deshkalमुलीला मृत्यूनंतर चार दिवसांनी अग्नी देऊन आलेला तो मुलीचा बाप माझ्यासमोर हात जोडून उभा होता.. मी सौदा केला नाही, हे लोक मुलीच्या मृत्यूचे राजकारण करीत आहेत असे वाटत होते. तुम्ही कॅमेऱ्यासमोर जा व त्यांना सांगा की, येथून निघून जा. त्या लेकीच्या बापाचे कष्टाने खडबडीत झालेले हात राजकारण, प्रसारमाध्यमे व आपल्या संस्कृतीच्या तोंडावर थप्पड मारीत आहेत असे त्या क्षणी वाटले. पंजाबातील त्या मुलीच्या मृत्यूमागचा चेहरा कुणाकुणाचा आहे?

पंजाबमधील मोगा येथे सरकारी रुग्णालयात बसलेलो असताना माझ्या मनात एक विचित्र प्रश्न आला, जर मुलींच्या सायकलला दूरचित्रवाणीचे कॅमेरे असते तर आपला समाज, आपली संस्कृती व सरकार यांचे कसे चित्र दिसले असते.
रुग्णालयात पोलिसांची गर्दी असलेल्या खोलीत मी आकाशदीपशी बोलत होतो. मोगा हत्याकांडात मरण पावलेली अर्शदीप हिचा तो लहान भाऊ होता व बसमध्ये झालेला विनयभंगाचा प्रयत्न व नंतर तिला बसमधून फेकून देण्याच्या घटनेचा तो प्रत्यक्ष साक्षीदार होता. त्याचे वय असेल साधारण दहा-बारा वर्षे. तो मोगातील घटनेत जखमी झालेला नाही, पण आपल्यासारख्या लोकांच्या प्रश्नांनी त्याचे मन दगडासारखे कठीण बनले आहे. निर्विकारपणे तो बोलत होता. त्याने सांगितले, ‘बसमध्ये थोडे लोक होते. पहिल्यांदा माझ्या बहिणीची छेडछाड करण्यात आली, आईने त्यांना रोखले, पण नंतर त्यांनी माझ्या बहिणीला बसच्या बाहेर ढकलून दिले. ती जागीच मरण पावली. मग माझ्या आईलाही त्यांनी ढकलले.’
आकाशदीपची ती कहाणी ऐकताना माझे मनही कुठे तरी भरकटत होते. अगदी चाळीस वर्षे पूर्वीच्या काळात मन संचारत होते. मी सहाव्या इयत्तेत होतो व मोठय़ा बहिणीला सायकलच्या पांजरीवर बसवून शाळेत जात होतो. मुले शिटय़ा वाजवत होती, काही जण वाटेल ते बोलून जात होते, त्यांचे बोलणे मला नीट समजत नव्हते, पण बहिणीचा चेहरा मात्र रागाने लाल झाला होता. आता आठवत नाही हे सगळे किती दिवस चालले होते, पण कानात कर्कश वाजणाऱ्या शिटय़ा आजही ऐकू येतात. आजही मुलांच्या टोळक्यासमोरून जाणारी घाबरलेली मुलगी दिसली की मला मुलींच्या सायकलवर बसून बहिणीला मागे बसवून नेतानाचे ते दिवस आठवतात.
मी कधीच शिटी वाजवायला शिकलो नाही, पण एक गोष्ट शिकलो की, महिलांची सुरक्षा हा तिचे वर्तन, पोशाख यांच्याशी संबंधित प्रश्न नाही तर पुरुषांवरचे संस्कार, शिस्त, विवेक याच्याशी संबंधित आहे. बिचाऱ्या मुलींच्या सुरक्षेसाठी वसतिगृहाच्या उंच भिंती व पडद्यामागे त्यांना लपवण्याची गरज नाही, तर तरुण मुलांना त्यांच्या खोटय़ा मर्दानगीचे प्रदर्शन करण्यापासून परावृत्त करण्याची गरज आहे. मुलांवर संस्कारांची गरज आहे, त्यांना स्त्रीला सन्मान देण्याची शिकवण देण्याची गरज आहे. ते सुधारत नसतील तर अशा मानसिक आजार जडलेल्या व मर्दानगीचे प्रदर्शन करीत फिरणाऱ्यांना पकडून शिक्षा करण्याची गरज आहे.
आपला समाज व राजकारण यांनी स्त्रियांच्या सुरक्षेबाबतीत एकही धडा घेतलेला नाही. आजही आपण स्त्रियांना पुरुषांची मालमत्ताच समजतो. बहीण-आईचा आदर केला पाहिजे असे आपण म्हणतो तेव्हा आपली स्त्रीशी कधी ओळखच नसल्यासारखे दाखवत असतो. स्त्रियांच्या सुरक्षिततेच्या नावाखाली त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आपण आघाडीवर आहोत. पडद्यात झाकलेले, चार िभतींआड असलेले, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात व पोलिसांच्या गराडय़ात बंदिस्त जीवन कुठल्या स्त्रीला हवे असेल.. आपल्या राजकीय नेत्यांना आजही हे समजलेले नाही की, मुलीही मोकळ्या आकाशात चांदण्यात न्हाऊ इच्छितात, खुलेपणाने हसू खेळू इच्छितात, हास्यविनोदात मश्गूल राहू इच्छितात.
