इंटरनेट, मोबाइल, ई-मेल, अ‍ॅप्सच्या महाजालात तारसेवेची आठवण होतच नव्हती. भारतीय तार खात्याने तारेला जगवण्याचे भरपूर प्रयत्न केले. पण तंत्रज्ञानाच्या धबधब्यापुढे ही तार इतकी क्षीण झाली, की तिच्यात प्राण फुंकणे व्यर्थ ठरू लागले. त्यामुळे येत्या १५ जुलैपासून देशातील तारसेवा बंद होत आहे. या खात्यात काम केलेल्या दोघांनी पत्रलेखाद्वारे जागवलेल्या आठवणी..

 ‘कट्ट कडकट्ट कट्ट..’ हे संपादकीय (१५ जून ) वाचले व १९७३ च्या ४० वर्षांपूर्वीच्या आठवणी जागृत झाल्या. येत्या १५ जुलैपासून तारविभाग बंद होणार हे वाचून मन खिन्न झाले. जवळजवळ मी तार विभागात २० वर्षे ‘पोस्टल सिग्नलर’ म्हणून काम केले आहे. १९७१ ला मी पोस्टात क्लार्क म्हणून भरती झालो व १९७३ ला पोस्टल सिग्नलरची परीक्षा पास केली. त्यावेळी जो पोस्टल क्लार्क ही परीक्षा देत असे त्याला कायम स्वरूपी एक जास्त पगारवाढ दिली जाई. ही परीक्षा देण्यापूर्वी ऐकण्याची क्षमता, लिहिण्याची गती, समजण्याजोगे हस्ताक्षर याबाबत एक चाचणी घेतली जात असे. अशा क्लार्कला ‘पोस्टल सिग्नलर’ म्हटले जात असे. त्यावेळी भारतीय दळणवळण विभागाचे पोस्ट, टेलिग्राफ, टेलिफोन असे तीन विभाग होते. टेलिग्राफ विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास ‘टेलिग्राफिस्ट’ म्हटले जाई. गिरगाव येथील अलंकार थिएटर बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावर महाराष्ट्र व गोवा विभागासाठी तार विभागाचे मोर्सचे प्रशिक्षण केंद्र होते. एकूण साडेनऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये तारेच्या नियमांची माहिती, मोर्स यंत्राची रचना, त्या यंत्राचे कार्य कसे चालते, तारा कशा पाठवायच्या व स्वीकृत करायच्या याचे ट्रेनिंग दिले जात असे. कड-कट्ट-कड हा विशिष्ट ध्वनी निर्माण करणे हा कौशल्याचा भाग आहे. मोर्स यंत्राला दांडा अंगठा व पहिले बोट यात पकडून मनगट खाली-वर करताना कड-कट्ट हा ध्वनी निर्माण करण्यासाठी मोर्सचा दांडा किती पल्स दाबून धरायचा व किती पल्स सोडून द्यायचा यावर जादा भर दिला जात असे. हे कौशल्य  आत्मसात करण्यासाठी किमान तीन महिने तरी लागत. पोस्टात तार कार्यालय व फोनची सुविधा असे त्या पोस्टाला कंबाईन ऑफिस(उड) म्हणत. तार विभागाच्या कार्यालयाला डीटीओ म्हणत. भारतात एकूण जी तार कार्यालये असत त्या प्रत्येक तार कार्यालयाला विशिष्ट सांकेतिक शब्द वापरले जात. उदा. मंत्रालय पोस्टासाठी ‘इ-ठरा’ हा सांकेतिक शब्द असे. महाराष्ट्रातील तार कार्यालयातून तार पाठविणारा सिग्नलर मोर्स यंत्रावर ज्या कार्यालयासाठी सिग्नल पाठवीत असे त्या कार्यालयाचा सिग्नलर ‘एर क अट’ म्हणून उत्तर देत असे. या सिग्नल पद्धतीचे वैशिष्टय़ म्हणजे त्या लाइनवर असलेल्या सर्व तार कार्यालयांत हा सिग्नल वाजत असे. मात्र ज्या कार्यालयासाठी हा  सिग्नल असे तोच सिग्नलर पुढे काम करीत असे. तारेने संदेश पाठविण्याबरोबर तारमनिऑर्डर पाठविण्याची व्यवस्था होती. मोर्स यंत्राद्वारे संदेश गेल्यावर नंतर लेखी मेमो पाठविला जाई. बॅ. विठ्ठलराव गाडगीळ दळणवळण मंत्री असताना तीन विभाग वेगवेगळे झाले व पोस्ट खाते स्वतंत्रपणे काम करू लागले. हळूहळू पोस्टातून मोर्स यंत्रे असलेल्या ठिकाणी सिमेन्सचे टेलिप्रिंटर दिसू लागले. नंतर टेलिप्रिंटरवर तारा पाठविल्या जाऊ लागल्या.  
