News Flash

कुणाही नेत्याला ना आस्था, ना तळमळ

‘‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ हा फलक चुकीचाच!’ हे गजानन कुलकर्णी यांचे पत्र (लोकमानस, ३० जुल) वाचले. सीमाप्रश्न सुटावा, ही मुळात काँग्रेसलाच आच नव्हती.

| August 2, 2014 03:24 am

‘‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ हा फलक चुकीचाच!’ हे गजानन कुलकर्णी यांचे पत्र (लोकमानस, ३० जुल) वाचले.  सीमाप्रश्न सुटावा, ही मुळात काँग्रेसलाच आच नव्हती. १९५६ ते १९७७ या कालावधीत केंद्र तसेच आताचा महाराष्ट्र नि कर्नाटक येथे काँग्रेसचेच राज्य असताना व पं. नेहरू, इंदिराजी असे नेते असताना, तो प्रश्न सुटला नाही, त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न झाले नाहीत.
मे २०१३ मध्ये कर्नाटकात पुन्हा काँग्रेस सत्तेवर आली. १९७७ नंतर ३६ वर्षांनी, पुन्हा केंद्रात, महाराष्ट्रात व कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आली. तेव्हा मी ‘सीमाप्रश्न सोडवण्याचा हाच तो ‘शुभयोग’ या अर्थाचे एक पत्र लिहिले व ‘लोकमानस’मध्ये ते (१४ मे, २०१३ च्या अंकात) प्रसिद्ध  झाले. तशात पृथ्वीराज चव्हाण व सिद्धरामय्या हे दोघेही सोनियाजींच्या मर्जीतील. चव्हाणांना सीमाप्रश्न सोडविण्याची इच्छा!  मी ते पत्र मुख्यमंत्री, शरद पवार, अजित पवार, नारायण राणे, छगन भुजबळ, उद्धव ठाकरे आदी  मान्यवरांना पाठविले. एकाकडूनही साधी पोच नाही, उत्तर लांबच राहिले. काही मराठी साहित्य क्षेत्रातील संस्थांनाही पाठविले. उत्तर नाही. वरील सर्वानी मुख्यमंत्र्यांना याविषयी विचारावे, असे लिहिले, पण परिणाम शून्य.  तेव्हा कुलकर्णी यांनी म्हटल्याप्रमाणे ‘या वादात ना कुणाला (नेत्याला)आस्था आहे ना कुणाला तळमळ’ हेच खरे.

संगीत हा व्यापक मनोधारणेचा एक भाग
अशोक राजवाडे यांचे ‘सहगान आणि समूहगान’ हे पत्र (लोकमानस, २६ जुल) वाचले. ‘समूहगानापासून ते स्व-सर्जनापर्यंतचा (म्हणजे स्थूलमानाने व्यक्तिकेंद्री) हा प्रवास नेमका कसा झाला आणि त्यात आपण काय कमावलं आणि काय गमावलं यावर कोणी तरी संगीतज्ञाने प्रकाशझोत टाकणं आवश्यक आहे. भारतीय अभिजात संगीतात ही समूहाला दूर ठेवण्याची प्रवृत्ती का आढळते, हा एक छळणारा प्रश्न आहे आणि तो प्रश्न सर्जनशील पद्धतीने सोडवण्याची नितांत आवश्यकता आहे.’ हा त्यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे.
ते पुढे म्हणतात, ‘संगीताचा एक महत्त्वाचा भाग संस्कृतिसापेक्ष आहे.’ मला वाटते की संगीत हा स्वतंत्र विषय नसून एका व्यापक मनोधारणेचा फक्त एक भाग असावा. इतर अनेक देशांच्या तुलनेत भारतात एक सांगितले जाते की, वैयक्तिक स्वच्छता चांगल्या दर्जाची (उदा. रोज सकाळी ‘शुचिर्भूत’ होणे) असणारा समाज सार्वजनिक स्वच्छता, पर्यावरणाचे संवर्धन याबाबत अत्यंत उदासीन आहे. धार्मिक क्षेत्रातही वैयक्तिक पातळीवरील ‘मोक्षा’च्या कल्पनेचे प्राबल्य आहे.
‘एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटीच राहू दे मला’ असो किंवा ‘..मला दादला नको गं बाई !’ हे एकटेच उरणे, (सामाजिक जाणिवा बाजूला टाकून) समरस होणे अशा स्वकेंद्रित वृत्तीचे चित्रण नाथांच्या बहुतेक भारुडात दिसते.
‘खुळभर दुधाच्या’ कहाणीतील ‘डय़ुटी फर्स्ट’ ही शिकवण समाजाने क्वचितच अंगीकारलेली आहे. ‘इच्छिता स्वातंत्र्य, द्या स्वातंत्र्य हे अन्यासही’ अशी सामाजिकतेची जाणीव दिसत नाही. याच मनोवृत्तीचे प्रदर्शन ऑनर कििलग, अ‍ॅसिड हल्ले, खळ्ळखटॅक्, कानाखाली आवाज काढणे, मतभेद, असहमती झाल्यावर पक्षपात इत्यादी हेत्वारोप करणे किंवा ‘घास घे रे ‘माझ्या(!)’ बाळा’ इत्यादीतून व्यक्त होते. आपल्या समाजाची मानसिकता उलगडून बघण्याची आणि राजवाडे म्हणतात त्याप्रमाणे ‘प्रश्न सर्जनशील पद्धतीने सोडवण्याची नितांत आवश्यकता आहे.. हे सगळं करण्यासाठी एका वेगळ्या प्रतिभेची गरज आहे.’
राजीव जोशी, नेरळ

