अचलानंद दादांच्या उद्गारांनी कर्मेद्र काहीसा वरमला. वातावरणात किंचित ताण निर्माण झाला होता खरा. दादांनीच हसून तो ताण सैल करण्याचा प्रयत्न केला.
अचलदादा – अहो माझा हा स्वभाव तुमच्या हृदयला माहित आहे. बोलायला लागलो ना की मला कुठे थांबावं तेच समजत नाही. पूर्वी हा हृदय आमच्या घरी यायचा. दुपारी जेवायला म्हणून ताटावर बसायचो आणि एखादा गंभीर विषय सुरू व्हायचा. तास जायचा, दोन तास जायचे. जेवण वाळवंडायचे. मग माझ्या पत्नी धीर एकवटून मला सांगायच्या. पुन्हा सगळे पदार्थ गरम करून आणत्ये, आधी जेवून घ्या.
हृदयेंद्र – (हसत) आणि एवढंच नाही, माझे डोळे यांच्यावरच रोखले असले पाहिजेत, असा अलिखित नियम होता. चुकूनही जर ताटाकडे लक्ष गेलं तर खवळायचे. की पोट भरायचीच चिंता उरल्ये का? गंगेच्या काठी उकिरडाच शोधता का?
अचलदादा – पण आता मी प्रयत्नपूर्वक स्वत:ला बदललंय बरं का! तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही. तुम्ही भजी खाऊन घ्या. मी आणि हृदय तर कांदा खात नाही. आम्ही कोरडं काही तरी खाऊ. माझ्या पिशवीत लाडू आणि चिवडा आहेच.
सर्वचजण खाण्यात रमले. दादांचं मात्र जणू यात लक्षच नव्हतं. ते दुसऱ्याच विचारात खात होते. सगळा अभंग यांच्या डोळ्यासमोर तरळतोय का, असं हृदयेंद्रला वाटलं. एखाद्यानं हिऱ्यामाणकांची खाण शोधून काढावी आणि आपल्या माणसांना तिकडे चलायचा आग्रह करावा तर तिकडे जायला चांगली पादत्राणेच नाहीत, चांगले कपडेच नाहीत म्हणून त्यांनी घरातच रडत बसावं, असंच काहीसं घडताना दादांना वाटत असेल, हे हृदयेंद्रला अनुभवानं माहीत होतं. खाल्ल्यावर पुन्हा गरम कॉफी झाली. मग सर्वचजण खोलीवर गेले. दादांनाही याच इमारतीत खोली मिळाली होती. सर्वजण हात-पाय धुवून बसले..
अचलदादा – गंमत पाहा. यांना भजी पाहून ती खाल्ल्याशिवाय राहावत नव्हतं. पदार्थच कशाला, वस्तूचं किंवा व्यक्तिचं जे बाह्य़रूप आहे, दृश्यरूप आहे ना त्याचाच आपल्यावर बरा किंवा वाईट, अनुकूल किंवा प्रतिकूल असा प्रभाव पडतो. त्या बाह्य़रूपाला, दृश्यरूपाला भुलूनच आपण पदार्थ, वस्तू किंवा व्यक्तिला जोखतो. तिच्या मूळ अंतरंग स्थितीकडे आपण कधीच पाहत नाही. एखादा पदार्थ दिसायला छान वाटला तर लगेच आपण ताव मारतो, पण तो बनला कसा, तो रांधताना स्वच्छता होती का, तो माझ्या पोटाला मानवणार आहे का, आपण याचा काहीच विचार करीत नाही. म्हणजे बाह्य़रूपावरून जो प्रभाव पडतो त्यानुसार आपण वस्तूशी, व्यक्तिशी व्यवहार करतो. ज्या ओढीनं आपण या भौतिक गोष्टींकडे पाहतो त्या ओढीनं कधीच भगवंताकडे पाहात नाही. बाकी  भौतिकातल्या, व्यवहारातल्या आपल्या सर्व सवयी आपण अध्यात्माच्या मार्गावरही जपू पाहतो, हीच एक सवय मात्र आपण सोडून देतो.. वस्तू असो की व्यक्ती ती अशाश्वतच आहे. तिच्यात सतत झीज, घट, हानी आणि नाशाची प्रक्रिया सुरूच आहे. तरी तिच्या बाह्य़रूपाचा प्रभाव पडून आपण त्यात आसक्त होतो, पण जो शाश्वत, सतत, अजर, अमर आहे अशा भगवंताच्या रूपाचा संकेत देणाऱ्या मूर्तीकडे वा तसबिरीकडे पाहून आपण तिच्यात आसक्त होत नाही!
कर्मेद्र – कारण कितीही झालं तरी ती मूर्ती किंवा ती तसबीर निर्जीवच तर असते.. सजीवाचं प्रेम लागू शकतं, निर्जीवाचं कसं लागावं?
हृदयेंद्र – अरे जर कणाकणांत तो परमात्मा भरून आहे तर तो त्या मूर्तीत किंवा तसबिरीत नसेल? तू त्या भावानं पाहिलंस तर दिसेलच तो..
कर्मेद्र – तरीही मी मूर्ती पाहत आहे, चित्र पाहत आहे, हे विसरता येत नाही. अमक्या मंदिरातली मूर्ती फार सुंदर आहे, असंच म्हणतात ना लोक? त्या मंदिरातलं परमात्म्याचं रूप फार सुंदर आहे, असं तर नाही ना म्हणत? निर्जीव चित्र पाहून भाव कसा जागा होईल?
अचलदादा – तुमचा प्रेमविवाह झाला आहे ना?
कर्मेद्र – (आश्चर्यानं) प्रेमविवाहच काय, आधी प्रेमभंगही झाला आहे. पण त्याचा इथे काय संबंध?
अचलदादा – रागावू नका. पण प्रेमात पडलात, प्रेमभंग झाला, नंतर पुन्हा प्रेमात पडलात तेव्हा तिचा निर्जीव फोटोच हृदयाशी जपत होतात ना? तोच न्याहाळताना प्रेमभाव उचंबळून येत होता ना?
चैतन्य प्रेम