१९८० नंतर मुंबई शहरातून मोर्स यंत्रे असलेली पोस्टातील तार कार्यालये हळूहळू बंद झाली. मोर्स यंत्रावर काम करताना जे वातावरण होते त्याची काही वेगळीच मजा होती. कधी कधी वाईट हवामानामुळे वा तार पाठविण्याच्या पोस्टल सिग्नलरच्या निष्काळजीपणामुळे व तार स्वीकृत करणाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे चुकीचे संदेश दिले -घेतले जायचे. त्यामुळे विनोद व्हायचे व तार घेणाऱ्याला मनस्ताप सहन करायला लागायचा.
एकदा एका व्यापाऱ्याच्या पत्नीने पतीला मनमाडवरून तार पाठविली. क ंे ं३ टंल्लें.ि र३ं१३ केी्िरं३ी’८. तार पाठविणाऱ्या सिग्नलरने मनमाड या शब्दात एका अक्षराची चुकून जागा  सोडली. त्यामुळे ती तार घेणाऱ्याने अशी लिहून घेतली- क ंे ं३ ेंल्ल टं.ि र३ं१३ केी्िरं३ी’८. कधी कधी शब्दातील मागचे पुढचे स्पेलिंग विसरले तर त्यामुळेसुद्धा विनोद निर्माण व्हायचे. रँं१िंीि’्र५ी१ी िऐवजी रँं१ं िीि’्र५ी१ी िहा संदेश जायचा. दळणवळण क्षेत्रात संगणकीय क्रांती झाली व भारत सरकारने तार विभाग बंद करण्याचा निर्णय घेतला. असे असले तरी मोर्स-तारेचे ऐतिहासिक महत्त्व कमी होऊ शकत नाही. हा आठवीणींचा ऐतिहासिक ठेवा जपून ठेवला पाहिजे. सरकारी वा निमसरकारी संस्थेने तार विभागासाठी उपयोगात आणलेल्या साहित्याचे एखाद्या वस्तुसंग्रहालयात रूपांतर केले पाहिजे. तसेच छंद म्हणून वा एक कला म्हणून ज्याला कोणाला हे मोर्स यंत्र शिकायचे असेल अशांना या वस्तुसंग्रहालयातून शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. संदेश वहनासाठी फॅक्स, ई-मेल, मोबाइल आणखी बऱ्याच काही सुविधा आज उपलब्ध आहेत. असे असले तरी तारप्रणालीने जी सर्वसामान्यांची सेवा केली आहे; जीवनावश्यक क्षेत्रासाठी योगदान दिले आहे त्याचे ऋण म्हणून पुढच्या पिढीसाठी एक ठेव म्हणून तारप्रणालीच्या साहित्याचे वस्तुसंग्रहालय उभारावे अशी सूचना कराविशी वाटते. या मोर्स संग्रहालयात पोस्ट, तार, रेल्वे, शिपिंग, आर्मी इ. विभागातील संबंधित यंत्रे ठेवल्यास पुढच्या पिढीला एक चांगला ठेवा मिळेल.