गरीब देशातील अतिश्रीमंत राजकारण्यांच्या संपत्तीचे गमक कशात आहे, ते जयललिता यांच्या उदाहरणावरून ढळढळीतपणे समोर यावे. तेव्हा त्यांना शिक्षा झाली ते उत्तमच. राजकारणातून कमावलेल्या संपत्तीचे उत्तान दर्शन जनतेच्या डोळ्यावर आले आणि या बेकायदा संपत्तीनेच त्यांचा अखेर घात केला. जे झाले त्यावरून बरेच काही शिकण्यासारखे आहे. विशेषत: पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रातील राजकारण्यांनी..
एकंदर ७५ हजार जण एकाच वेळी भोजन घेऊ शकतील अशी व्यवस्था, प्रत्येकी २५ हजारांना सामावून घेणारे तीन मांडव, एक लाख चौरस फुटांत विस्तारलेला मुख्य मंडप, माती वाटावी इतका सोन्याचा सढळ वापर आणि हिरेमाणकांची खरात. या साऱ्याच्या सुरक्षेसाठी सरकारी बंदोबस्त आणि साधारण दोन किलोमीटरचा मार्ग संपूर्णपणे फुलांनी सुशोभित. कित्येक पिढय़ांत न पाहिलेला असा विवाह सोहळा चेन्नईकरांनी १९९५ साली अनुभवला. त्यानंतर १९ वर्षांनी त्या विवाह सोहळ्याची मुख्य यजमान जे जयललिता यांना विशेष न्यायालयाने ऐतिहासिक शिक्षा सुनावली. यातील मुख्य बाब ही की ते लग्न कोणाचे होते, वधू-वर कोण याविषयी कोणालाही काहीही घेणेदेणे नव्हते. चर्चा होती ती त्या विवाहाची सूत्रधार जयललिता यांचीच. यातील आणखी एक योगायोग म्हणजे तो विवाह सोहळा जितका ऐतिहासिक होता तितकीच त्याच्या आयोजकाला देण्यात आलेली शिक्षा ऐतिहासिक आहे. तब्बल चार वर्षांचा तुरुंगवास, सर्व मालमत्तांवर टाच, खासगी रुग्णालय सेवेस प्रतिबंध आणि या सगळ्याच्या जोडीला १०० कोटी रुपयांचा सणसणीत दंड अशी ही शिक्षा असून यातील दुसरी ऐतिहासिक बाब ही की सत्तेवर असलेल्या मुख्यमंत्र्यास अशा प्रकारे शिक्षा ठोठावली जाण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. अलीकडच्या काळात देशाने अनेक माजी मुख्यमंत्री, मंत्री तुरुंगात जाताना पाहिले. लालू प्रसाद यादव, ओम प्रकाश चौताला, ए राजा आदी अनेक मान्यवरांना हल्ली तुरुंगाची हवा चाखावी लागली. भारतीय लोकशाही प्रौढ आणि काही प्रमाणात का होईना प्रामाणिक होत असल्याचे हे लक्षण असून सर्व सुजाण, कायदाप्रेमी नागरिकांनी याचे स्वागत करावयास हवे.
