचे क्षुद्र राजकारण असते आणि अन्याय करणारा आणि ज्याच्यावर झाला आहे तो यांच्या जातींवर प्रकरणाचा तपास कसा, किती आणि कोणत्या दिशेने होईल हे ठरत असते. या खेपेसदेखील काही वेगळे होईल असा आशावाद बाळगण्याचे कारण नाही.    
वास्तविक नगर जिल्हा हा तालेवार राजकीय घराण्यांचा. महाराष्ट्रातील राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले वा त्या केंद्रानजीक असलेले विखे पाटील, थोरात, गडाख, काळे असे एकापेक्षा एक नेत्यांचे नगर हेच माहेर. त्यामुळे तर हे आणि असे गुन्हे हे अधिकच लांच्छनास्पद ठरतात. परंतु आपल्या जिल्ह्य़ातील या सामाजिक वास्तवाची चाडही सदर नेत्यांना नाही. इतके ते आपापली साम्राज्ये उभारण्यात आणि इतरांच्या साम्राज्यात कसे अडथळे आणता येतील ते पाहण्यात मशगुल आहेत. शिवपूर्वकालीन सुभेदारांप्रमाणे आपापले प्रदेश या नेत्यांनी बटीक ठेवल्यासारखे राखले असून तेथील सामाजिक उलथापालथीत त्यांना यत्किंचितही रस नाही. या नेत्यांचे लक्ष आहे ते फक्त त्यांच्या त्यांच्या आर्थिक साम्राज्यांवर. ठिकठिकाणच्या या सुभेदारी नेतृत्वास विशिष्ट सामाजिक, जैविक पाश्र्वभूमी आहे. त्याचाही दुष्परिणाम संबंधित प्रदेशातील जातीच्या उतरंडीवर होत असून ही परिस्थिती बदलण्याचे सामाजिक औदार्य या नेत्यांच्या अंगी नाही. त्याचमुळे पश्चिम महाराष्ट्रातील एकापेक्षा एक तगडय़ा नेत्यांच्या जिल्ह्य़ांत सर्वाधिक स्त्री भ्रूणहत्या होतात आणि अनेक माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री ज्या जिल्ह्य़ांतून येतात त्याच मराठवाडय़ातील जिल्ह्य़ांत सर्वाधिक वीजगळती होते. त्याचमुळे हे सर्व लाजिरवाणे ठरते ते उठताबसता फुले, आंबेडकर, शाहू छत्रपतींची नावे घेणाऱ्या राज्यकर्त्यांसाठी. सरकारात त्यातल्या त्यात संवेदनशील असणाऱ्या आणि संत गाडगेबाबांच्या नावे स्वच्छता मोहीम काढणाऱ्या गृहमंत्री आर आर आबा पाटील यांना जसे ही सामाजिक अस्वच्छता साफ करणे जमलेले नाही तसेच पारदर्शी कारभाराचा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनादेखील ही सामाजिक विषवल्ली ठेचता आलेली नाही. १ मे १९६० या दिवशी कै. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या मंगलकलशाची प्राणप्रतिष्ठा केली. राज्याच्या आजच्या ५४ व्या वर्धापनदिनी त्या कलशाभोवतीचे अमंगल अधिक गडद  झाले आहे.