मोदी सरकारने एकापाठोपाठ काढलेल्या सहा अध्यादेशांना मंजुरी मिळवायची, तर साऱ्यांनाच थोडे चुचकारणे भाग आहे. ते मोदींनी दिल्लीतील ख्रिस्ती धर्मगुरूंनी आयोजिलेल्या कार्यक्रमात केले. संघ आणि विहिंपच्या नेत्यांनीही तसाच सूर लावला.. या वक्तव्यांमुळे धर्मनिरपेक्षतेचे काही भले होईल, ही अपेक्षा मात्र व्यर्थ आहे..  
दिल्ली विधानसभा निवडणुकांतील पराभव, त्या आधी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी दिलेल्या कानपिचक्या यामुळे नरेंद्र मोदी यांना बरी अद्दल घडली. म्हणून आनंद साजरा करणारे स्वघोषित निधर्मीवादी तोंडघशी पडण्याची शक्यता अधिक. मोदी यांनी ख्रिस्ती धर्मगुरू संचालित कार्यक्रमात बोलताना आपण कोणालाही धार्मिक अतिरेक करू देणार नाही असे विधान केले, हे या ताज्या आनंदाचे निमित्त. देशातील जनतेस धार्मिक स्वातंत्र्य आहे, आपल्याला हव्या त्या धर्माचे अनुसरण करण्याची मुभा देशातील नागरिकांना पूर्णपणे आहे असे नमूद करीत मोदी यांनी आपले सरकार या स्वातंत्र्याचा नुसता आदरच नव्हे तर रक्षणही करील असे आश्वासन दिले. या त्यांच्या सर्वधर्मसमभावी भाषणामुळे काही उठवळ निधर्मीवाद्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत तर त्याच वेळी तितक्याच उठवळ मोदी भक्तांचे चेहरे दु:खाने काळवंडले आहेत. निधर्मीवादच खरा असे जर असेल, त्याचाच जर उदो उदो करायचा असेल तर मोदी यांची गरजच काय, असे मोदी यांच्या आंधळ्या भक्तांना वाटत असून ‘हेचि फळ काय मम तपाला?’ या प्रश्नाने त्यांना बेचन केले आहे. याउलट स्वघोषित निधर्मीवादी ‘कशी जिरली मोदी यांची’ असे म्हणून एकमेकांना आनंदाने टाळ्या देत आहेत. घरवापसी, िहदूंनी किमान चार अपत्ये जन्माला घालावीत असा शहाजोग सल्ला देणारे साक्षी महाराज, साध्वी निरंजना आदींच्या वाहय़ात बडबडीमुळे मोदी सरकार सध्या टीकेचे लक्ष्य बनले आहे. याची सुरुवात झाली अिहदूंना िहदू करण्याच्या सत्रांमुळे. देशात मूळचे सर्व िहदूच आहेत, परकीयांच्या म्हणजे अर्थातच वेगवेगळ्या यावनी वा ख्रिस्ती राजवटींनी अनेकांचे जबरदस्तीने धर्मातर घडवले. तेव्हा अशा सर्वाना पुन्हा स्वगृही िहदू धर्मात आणायलाच हवे असे विश्व िहदू परिषद आदी िहदुत्ववादी संघटनांना वाटते. त्यामुळे अशा संघटनांनी घरवापसीच्या नावाने अिहदूंना िहदू धर्मात आणण्याचा मोठाच कार्यक्रम हाती घेतला. याची सुरुवात अर्थातच झाली ती दिल्लीत पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्यावर. म्हणजेच मोदी यांचे पंतप्रधानपदी असणे या सर्वामागे आहे असा अर्थ यातून निघाला आणि त्यात गर काही नव्हते. त्यामुळे विकासाचा कार्यक्रम घेऊन येणाऱ्या मोदी यांनी या मार्गाने थेट धर्मविचारालाच हात घातल्याने त्यावर टीकेची झोड उठली. त्यात अन्य धर्मस्थळांवर अचानक वाढलेले हल्ले, िहदू संघटनांशी संबंधित मंडळींची अतिरेकी विधाने यामुळे मोदी सरकारच्या धोरणांबाबत एकंदरच काळजी व्यक्त व्हायला सुरुवात झाली होती. त्यामुळे आपल्या भारत दौऱ्याच्या अखेरीस अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सर्व नागरिकांचे धार्मिक स्वातंत्र्य अबाधित राखले जायला हवे अशी केलेली टिप्पणी ही थेट मोदी सरकारला दिलेली चपराक होती, असे मानले जात होते. इतके होत असताना मोदी मात्र मौन पाळून होते. अगदी संसदेत त्यांच्या देखत या मुद्दय़ांवर गदारोळ होऊन कामकाज बंद पडत असतानाही मोदी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर ख्रिस्ती धर्मगुरूंनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मोदी यावर बोलले. त्यांचे भाषण ऐकून/वाचून हा निधर्मीवादाचा विजय आहे अशी सार्वत्रिक भावना व्यक्त होते. ती किती आणि कशी अनाठायी आहे हे पाहण्याआधी मोदी यांच्या भाषणाकडे चिकित्सक नजरेने पाहावयास हवे. आणि त्याच वेळी त्यांना असे बोलण्याची गरज का पडली तेही समजून घ्यावयास हवे.
