‘जुनाट वशीकरण पद्धती’ विधानसभेसाठीही कायम?
‘कसा पिसारा फुलला’ हा संजीव खांडेकर यांचा लेख (रविवार विशेष, २५ मे) वाचला.  एके ठिकाणी ते ‘अन्य पक्ष जुनाट वशीकरण पद्धती वापरून आपला प्रचार करीत होते’ अशा अर्थाचे विधान करतात. या विधानाला पुष्टी देणारी बातमी आदल्याच दिवशी (लोकसत्ता, २४ मे) आहे, आणि ती राष्ट्रवादीच्या बैठकीसंबंधी आहे. या बठकीत राष्ट्रवादी ज्या चुका दुरुस्त करण्यावर भर देते, त्या बहुतांशी भावनिक आणि मानसिकतेशी निगडित आहेत. वाढत चाललेला भ्रष्टाचार, अपूर्ण राहिलेली अनंत कामे, नेत्यांचा मुजोरपणा याबद्दल शरद पवारांसकट कोणीही अवाक्षर काढले नाही. बठकीत कोणत्याही ठोस (प्रॉडक्टिव्ह) उपाययोजना सुचवण्यात आलेल्या नाहीत.
बाकी ‘मोर’ झडलेल्या पिसांचा आहे की, खरोखरीच सुंदर पिसारा फुलवून उभा आहे, हे काळच ठरवेल.  
-अभय दातार, ऑपेरा हाऊस (मुंबई)

मिठाचा खडाच, पण बासुंदी नासवणारा नको!
भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी आज शपथ घेत असताना ‘आता पुरे ..’ हा अग्रलेख (२६ मे) दुधात मिठाचा खडा टाकल्यासारखा वाटतो.
पंतप्रधानपद हे भाजपला बऱ्याच नवसानंतर झालेले अपत्य नाही आहे तर बऱ्याच नवसानंतर अल्पमतातील लोकशाहीपद्धतीला पूर्ण बहुमत मिळून प्रजापती मिळाला आहे. त्या शपथग्रहण समारंभाला काही पुढच्या व्यूहरचनेच्या दृष्टीने वेगळ्या पद्धतीने साजरे करायचे ठरवले तर काय बिघडले? पूर्ण बहुमत मिळाल्याचे अप्रूप हे निकालानंतर एक दोन दिवसच असू शकते. तेव्हा अग्रलेखात ज्या ‘व्यापक हिताची’ काळजी उल्लेखली आहे त्या दृष्टीनेच हा खटाटोप चाललेला असू शकतो.
मोदी आणि पर्यायाने नव्या सरकारने या घटनेतून एका दगडात बरेच पक्षी मारले नसले तरी मारायच्या आवाक्यात नक्कीच आणून ठेवलेत. सार्कच्या सगळ्या आणि मॉरिशसच्या प्रमुखांना बोलावून काय काय साधले बघू या :
१) नवाझ शरीफ यांना निमंत्रण धाडले, पण थोडासा लगेचचा फायदा म्हणजे फूल ना फुलाची पाकळी म्हणून अटकेत असलेल्या मच्छिमार बांधवांना पाकिस्तानने सोडून त्यांच्या घरीदेखील ‘अच्छे दिन आनेवाले है’ ची झुळुक मिळाली. इतिहास सांगत असेल की गेल्या नवाझ शरीफ यांच्या भेटीनंतर तीन महिन्यात कारगिल घडले, पण याचा अर्थ त्याची पुनरावृत्ती होईलच असे नाही आणि असा विचार करणे राजकीय विचारापेक्षा अंधश्रद्धा वाटते. काश्मिरी जनताही या घटनेकडे मोठय़ा आशेने बघत असेल.
२) एलटीटीई प्रभाकरनच्या हत्येनंतर फिकी पडली आहे. तमिळ जनतेवर अत्याचार श्रीलंकेत अजूनही होतात, पण प्रमाण कमी आहे. अण्णा द्रमुक आणि द्रमुकच्या नेत्यांना स्थानिक जनतेला खुश ठेवण्यासाठी या समारंभावर बहिष्कार टाकावा लागेल, पण त्यांना स्थानिक पातळीवर शह देण्यासाठी रजनीकांत आणि विजयकांत यांनाही सोहळ्याचे आमंत्रण द्यायचा धूर्तपणा भाजपने दाखवला आहे.
