जर मराठय़ांमध्ये संघटनेचे चातुर्य, सहकारिता, आधुनिक यांत्रिक कलेचे ज्ञान आणि आहे याहून अधिक दूरदृष्टी इतक्या सद्गुणांची भर पडेल तर पृथ्वीच्या पाठीवर त्यांची बरोबरी कोणीही करू शकणार नाही, असे भाकीत सर जदुनाथ सरकार यांनी १९१९ साली  केले होते. या भाकिताला आणखी पाच वर्षांनी  १०० वर्षे पूर्ण होतील. या शतकात मराठय़ांविषयीचे सरकारांचे भाकीत खरे ठरले आहे का याचा विचार केला तर उत्तर निराशाजनक अर्थात नकारार्थी येते..
समाजाच्या स्थिती-गतीची चर्चा करताना आपणाला नेमका कोणता मानवसमूह अभिप्रेत आहे हे प्रथम स्पष्ट करावे लागते. तो समूह वांशिक, धार्मिक, वर्गीय, जातीय इ.पैकी असू शकतो. आज ज्याला ‘मराठी माणूस’ असे म्हणण्याची पद्धत आहे त्या समूहाचा निर्देश खरे तर ‘मराठा’ या शब्दाने केला जाण्याचा फार जुना संकेत आहे. हा निर्देश मुख्यत्वे भाषिक व प्रांतिक (महाराष्ट्र हा प्रांत) असला तरी त्याचे काही वांशिक धागेदोरेही असणार हे उघड आहे. ते उघडकीस आणण्याचे कार्य जोतिराव फुल्यांपासून इरावती कव्र्यापर्यंत अनेकांनी केले आहे, त्या मानव(वंश)शास्त्रीय तपशिलात न जाता या मराठा नावाच्या मानवसमूहाच्या स्थिती-गतीची चर्चा करणे आवश्यक ठरते.
साधारण शतकभर मागे जाऊन तेव्हाच्या मराठा समाजाची परिस्थिती समजून घेण्यासाठी एखाद्या त्रयस्थ आणि तटस्थ साक्षीदाराच्या दृष्टीने पाहणे उचित ठरेल. सर जदुनाथ सरकार या वंग प्रांतातील प्रसिद्ध इतिहासकारापेक्षा अधिक योग्य नाव मला तरी आढळत नाही. जदुबाबूंनी मोगल साम्राज्याचा पूर्ण इतिहास लिहिला. विशेषत: औरंगजेबाच्या कारकिर्दीचा विचार करताना त्यांना महाराष्ट्रामधील शिवाजी महाराजांचे नाव पर्शियन दस्तऐवजांमध्ये वारंवार आढळू लागले. या शिवाजी महाराजांचा शोध घेताना त्यांना साहजिकच महाराष्ट्र आणि मराठे यांनाही भिडावे लागले. या भिडण्यातूनच सरकारांचे ‘Shiva and his Times” हे शिवचरित्र सिद्ध झाले.
१९१९ साली प्रसिद्ध झालेल्या शिवचरित्रात जदुनाथांनी मराठय़ांविषयी लिहिले-
‘‘हिंदुस्थानामध्ये आज अद्वितीय ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्यांच्या अगदी अलीकडच्या पूर्वजांनीसुद्धा शेकडो लढाया मारून धारातीर्थी आपले देह ठेविले आहेत. व्यवस्थित रीतीने मोठमोठय़ा फौजांच्या हालचाली केल्या आहेत. विलक्षण राजकारणे लढविली आहेत. राज्याची फडणिशी यशस्वीपणे करून साम्राज्यातील महत्त्वाचे राजकीय प्रश्न उलगडून दाखविले आहेत. सारांश त्यांनी आपल्या कृतीने हिंदुस्थानचा अलीकडचा इतिहास बनविला आहे. बुद्धीची तीक्ष्णता, दीघरेद्योग, साधी राहणी, उच्च विचारसरणी, कोणताही सुविचार आचारात आणण्याची धमक, चारित्र्य, वसुधैव कुटुंबकम् वृत्ती इतक्या सर्व गुणांचा सन्निपात मराठय़ांच्या ठिकाणी झालेला असल्यामुळे आज तरी हिंदुस्थानात त्यांच्यापेक्षा वरचढ कोणी असेल अशी कल्पनासुद्धा करण्याचे कारण नाही.’’