‘माझे सरकार कोणत्याही धर्मसमूहाला, मग तो अल्पसंख्याक असो की बहुसंख्याक, अन्य धर्मीयांच्या विरोधात प्रक्षोभ निर्माण होईल असे काहीही करू देणार नाही. मग हे नकळतपणे होत असेल किंवा जाणूनबुजून,’ असे मोदी म्हणाले. या समारंभात काही ख्रिस्तवासी धर्मगुरूंना संतपद दिले गेले. तेव्हा मोदी यांनी योग्य ते बोलण्यासाठी योग्य व्यासपीठाची निवड केली यात शंका नाही. ‘कोणत्याही कारणाने मी कोणत्याही धर्माच्या विरोधात भावना भडकवू देणार नाही. तसे करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही कडक कारवाई करू,’ असे मोदी म्हणाले. या वेळी बोलताना त्यांनी त्यांना उद्धृत करायला आवडते त्या स्वामी विवेकानंद यांचाही उल्लेख केला. ‘आम्हाला सर्वच धर्माविषयी आदर आहे आणि आम्ही सहिष्णुता मानतो,’ असे स्वामी विवेकानंद म्हणाले होते याचा दाखला पंतप्रधानांनी दिला. त्यानंतर त्यांनी भारताच्या अशा उदात्त आणि सहिष्णू धार्मिक परंपरेचा दाखला देत भारतीय राज्यघटनादेखील कशी त्याच तत्त्वांवर उभी आहे, असे नमूद केले. तेव्हा मोदी यांचे सविस्तर भाषण पाहिल्यास त्यामुळे प्रश्न असा पडतो की यात नवीन ते काय? सध्या मुद्दा गाजत आहे तो माथेफिरू िहदुत्ववाद्यांचा. त्याचा उल्लेखही मोदी यांनी केला नाही, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. तेव्हा मोदी यांच्या भाषणाने त्यांच्या कपाळावर निधर्मीवादाचा बुक्का लावावा असे त्यात काय होते? यात नवीन होते ते एकच. ते म्हणजे व्यासपीठ. तो ख्रिस्ती धर्मगुरूंचा कार्यक्रम होता. ही जर बाब सोडली तर मोदी यांच्या धर्मजाणिवा बदलल्या आहेत, असे मानावे असे या भाषणात काहीही नाही.
ते मोदी यांच्या भवताली तयार झालेल्या परिस्थितीत आहे. मोदी सरकारने गेल्या अधिवेशनात सहा अध्यादेश प्रसृत केले. त्यांना संसदेची मंजुरी मिळाली नाही तर त्यांचे कायद्यांत रूपांतर होणार नाही आणि ते सर्वच बारगळतील. तसे होऊ शकते याचे कारण मोदी सरकारचे राज्यसभेत बहुमत नाही. त्यामुळे विरोधी पक्ष वरच्या सदनात ही सर्व विधेयके अडवून सरकारची कोंडी करू शकतो. यास पर्याय आहे तो म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेचे संयुक्त अधिवेशन भरवण्याचा. परंतु हे किती वेळा करणार? आíथक सुधारणा आणि अन्य अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याचा हा काही मार्ग होऊ शकत नाही. तेव्हा मोदी सरकारला विरोधकांशी जुळवून घेणे आले. गेल्या अधिवेशनात हे जुळले नाही कारण रामजादे आणि हरामजादे अशी परिवारातील धर्ममरतडांनी उधळलेली मुक्ताफळे. या असल्या विधानांमुळे संसदेचे सारे अधिवेशन वाया गेले. तेव्हा त्यातून तोडगा काढणे मोदी सरकारसाठी आवश्यक होते.
तेव्हा सदर भाषण हे या अशा तोडग्याचा भाग आहे, हे आपण लक्षात घ्यावयास हवे आणि हा तोडगा काढण्याचा प्रयत्न अनेकांकडून सुरू आहे, हेही आपण लक्षात घ्यावयास हवे. त्यातील अन्य प्रमुख म्हणजे खुद्द सरसंघचालक मोहन भागवत. गेल्या आठवडय़ाभरात िहदुत्ववाद्यांतील बेजबाबदारांना त्यांनी दिलेला सबुरीचा सल्ला हा त्याचाच भाग. िहदू महिलांनी भरपूर मुले प्रसवावीत असे साक्षी महाराज बडबडले त्याला कित्येक आठवडे झाले. परंतु िहदू महिला म्हणजे काही मुले प्रसवण्याचा कारखाना नाही असे त्यांना सरसंघचालकांनी कालपरवा सुनावले. भागवत यांनी हे सुनावण्याआधी दोन दिवस विश्व िहदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष राघव रेड्डी यांनी परिवारातील नेत्यांना बोलण्यापूर्वी विचार करण्याचा सल्ला दिला. िहदू संस्कृती आणि जाणिवा अवगत असलेले सरकार बऱ्याच वर्षांनी आपणास मिळालेले आहे, तेव्हा या सरकारपुढील अडचणी वाढतील असे काही िहदू नेत्यांनी बोलू नये, असा सल्ला रेड्डी यांनी दिला.
या सगळ्याचा अर्थ इतकाच की मोदी मवाळ होत आहेत, किंवा सत्तेमुळे का असेना त्यांना निधर्मीवादाचा अंगरखा घालावा लागत आहे, असे अर्थ इतक्यात काढणे चुकीचे ठरेल. चार घरे पुढे जाण्यासाठी कधी कधी दोन घरे मागे यावे लागते, हा यामागील अर्थ आहे. त्याने हुरळून जाण्याचे कारण नाही.