साधकाच्या जीवनाचा खरा धुरीण सद्गुरूच आहे, असं हृदयेंद्र म्हणाला. तो सद्गुरूच भक्तीचं सातत्य माझ्यात रुजवतो आणि माझ्यातल्या भवसातत्याचं खंडण करतो, असं हृदयेंद्र म्हणाला. त्यानंतर भारावल्या स्वरात तो म्हणाला..
हृदयेंद्र – अमृतानुभवाच्या दुसऱ्या अध्यायात सद्गुरूंचं स्तवन करताना ज्ञानेश्वर महाराजांचा भावही उचंबळून येतो.. पहिल्याच श्लोकात ते म्हणतात.. आता उपायवनवसंतु। जो आज्ञेचा आहेवतंतु। अमूर्तचि परी मुर्तु। कारुण्याचा।। वसंत ऋतुत सृष्टी कशी नवचैतन्यानं नटते, तसं सद्गुरू जेव्हा माझ्या जीवनात आले तेव्हापासून माझं जीवन चैतन्यमय झालं. तर सद्गुरू हे त्या वसंत ऋतुप्रमाणे चैतन्यप्रदान करणारे आहेत. आहेवतंतु म्हणजे सौभाग्यलेणं. मी त्यांचा आहे, याची जाणीव जागती ठेवणारं हे सौभाग्यलेणं कोणतं? तर त्यांची आज्ञा! त्यांच्या आज्ञेत मी सदोदित राहिलं पाहिजे. पुढे म्हणतात, अमूर्त असूनही त्यांच्या रूपानं कारुण्यच जणू मूर्तस्वरूपात प्रकटलं आहे. म्हणजे आज्ञा देतानाही ती देण्यामागे कारुण्य आहे! माझं हित कशानं होईल, त्याचीच आज्ञा आहे! त्या आज्ञेचं सौभाग्यलेणं मी सदोदित जपलं पाहिजे.
दादासाहेब – आमच्या काळी मंगळसूत्रात स्रीचा जणू प्राण असे! तसा सद्गुरुंची आज्ञा म्हणजे शिष्याचा प्राण असली पाहिजे, ही अपेक्षा दिसते.. फार छान.. तेव्हा भवाचं सातत्य तोडणं माझ्या हातात नाही..
योगेंद्र – अगदी सुरुवातीला सद्गुरू तत्त्वाचं महत्त्व माझ्या लक्षात येत नसे. पातंजल योगसूत्रांचा अभ्यास करताना पहिल्याच समाधिपादातल्या तीन श्लोकांवर हृदयेंद्रशी चर्चा झाली त्या चर्चेनं सद्गुरू तत्त्वाबद्दलचं माझं चिंतन सखोल होत गेलं..
हृदयेंद्र – खरंच मलाही त्या श्लोकांनी वेगळीच दृष्टी दिली.. ज्ञानू तुझ्याकडे आहे ते पुस्तक? (ज्ञानेंद्र अभ्यासिकेत जातो. तोवर पतंजलि मुनि आणि त्यांच्या योगसूत्रांबद्दल जुजबी माहिती योगेंद्र देतो. ज्ञानेंद्र एक लहानसे पुस्तक घेऊन येतो..)
ज्ञानेंद्र – यात नुसते श्लोक आणि त्यांचा अर्थ आहे..
हृदयेंद्र – हरकत नाही.. योगा तूच वाच..
योगेंद्र – (थोडी पाने उलटून एका पानावर स्थिरावत) हं समाधिपादातले २६ ते २९ हे श्लोक फार विलक्षण आहेत.. पहिल्या २५ श्लोकात योग म्हणजे काय ते सांगितलं आहे. योग म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध. तो साधतो तेव्हा बहिर्मुख मन अंतर्मुख होतं आणि मग आत्म्याचं वास्तव दर्शन घडतं. मग या चित्तवृत्ती कोणत्या ते विस्तारानं सांगितलं आहे. त्या चित्तवृत्तींनी बहिर्मुखता येते आणि त्यामुळे अनेक क्लेश भोगावे लागतात. त्यासाठी चित्तवृत्तींचा निरोध हवा. तो होण्यासाठी अभ्यास आणि वैराग्य हे दोन उपाय सांगितलेत. त्यानं जी उच्च समाधी अवस्था प्राप्त होते ती साध्य होण्याचा मार्ग ‘ईश्वरप्रणिधान’  म्हणजे सर्व व्यवहार ईश्वरार्पण बुद्धीनं करणं हा आहे, असं २३व्या सूत्रात सांगितलं. मग त्या  ईश्वराचं वर्णन केलं. आता जो दिसत नाही त्याची धारणा कशी करावी, हा प्रश्न पडला आणि हृदूनं २६व्या श्लोकाकडे लक्ष वेधलं. हा श्लोक असा आहे.. (पुस्तकातून वाचतो) ‘स एष पूर्वेषामपि गुरु: कालेनानवच्छेदात्’ इथे ‘पूर्वेषाम अपि गुरू’ म्हणजे जे ब्रह्मादिक मूळ देव आहेत त्यांच्याहून गुरू म्हणजे त्यांच्यापेक्षा मोठा, त्यांच्याही आधीचा असा अर्थ आहे! मग असा ‘देव’ कोण? हृदूनं लगेच ‘गुरूगीता’ सुरू केली! समर्थानीही ‘जगी थोरला देव तो चोरलासे’, या शब्दांत खरा सद्गुरू या जगात अवडंबराशिवाय राहातो, असं वर्णन केलंय, असंही हृदू म्हणाला. २७व्या श्लोकात ‘तस्य वाचक: प्रणव:’ म्हणजे ॐकार त्याचा वाचक असल्याचं सांगितलंय..
हृदयेंद्र – ॐकार स्वरूपा सद्गुरू समर्था..
योगेंद्र – मग २८ आणि २९व्या श्लोकात स्पष्ट म्हटलंय की, ‘ तत् जप: तद् अर्थ भावनम्’ आणि ‘तत: प्रत्यक्  चेतन अधिगम: अपि अन्तराय अभाव: च’ म्हणजे त्या सद्गुरूवाचक प्रणवाचा जप करावा, त्याच्याशी ऐक्यभावना ठेवावी म्हणजे आत्मसाक्षात्कार होतो. मग योगात जे अन्तराय म्हणजे अडथळे निर्माण होतात ना, त्यांचाही आपोआप परिहार होतो! म्हणजे अडथळ्यांशी झुंजण्यापेक्षा सहजतेनं योग साधायचा तर सद्गुरू हवाच! तोच धुरीण आहे. त्याच्या बोधानुरूप उपासनेने शक्ति जागी झाली की भवसातत्याचा निरास आणि अखंड परमयोगाचा लाभ होईल!
चैतन्य प्रेम