थोडक्यात सांगायचे झाल्यास १९१९ साली मराठे हे हिंदुस्थानात अग्रेसर व श्रेष्ठ असल्याची सरकारांची खात्री पटली होती. हे स्थान मराठय़ांना कोणी मेहेरबानी करून बहाल केले नव्हते, तर ते त्यांनी आपल्या अंगभूत गुणांच्या जोरावर मिळवले होते, असेही त्यांचे मत बनले होते.  पण सरकार येथेच थांबत नाहीत. भविष्यकाळाचा वेध घेऊन काही भाकीत करण्याचे धाडसही ते करतात. ‘‘वरील सद्गुणसमुच्चयात जर मराठय़ांमध्ये संघटनेचे चातुर्य, सहकारिता, आधुनिक यांत्रिक कलेचे ज्ञान आणि आहे याहून अधिक दूरदृष्टी इतक्या सद्गुणांची भर पडेल तर पृथ्वीच्या पाठीवर त्यांची बरोबरी कोणीही करू शकणार नाही.’’
आणखी पाच वर्षांनी म्हणजे २०१९ साली सरकारांनी केलेल्या भाकिताला बरोबर १०० वर्षे पूर्ण होतील. या शतकात मराठय़ांविषयीचे सरकारांचे भाकीत खरे ठरले आहे का याचा विचार केला तर उत्तर निराशाजनक अर्थात नकारार्थी येते. बरे शंभर वर्षे हा तसा कमी कालावधी नाही की ज्यामुळे मराठय़ांनी मुदतवाढीची मागणी करावी.
पृथ्वीच्या पाठीवर अग्रेसर होणे ही बाब तूर्त बाजूला ठेवू. मराठय़ांनी निदान शतकभरापूर्वीचे आपले हिंदुस्थानातील श्रेष्ठत्व तरी टिकवले आहे का इतका मर्यादित प्रश्न विचारला तरी त्याचेही उत्तर नकारार्थी येते हे मान्य करण्याचा प्रांजळपणा मराठी समाजाने दाखवला पाहिजे.
संकोचोनी काय झालासी लहान।
करी आपोषण ब्रह्माडांचे।।’
या तुकाराम महाराजांच्या उक्तीनुसार ब्रह्माडांचा ग्रास घेण्याची क्षमता असलेल्या आपली घसरण ‘वडय़ा’पर्यंत व ‘वडापावा’पर्यंत झाली आहे हे आजचे वास्तव आहे. असे का घडावे याची कारणमीमांसा करताना एका जातीने दुसऱ्या जातीच्या माथ्यावर खापर फोडण्याच्या नेहमीच्याच तयार सापळ्यात न अडकता कठोर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. त्यात कोण्या जातीवर काही एक आफत आली तर ती स्वीकारण्याची तयारीही सर्वानी ठेवायला हवी.
मुळात जदुनाथ सरकारांनी मराठय़ांना एवढे झुकते (खरे तर यथायोग्यच) माप का द्यावे, हा प्रश्न आहे. कारण महाराष्ट्रातील आजच्या सुशिक्षितांनादेखील इतिहासाचे एवढे ज्ञान राहिले नाही. सर्वाच्याच मनामध्ये एक प्रकारचा न्यूनगंड आणि एक प्रकारचा भयगंड निर्माण झाला आहे. इतकेच नव्हे तर या गंडांचे राजकारण करू शकणाऱ्यांचीही चलती व चढती कमान आहे. एक लक्षात घ्यायला हवे की जदुनाथ सरकार हे इतिहासाचे व विशेषत: मोगलांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक होते. मोगलांच्या सत्तेचा उत्कर्ष व त्यातल्या त्यात ऱ्हास आणि पतन हा त्यांच्या विशेष चिंतनाचा भाग होता. मोगल सत्तेच्या अधिकृत अंतानंतर ब्रिटिश अंमल सुरू झाला आणि त्याच अमलात सरकारांचे संशोधन लेखन चालू होते. मोगल सत्तेला आव्हान देऊन ब्रिटिशांशी स्पर्धा करणारे हिंदुस्थानात कोण असेल तर ते मराठेच याची यथायोग्य कल्पना १९१९ मध्ये सरकारांइतकी कोणालाच असणे शक्य नव्हते.
बाकी काही नसली तरी १७५७ च्या दरम्यान घडलेल्या दोन घटनांची माहिती ज्याला आहे त्याचे मराठय़ांबद्दलचे मत जदुनाथांसारखेच बनायला हरकत नसावे. त्यातील एक घटना जदुनाथांच्याच बंगालमध्ये घडली तर दुसरी उत्तर व वायव्य हिंदुस्थानात. दोन्ही घटनांचा संबंध परकीय आक्रमणांशी होता, हे साम्य. फरक इतकाच की उत्तर व वायव्य हिंदुस्थानातील घटनेशी मराठय़ांचा संबंध होता.