युनायटेड वेस्टर्न बॅँकेची हत्या आयडीबीआयने तर घडवली नाही?
गिरीश कुबेर यांच्या ‘अन्यथा’ या  सदरातील ‘प्रश्न प्रेरणेचा..’ आणि ‘एका कारखान्याची हत्या’ हे लेख वाचले. परदेशात या लेखांमधील सत्यता अनुभवता येते. यातून जाणवतात त्या काही गोष्टी अशा..
१. आम्हा भारतीयांमध्ये ना संघभावना ना विजिगीषु वृत्ती. यामुळेच आपण प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या दिवशी वर्षांरंभ करतो.
प्रत्येकाचा नववर्ष दिन वेगवेगळा, सण वेगवेगळे, पद्धती वेगवेगळ्या. याचाच फायदा परकीयांनी घेतला आणि आपल्यावर राज्य केले.
 २. संघभावना नसल्यामुळे आम्ही कधीही एकत्रितपणे सर्वाच्याच हिताच्या योजना (जलव्यवस्थापन, रस्ते बांधणे, कचरा विल्हेवाट वगरे) गावपातळीवरसुद्धा करत नाही.
३. मनात सतत जीवनाविषयी असुरक्षितता. यामुळे खर्चापेक्षा साठवणुकीकडे ओढा अधिक. परिणामत: एकत्रित गुंतवणूक नाही.  
४. याचा फायदा घेण्यासाठी लबाड लोक एका वर्षांत रक्कम दुप्पट करून देणाऱ्या योजना आणतात आणि आपण त्यात बुद्धी गहाण ठेवून आपले कष्टाचे पसे गुंतवतो. ते बुडले की ‘सरकारने’ भरपाई द्यावी अशी मागणी करतो.
५. जास्त लबाड लोक असा आíथक गुन्हा न करता, सरळसरळ सरकारशीच संगनमत करून सरकारची भागीदारी असलेले व्यवसाय तोटय़ात आणून ते व्यवसायच कमी पशात ताब्यात (मुठ्ठी में) घेतात आणि आपण ‘ठेविले अनंते तसेची राहावे’ या आपल्या आवडत्या सिद्धान्तानुसार काहीच करत नाही.
लेख वाचताना एक विचार डोक्यात आला. या कारखान्याची अटळ हत्या दिसत असल्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी इतर गुंतवणूकदारांनी, विशेषत: त्यातील आयडीबीआय बॅँकेने घाईघाईत युनायटेड वेस्टर्न बॅँकेची हत्या तर घडवून आणली  नाही ना?               
नरेन्द्र थत्ते, अल खोबर, सौदी अरेबिया

उत्तरेकडे मंदिरात समूहगान सुरू होणे शक्य !
मुकुंद संगोराम यांच्या लेखावरची अशोक राजवाडे यांची प्रतिक्रिया (लोकमानस, २६ जुलै) वाचली. समूहगान ते स्व-सर्जनापर्यंतचा प्रवास नेमका कसा झाला, असा रास्त प्रश्न त्यांनी विचारला आहे.
 मला सुचलेले उत्तर असे -आजही दक्षिणेत मंदिरे व सहगायन व समूहगायन पद्धती मोठय़ा प्रमाणात व प्रभावात टिकून आहे. प्राचीन काळी तर तो जीवनाचा एक अविभाज्य भागच होता. पण त्या काळी उत्तरेकडे सततची आक्रमणे व मंदिरांची तोडफोड यामुळे देवळातली समूहाने गाणी गाण्याची पद्धती नाहीशी होऊ लागली असावी. त्या गाण्यातले प्रमुख हे राजाश्रयाला गेले असावेत व स्व- सर्जनाला व सादरीकरणाला सुरुवात झाली असावी. त्यातून गाव व प्रदेशाची ओळख सांगणारी घराणी सुरू झाली असावी. साहजिकच समूहकेंद्री गायन व वादन व्यक्तिकेंद्री होऊ लागले असावे. आजही महाआरतीप्रमाणे उत्तरेकडे मंदिरात समूहगान सुरू होऊ शकते.
सुरेश चांदवणकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2014 3:24 am

Web Title: politicians neglect yellur karnataka issue
टॅग : Yellur
Next Stories
1 आपत्ती-व्यवस्थापन जगण्यात कधी?
2 थलीशहांच्या उन्मादाचा हा खेळ !
3 आधीच खड्डे, तशात ही उत्सवांची नशा
Just Now!
X