20 April 2019

News Flash

मालवणी जत्रोत्सव

आता परीक्षा सुरू होतील. नंतर लवकरच सुट्टी लागेल आणि आंबे-काजू-फणसाचा वास नाकात परमळू लागलेल्या मुंबईकर चाकरमान्यांची कोकणात गावाकडं जायची तयारी सुरू होईल.

| March 13, 2015 12:37 pm

आता परीक्षा सुरू होतील. नंतर लवकरच सुट्टी लागेल आणि आंबे-काजू-फणसाचा वास नाकात परमळू लागलेल्या मुंबईकर चाकरमान्यांची कोकणात गावाकडं जायची तयारी सुरू होईल. पण सगळ्यांनाच काही गावाकडं जायला जमत नाही. ते इथंच, मुंबईतच कुढत बसतात. त्यांच्यासाठी मुंबईकर पुढाऱ्यांनी शक्कल काढली. मुंबईतच, मैदानावर मालवणी जत्रोत्सव सुरू झाले. कडकडीत बुंदीचे लाडू, मालवणी खाजा, देवीची जत्रा, गावकी, जापसाल.. सारं कोकण एका मैदानावर घुमू लागलं. मुंबईतच मालवण अवतरू लागलं, आणि गावाकडं जायला मिळत नाही म्हणून चुकल्यासारखं वाटणारे सारे चाकरमानी, मैदानावरच्या मालवणाक चक्कर मारून, कोंबडी-वडे चापून समाधान मानू लागले.. इथे चाकरमान्यांची गर्दी उसळते, हे लक्षात आल्यावर जत्रांना ‘पोलिटिकल कलर’ आले. महिनाभरात मुंबईच्या वांद्रय़ात अशीच एक ‘मालवणी जत्रा’ भरणार आहे. त्याची तयारी सुरू झाली आहे. दशावताराचा प्रयोगही होणार आहे. प्रमुख भूमिकेचा शोध संपलाय. मालवणचो झील.. तसो, तो सध्या रिकामोच. म्हणतात ना, येताळाक गावली खुर्ची, भामका देवीक गावलो घोव, तशातली परिस्थिती. तो घरात बसलेला. पण घरात भय घोवाचो, रानात भय वाघाचो.. अशी अवस्था. सगळे त्याच्याकडे बघून हसत होते. तो गप्पच. मनात म्हणायचा, जात्यातले रडतत नि सुपातले हसतत.. पण काय करणार, यमन्याचा बसला, लगीन करून फसला, त्यातली गत.. त्यात त्याला पाण्यात बघणारेच जास्त. आता तर आयताच हाती गावला. मग सगळ्यांनी ठरवलं, त्यालाच दशावताराचा हिरो करायचं. लगेचच त्याला सांगावा धाडला. तू दशावताराचा हिरो व्हायचं, असं कळवलं. यानं ओळखलं. वाघ पडलो घळी, केल्टा दावतां नाळी.. तो मनातल्या मनात म्हणाला. पण काय करणार? त्याला माहीत होतं. हा म्हणजे, ‘आयजीच्या जिवावर बायजी उदार, नि सासवेच्या जिवावर जावय सुभेदार’ अशातला प्रकार आहे. ‘तोंडाक मिठी नि कपाळाक आठी’ घालून तो घुम्म बसून राहिला. तो तरी काय करणार होता? ‘मेल्या मढय़ाक आगीचो भय नाय’, असा विचार करून गप्प राहिला. तसं इथल्या दशावतारात काम करायचं म्हणजे सोपं नाही. त्यांनी सांगितलं असलं, तरी ते अवघडच होतं. अहो, ‘पावनो इलो म्हनूं काय रेडो दुभना नाय’.. त्यानं स्वत:लाच सांगून बघितलं. आता काय करायचं, म्हणून स्वत:शीच विचार करू लागला. त्याला माहीत होतं, नथ देवक्  येतंत, नाक खंयसून देनार?.. आपण म्हणजे, आताच्या परिस्थितीत, आपण म्हणजे, चुकलां ढ्वॉर!.. तां धामापूरच्या तळ्यारच गावनार!.. त्यानं खूप डोकं खाजवलं. विचार केला. मनाशी ठरवलं. सांगल्यापेक्षा केलेलां बरा, नाक आपटून मेलेलां बरा.. आता यातूनच काय साधता आलं, तर बघायचं.. आनो देवचो नि रुपयो काढून घेवचो.. आता पुढचे दिवस असेच काढायचे. ग्वॉड करून खांवचा नि मऊ करून निजाचा.. हसांन दिवस घालवचे!.. मग त्याला हुरूप आला. मनाची तयारी झाली. जत्रेतल्या दशावतारात उतरायचं की नाही, हे अजून ठरलं नाही, पण उतरावं लागलं, तरी तयार राहायचं. आता वांद्रय़ाच्या दशावतारात तो हिरोचा पार्ट करणार अशी भूमका उठली, आणि मुंबईकर चाकरमान्यांनी मालवणाक जावचो बेत रद्द केल्यानी असा म्हणतत!

First Published on March 13, 2015 12:37 pm

Web Title: political clour in malvani fest