याचे कारण असे की एकदा का सत्ता आली की जणू अमरपट्टाच आपल्याला मिळाला असे अनेक राजकारण्यांचे वर्तन असते. सत्तेपर्यंत जाईपर्यंत दुचाकीवरून फिरणारा कार्यकर्ता सत्तासोपानावर चढला की दादा, भाई वगैरे होतो आणि हातात चार चार अंगठय़ांच्या जोडीला अनेक वाहनांचा ताफा बाळगू लागतो. हे कसे होते, याचे सामान्य माणसास नेहमीच कुतूहल असते. साधारण ४० टक्के जनता ज्या देशात दारिद्रय़रेषेखाली राहते त्या देशात त्यामुळे हे असे संपत्ती जमा करणारे आदर्श आणि अनुकरणीय ठरतात. श्रीमंत होण्याचा सोपा मार्ग राजकारणाच्या अंगणातून जातो असे जनसामान्यांना वाटू लागते आणि या मार्गाने आपणही जावे अशी मनीषा त्याच्या मनी तयार होते. वस्तुत: यातील एकजात सर्वाची संपत्ती गैरमार्गाने मिळवलेली आहे आणि केवळ भ्रष्टाचार हाच त्याचा आधार आहे हे सर्वानाच माहीत असते. परंतु इतका भ्रष्ट मार्गाचा अवलंब करूनदेखील यातील कोणालाही कधीही शिक्षा झालेली न पाहिल्यामुळे आपण पापभीरू राहून काय मिळवणार असा रास्त प्रश्न अनेकांच्या मनात तयार होतो. हे असे दीर्घकाल होत राहिले तर कायद्याचे राज्य ही संकल्पनाच मोडीत निघते. आपल्याकडे नेमके हेच झाले आहे. कालपरवापर्यंत भुक्कड उद्योग करीत फिरणारे पांढरे डगले अडकवून राजकारणात शिरतात आणि बक्कळ माया करीत टेचात रुबाब करीत हिंडताना दिसतात. जयललिता वा लालू वा चौताला यांना शिक्षा व्हायला हवी ती यासाठी की त्यांनी पत्करलेला मार्ग हा चुकीचा आहे हे जनतेस कळावे म्हणून. उच्चपदस्थांनाच कायद्याचे चार रट्टे बसले की त्याचा परिणाम खोलवर होतो. त्यामुळे या अशा शिक्षा होणे ही सध्या काळाची मोठी गरज आहे.
जयललितांचा उद्दामपणा हा की त्या ज्याच्या विवाहासाठी अर्निबधपणे वागत होत्या त्या वराच्या नावावर आणि त्याच्या कुटुंबीयांवर आधीच हवाला व्यवहाराचे गुन्हे दाखल होते. जयललिता यांनी याची कोणतीही फिकीर केली नाही. १९९१ ते ९६ हा त्यांचा काळ हा त्यांच्या उद्दामपणाच्या राजवटीचा काळ होता. या काळात त्यांनी अमाप घोटाळे केले आणि सरकारी व्यवस्था पूर्णपणे स्वत:साठी अक्षरश: नागवली. तानसी जमीन घोटाळा, स्पिक कंपनीतील वादग्रस्त गुंतवणूक, टी टी व्ही दिनकरन या अशाच वादग्रस्त व्यक्तीस लंडनमध्ये हॉटेल खरेदी करता यावे यासाठी दिलेली तब्बल २४८ कोटी रुपयांची रोख उचल, राज्यात वाटण्यासाठी ४५ हजारांहून अधिक रंगीत टीव्ही संचांची खरेदी, स्वत:च्या वाढदिवसाला रोख १३ लाख डॉलर्सची भेट परदेशात घेणे, ग्रेनाइट खाणींची बेकायदा कंत्राटे.. असे एक ना दोन अनेक उद्योग या पुराची थलैवी म्हणून घेणाऱ्या जयललिता अम्मांनी केले. पुराची थलैवी म्हणजे क्रांतिकारक नेता. जयललिता यांना या उपाधीने ओळखले जाते. एका अर्थाने ते खरेही आहे. त्यांनी क्रांती केलीच. पण तिची दिशा उलटी होती इतकेच.