आपले रा
जकारण अजूनही त्या स्वप्नापासून दूर काही स्थूल प्रश्नांमध्ये गुंतलेले आहे. मोगाच्या रुग्णालयात अर्शदीपचे वडील सुखदेव यांच्याशी बोलताना राजकारणाचा तो किळसवाणा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर आला. गरीब सुखदेव घाबरलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर भीतीपेक्षा शंका जास्त दिसत होत्या. दिल्लीहून आलेल्या या मोठय़ा माणसाला अखेर काय हवे आहे, तो बाहेर जाऊन दूरचित्रवाणी वाहिन्यांना काय सांगेल, माझ्यावर विकला गेल्याचा आरोप तर करणार नाही ना.. अशा शंका त्याला येत असाव्यात असे वाटले.
मुलीला मृत्यूनंतर चार दिवसांनी अग्नी देऊन आलेला तो मुलीचा बाप माझ्यासमोर हात जोडून उभा होता. मी सौदा केला नाही, हे लोक मुलीच्या मृत्यूचे राजकारण करीत आहेत असे वाटत होते. तुम्ही कॅमेऱ्यासमोर जा व त्यांना सांगा की, येथून निघून जा. त्या लेकीच्या बापाचे कष्टाने खडबडीत झालेले हात राजकारण, प्रसारमाध्यमे व आपल्या संस्कृतीच्या तोंडावर थप्पड मारीत आहेत असे त्या क्षणी वाटले. ‘पीपली लाइव्ह’ माझ्या डोळ्यांसमोर चालले होते. अर्शदीपच्या बाबतीत बसमध्ये घडले तेवढीच अश्लीलता नव्हती तर सरकार व मंत्री तिच्या मरणावर जी विधाने करीत होते, प्रशासन व प्रसारमाध्यमांनी ती घटना ज्या पद्धतीने हाताळली तीही एक अश्लीलताच होती.
सरकारची अश्लीलता तर जगजाहीर आहे. पंजाबमध्ये पोलीस, प्रशासन व पक्ष तसेच बादल कुटुंब यांच्यात काही फरकच उरलेला नाही, सगळे काही तेच आहेत. पंजाबमध्ये धाकदपटशाचे राज्य आहे. उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांची ऑरबिट बससेवा त्याचा चालता फिरता नमुना आहे. या कंपनीचा मालकच आपल्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करायचा की नाही याचा निर्णय घेणार ही क्रूर चेष्टाच आहे. पंजाबमध्ये महिलांशी जोरजबरदस्तीची ही पहिली घटना नाही व शेवटचीही नाही, सरकारने आधीही काही केले नाही व आताही काही करण्याची आशा नाही
पण आपला समाज या पापातून मुक्त कसा होऊ शकेल? धक्कादायक बाब म्हणजे या घटनेत जे सहप्रवासी होते, त्यांच्यापैकी कुणीही या महिलेच्या व मुलीच्या बाजूने आवाज उठवला नाही. दोन वर्षांपूर्वी अमृतसरमध्ये अशीच घटना घडली होती. त्यात सत्ताधारी पक्षाचा नेता पोलीस निरीक्षकाच्या मुलीच्या मागे लागला होता. वडिलांनी त्याला विरोध केला असता गुंडांनी भर दिवसा त्या पोलीस निरीक्षकास गोळी घातली होती. सरदार भगतसिंगाचा पंजाब तो हाच का, असा प्रश्न येथे निर्माण होतो. गेल्या वर्षी मी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेलो होतो तेव्हा माझा सगळ्यात चांगला रोड शो मोगा शहरात झाला होता. मोगाच्या सरकारी रुग्णालयात आलो तेव्हा असा विचार मनात आला की, अर्शदीपबरोबर जे सहप्रवासी होते त्यांच्यात त्या रोड शोमधील लोकसुद्धा असतील..
जर मुलींच्या सायकलच्या पांजरीला दूरचित्रवाणीचे कॅमेरे लावलेले असते तर सरकारच नाही तर आपला चेहराही कुरूप दिसला असता. हे चित्र बदलण्यासाठी राजकारण करावे लागेल, पण केवळ आक्रोश, आरोप व दावे करून चालणार नाही तर स्त्रीचे मन जाणून घेऊन, आत्मपरीक्षण करून मगच स्त्रियांच्या प्रश्नांवर राजकारण केले पाहिजे.
योगेंद्र यादव
* लेखक कर्ते राजकीय विश्लेषक असून ‘स्वराज अभियान’ या उपक्रमाचे प्रणेते आहेत.
त्यांचा ई-मेल  yogendra.yadav@gmail.com