थोडक्यात सांगायचे झाल्यास त्यासाठी बंगालमधील प्लासी या ठिकाणी नबाब सिराज उद्दौलाचे सैन्य आणि ब्रिटिश सेनानी रॉबर्ट क्लाइव्ह याचे सैन्य एकमेकांना भिडले. नबाबाच्या सैन्याने दोन-चार घटकांमध्येच आटोपते घेतले व क्लाइव्हला जणू पुढे चाल दिली! नबाबाचे सैन्य इंग्रज सैन्यापेक्षा काही पटीने जास्त होते, याला या लढाईत काहीच महत्त्व उरले नव्हते. प्लासीच्या लढाईत नबाबाचा पराभव झाल्यामुळे बंगाल या सुपीक प्रांताची दिवाणी क्लाइव्हच्या ईस्ट इंडिया कंपनीला देण्यावाचून दिल्लीच्या मोगल बादशहाला पर्यायच उरला नाही. अशा प्रकारे परकीय ब्रिटिश सत्तेचा पहिला पायरव व शिरकाव बंगालमध्ये झाला. बादशहाच्या कुंडलीच्या पूर्वेकडील स्थानात ब्रिटिशरूपी केतूचा प्रवेश होत असताना तिकडे नेहमीप्रमाणे खैबर खिंडीतून अहमदशहा अब्दालीच्या रूपाने पठाणांचा राहूही प्रवेश करता झाला. हा राहू दिल्लीपर्यंत आला. त्याने दिल्ली साफ लुटली. तेथे आपली माणसे ठेवून तो स्वत: मायदेशी रवाना झाला. या माणसांमध्ये त्याच्या मुलाचाही समावेश होता (इंग्रजांच्या केतूचे भ्रमण दिल्लीपर्यंत होण्यास अजून अर्धे शतक लोटायचे होते.) दिल्लीच्या पातशाहीला पठाणांच्या कडव्या, कट्टर आणि आजची प्रचलित भाषा वापरायची झाल्यास मूलतत्त्ववादी राहूने ग्रासले असले तरी महाराष्ट्रात अद्याप मराठय़ांच्या रूपाने एक प्रबळ पंचाक्षरी मांत्रिक मौजूद होता. सुदैवाने मराठे आणि मोगल बादशहा यांच्यात १७५२ सालीच ‘अहदनामा’ म्हणून ओळखला जाणारा करार झाला होता. त्या करारानुसार दिल्लीच्या मोगलपातशाहीवर परकीय आक्रमण झाले तर त्या आक्रमकांना हुसकावून लावून मोगल तख्ताचे रक्षण करण्याची जबाबदारी मराठय़ांनी पत्करली होती.
या कराराला जागून नानासाहेब पेशव्यांच्या हुकमानुसार राघोबादादांच्या हाताखाली मराठय़ांच्या फौजेने उत्तरेकडे कूच केले. या फौजेने दिल्लीला वेढा घालून तेथील राहूला म्हणजे तेव्हा तेथे राज्य करणाऱ्या अब्दालीच्या हस्तकांचा पराभव करून त्यांना पळता भुई थोडी केली. दिल्लीची सत्ता मराठय़ांच्या हाती आली.   दिल्ली शहर, परगणा आणि सुभा यांच्यावर मराठय़ांचा अंमल जारी झाला. पण मराठे तेवढय़ावरच खूष होणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांना अब्दालीला हिंदुस्थानातूनच बाहेर हाकलून द्यायचे होते. पंजाब प्रांतावर तेव्हा अब्दालीची सत्ता होती. राघोबाच्या सैन्याने पंजाबात घुसून अब्दालीच्या मुलाचा, तैमूरशहाचा पराभव केला. तेथील शिखांनी (अलासिंग जाट) व मोबादशहाच्या सेनानींनी (आदिना बेग) मराठय़ांना मदत केली. या संयुक्त फौजा लाहोरला पोहोचल्या त्या पठाणांचा पाठलाग करीतच. हा पाठलाग पुढे थेट अटकेपर्यंत चालला. अब्दालीने जिंकलेली सर्व ठाणी परत काबीज करून मराठय़ांनी त्याच्या सैन्याला सिंधू नदीच्या पलीकडे पिटाळून लावले. राहूचे ग्रहण सुटले.
त्या वर्षीची दिवाळी मराठय़ांनी लाहोरच्या प्रसिद्ध शालिमार बागेत दीपोत्सवाने साजरी केली. तिकडे बंगालमध्ये इंग्रजांना प्रतिकाराविना प्रवेश मिळत होता आणि इकडे मराठे पठाणांना त्यांच्या मायदेशात हाकलून देत होते. प्लासी आणि अटक यांच्यातील भेद आज आपल्याला कळेनासा झाला असला तरी जदुनाथ सरकारांना तो चांगलाच ठाऊक होता.
*लेखक पुणे विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असून संतसाहित्याचे व्यासंगी व विचारवंत आहेत.  त्यांचा ई-मेल –  sadanand.more@rediff.com