३) अफगाणिस्तानचा आणि तालिबानचा तसे बघितले तर भारताला प्रत्यक्ष उपद्रव झालेला नाही. पण पाकिस्तान सीमेलगत ज्या दहशतवादी शाळा चालतात आणि त्यात असलेले विद्यार्थी गरज पडल्यास अफगाणिस्तानात पळ काढतात. यात मार्ग पुढे काढावा लागेल या दृष्टीने अफगाणिस्तानशी ‘न्यूट्रल’ संबंध तरी ठेवणे आवश्यक आहे. भारताची तेलाची आयात इराण, इराक, कुवेत आणि सौदी या देशांतून प्रामुख्याने आहे. तेव्हा करझाई जाऊन अब्दुल्ला अथवा घानी हे अध्यक्ष झाले तरी भारताचा त्यात ना विशेष नफा, ना तोटा आहे. करझाई हे पण आजच्या घडीला ते अध्यक्ष असल्याने ‘सहल’ असली तरी इतर सार्क देशांच्या प्रमुखांसह त्यांना बोलवण्याशिवाय पर्याय नाही. एरवी प्रजासत्ताक दिनाला येणारा पाहुणाही सहलच करतो.
४) नेपाळ, भूतान, बांगलादेश, मालदीवसारख्या लहान देशांशी आपला व्यापार एकूण व्यापाराच्या अगदी नगण्य टक्के आहे. पण त्यांना बोलवायचा हेतू व्यापारी वा राजकीय दिसत नाही. भौगोलिकदृष्टय़ा विचार करता दक्षिण आशियात चीनचा दबदबा आहे आणि चीनला मागे टाकणे भारताला नजीकच्या भविष्यकाळात शक्य नाही हेही सत्य आहे. चीनला शह देण्याकरता पश्चिमी राष्ट्रे साथीदार शोधत असताना भारत हा एकमेव साथीदार उरतो. अशा वेळी सार्क देशांच्या नावाने का होईना, भारताच्या एका हाकेने (कुठच्या का कारणाकरता असेना) यायला एकगठ्ठा इतके देश यायला तयार होतात हेही आपण दाखवू शकलो.
५) या सार्क देशांबरोबर मॉरिशसच्या प्रमुखांना बोलवायचा एक हेतू असू शकतो. आज करचुकवेगिरीच्या निमित्ताने बरेच व्यवहार मॉरिशसच्या मार्फत होतात. स्वित्र्झलडच्या काळ्या पशाची माहिती द्यायला तिथले सरकार, बँका सरळसरळ नकार देऊ शकतात. परदेशातला काळा पसा भारतात आणायला कटिबद्ध असल्याचे वचन जाहीरनाम्यात असल्याने मॉरिशसबरोबर सहकार्याचे धोरण असणे आवश्यक आहे.
अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे ‘धक्कातंत्र वापरून लोकप्रियता’ मिळवायचा हा उद्योग वाटत नसून पुढच्या डावपेचांची तयारीही असू शकते. जाता जाता राहिले ते वृत्तमूल्याच्या बाबतीत. त्याचे ताळतंत्र ठेवायचे काम वृत्तपत्राचे आहे.. त्यामुळे नवीन सरकारला जरा मधुचंद्रातून बाहेर तर येऊ द्या! उतावीळ टीका ‘आता पुरे..’ वृत्तपत्राच्या हातात असलेल्या मिठाच्या बरणीतून अळणी समाजव्यवस्थेत मीठ घालून ती सुधारायची की कुठे बासुंदी बनत असेल तर मीठ टाकून ती नासवायची?
-निमिष वा. पाटगांवकर, विलेपाल्रे (पूर्व), मुंबई</p>

चाहत्यांच्या बहुमतामुळे त्रुटी दाबल्या गेल्या..
संजीव खांडेकर यांच्या ‘कसा पिसारा फुलला’ या लेखात मोदी-विजयाची केलेली मीमांसा वेगळ्या प्रकारची असल्याने लक्षवेधक ठरते. खांडेकर यांनी डार्वनि आणि फ्रॉइड या दोघांच्या सिद्धान्तांना एकत्र आणून मोदी-विजयाला कारणीभूत असणारा भ्रष्टाचारातून निर्माण झालेला झगमगाट हा मोराच्या मादीला आकृष्ट करणाऱ्या परंतु मुळात मोराला शारीरिक दृष्टय़ा अनावश्यक असणाऱ्या पिसाऱ्याप्रमाणे असल्याचे म्हटले आहे. मानवाचा मेंदू विकसित होऊन तो वैचारिकदृष्टय़ा उत्क्रांत झाल्याने संभोगाची क्रिया गौण ठरली आहे. पण मानवेतर प्राणीमात्रात नर-मादीचा संयोग होऊन जाती-सातत्य टिकणे महत्त्वाचे ठरले आहे. अशा संयोगासाठी मादीला उद्युक्त करण्यासाठी मोराला पिसारा उपयोगी पडत असेल तर तो अनावश्यक कसा ठरतो?