खरे तर तामिळनाडूचे सर्वच विद्यमान राजकारणी तसे क्रांतिकारकच म्हणावयास हवेत. सध्या विरोधी पक्षांत बसावे लागलेले एम करुणानिधी हेही असेच क्रांतिकारक. त्यांच्या तीन पत्नी आणि त्यांच्या पोराटोरांनी तामिळनाडूच्या राजकारणात धुमाकूळ घातलेला आहे. तसेच मारन बंधू हेदेखील थोर क्रांतिकारकच. विमान कंपनी ते दूरसंचार घोटाळा अशा प्रत्येक गैरव्यवहारात त्यांचा हात आहे. खेरीज त्यांची स्वत:ची खासगी दूरसंचार वाहिनी आहे आणि त्यातूनही अशाच क्रांतीची व्यवस्था त्यांनी करून ठेवलेली आहे. जयललिता यांचे एके काळचे तारणहार आणि अन्य बरेच असे एम जी रामचंद्रन हेदेखील असेच क्रांतिकारक होते. ते गेल्यावर त्यांची पत्नी जानकी आणि जयललिता यांच्या संबंधांतही क्रांती होऊनच पक्षाची सूत्रे जयललिता यांनी आपल्या हाती घेतली. त्यानंतर पक्षातील पुरुष संस्कृतीविरोधात त्यांनी अशीच क्रांती केली आणि सगळ्यांना सरळ केले. चित्रपटाच्या पडद्यावरून राजकारणाच्या पटावर त्यांना आणले ते रामचंद्रन यांनी. भडक अभिनय आणि उत्तान दृश्ये यासाठी तरुणपणीच्या जयललिता ओळखल्या जातात. त्या काळात त्यांना पुरुषी मानसिकतेतील विकृतीचा सामना करावा लागला. त्यामुळे पुरुषांवर त्यांचा खासा राग. या रागातूनच त्यांनी ससिकला या मैत्रिणीस नको तितके जवळ केले आणि आज तिच्यासह तुरुंगवासाची शिक्षा ओढवून घेतली. या ससिकला यांच्या चिरंजीवाच्या विवाह सोहळ्यातच त्यांच्याकडून झालेले तमिळ चित्रपटासारखे संपत्तीचे उत्तान दर्शन जनतेच्या डोळ्यावर आले आणि या बेकायदा संपत्तीनेच त्यांचा अखेर घात केला. जे झाले त्यावरून बरेच काही शिकण्यासारखे आहे.
विशेषत: पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रातील राजकारण्यांना. याचे कारण या महाराष्ट्रातही या अशा भयानक  संपत्तीनिर्मितीची आणि त्याहूनही भयानक आणि ओंगळ संपत्तिप्रदर्शनाची लाटच अलीकडे आलेली दिसते. आपल्या पोराच्या विवाहासाठी दुष्काळी प्रदेशातील विहिरींत बर्फाच्या लाद्याच्या लाद्या टाकून सत्तरच्या दशकात साजरे झालेले समाजवादी लक्षभोजन फिके पडावे असे आजच्या नेत्यांचे वर्तन आहे. मुंबईतील महालक्ष्मीचे घोडामैदान ते रत्नागिरी व्हाया नागपूर असे अनेक बटबटीत विवाह सोहळे अलीकडच्या काळात महाराष्ट्राने पाहून तोंडात बोटे घातली आहेत. या राजकारण्यांच्या या संपत्तीनिर्मितीचे कौशल्य किती आहे ते विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने अनुभवास येतेच आहे. दोन निवडणुकांतील पाच वर्षांच्या काळात यातील अनेक आमदारांच्या संपत्तीत काहीही भरीव उद्योग न करता तब्बल पाचशे टक्क्यांनी वाढ झालेली दिसते. गरीब देशातील हे अतिश्रीमंत राजकारण्यांच्या संपत्तीचे गमक कशात आहे, ते जयललिता यांच्या उदाहरणावरून ढळढळीतपणे समोर यावे. तेव्हा त्यांना शिक्षा झाली ते उत्तमच. राजकारणातल्या या अशा ठिकठिकाणच्या बिघडलेल्या अम्मा आणि त्यांच्या सर्वत्र पसरलेल्या बगलबच्च्यांचे खरे निवासस्थान तुरुंगच हवे.