तसेच ज्या डार्वनि आणि फ्रॉइडचे सिद्धान्त खांडेकर शिरोधार्य मानतात त्यांच्या सिद्धान्तातील त्रुटी त्यांचे समकालीन तेरे आणि मार्कोस यांनी व्यवस्थितरीत्या पुढे आणल्या होत्या, पण या द्वयीच्या चाहत्यांच्या पाशवी बहुमतामुळे त्या दाबल्या गेल्या.
  तसेच मोदींची जाहिरात हा फुलवलेला पिसारा असेल तर इतर सर्व पक्षांनी आपल्या मगदुराप्रमाणे पिसारे फुलवले होतेच. आपच्या केजरीवाल यांच्याकडेही प्रचारासाठी आलेले सगळे पसे स्वच्छ होते असे नाही.  थोडक्यात, मोदींचा विजय हा लंगिकतेला आवाहन करून अनतिकपणे मिळवला आहे हा निष्कर्ष खांडेकर यांनी प्रथम काढला आणि मग त्यासाठी विरोधाभासांनी भरलेला पिसारा डार्वनि आणि फ्रॉइड यांना वेठीला धरून फुलवला.
श्रीराम बापट, दादर (मुंबई)

loksabha election 2024 Peoples issues banished from campaigning in Vidarbha
विदर्भात जनसामान्यांचे प्रश्न प्रचारातून हद्दपार
lokmanas
लोकमानस: दांभिक नवनैतिकवाद्यांकडून अपेक्षा निरर्थक
rashmi barve
रामटेकमधील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र प्रकरण काय आहे? उमेदवाराची जातवैधता छाननी प्रक्रिया कशी असते?
Tarun Tejankit initiative by Loksatta to celebrate the creative achievements of the young generation
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!

.. देश सलामच करील!
संजीव खांडेकर त्यांच्या ‘कसा पिसारा फुलला’ या लेखात म्हणतात, ‘‘येथील समाजाला भ्रष्टाचार निर्मूलनात रस नाही, सशक्त लोकशाहीत मन नाही, चांगल्या कारभारात आस्था नाही, याची कल्पना असल्यामुळेच ‘मोदी विजया’च्या अश्वमेधाच्या घोडय़ाने कोटय़वधी रुपये उचलून, समोरच्या पक्षातील भ्रष्ट नेत्यांना कवटाळत त्यांना तिकिटे देऊन, आपल्या पक्षातील भ्रष्ट चेहऱ्यांवर ‘मोदी मुखवटे’ चढवून, दिमाखदार, चमचमते प्रचार अभियान उभे केले. भ्रष्टाचाराबद्दल थोडे तरी सोयरसुतक असते तर समोर बसलेल्या जनतेने हे हजारो कोटी रुपये सत्तेत येण्यापूर्वी कोण्या देवाने तुमच्या खिशात ओतले, असा प्रश्न विचारला असता. ‘कामातुराणां न भयं न लज्जा’ हे विधान डार्वनि वा फ्रॉइडने वाचले होते काय हे कळायला मार्ग नाही; परंतु लोकांच्या साक्षीने भ्रष्टाचारावर तोंडसुख घेताना निर्लज्जपणे  पैसा उधळण्याचे धाडस कसे येऊ शकते? ’’
पराकोटीच्या विषमतेने ग्रासलेल्या व गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी समान संधीचीच वानवा असलेल्या आपल्या देशात मोदींच्या कारकीर्दीत शेअरबाजार निर्देशांक उच्चांक प्रस्थापित करेल यात शंका नसावी; मात्र त्याचबरोबर ही राजवट शेतकऱ्यांच्या आत्महत्येचाही उच्चांक गाठेल अशी भयशंका अनाठायी नाही. तसे न करता सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन विकासाला मानवी चेहरा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून त्यात यशस्वी झाल्यास नव्या पंतप्रधानांना संपूर्ण देश आपले मतदान अस्थानी नव्हते या भावनेने सलाम करील.     
प्रमोद तावडे, डोंबिवली.