महाराष्ट्रातल्या शहरांत/ निमशहरांत राहणारे आणि चालत्या चारचाकी गाडीची काळी काच अर्धी उघडून किंवा मोटरसायकलचा वेग जरा तुलनेनं कमी करून, मोबाइलवर बोलताबोलताच पच्चकन गुटख्याची पिंक थुंकणारे लोक तुम्हाला माहीत असतील. या लोकांच्या पायांत हमखास पांढऱ्या चपला असतात, अशी अधिक माहितीसुद्धा आपल्यापैकी अनेकांकडे असेल.. मुद्दा असा की हे पांढऱ्या चपलांचे लोक जसे दिसतात, तस्साच नवीन रवन्चायकुल दिसतो अगदी.
आणि तो आंतरराष्ट्रीय ख्यातीचा चित्रकार आहे. नवीनला पहिल्यांदा भेटल्यावर ती बेदरकार वाहनं, ते गुटखे, त्या पिंका, त्या चपला यापैकी काही म्हणजे काहीच आठवलं नाही, असं सहसा होत नाही. विनम्रपणेच सांगायचं तर, खुशालचेंडू दिसतो हा.. चित्रकार काय असा असतो का?
तडा जातो हो अशानं तडा.. माणसांचं दिसणं आणि असणं याविषयीच्या आपल्या कल्पनांना तडा तरी जातोच जातो.
हे तडे सांधायला नवीनची चित्रं तयार आहेत..
नवीन रवन्चायकुल यांची सगळी चित्रं, म्हटल्यास स्वत:बद्दलची. पण स्वत:त रममाण होणारी नाहीत. असं कसं काय? आपणा मराठीभाषक चित्र-प्रेक्षकांची जी एक ‘चित्र म्हणजे चित्रातली माणसे’ अशी अलिखित व्याख्या आहे, तिच्या अधीन राहून विचार केला तरीसुद्धा या चित्रांमध्ये नवीन रवन्चायकुल यानं स्वत:ला निमित्तमात्र मानलेलं आहे, हे कळेल. त्याच्या चित्रांमधली माणसं भारतीय, पाकिस्तानी, थाई, जपानी आणि या सर्वाचा मिळून जो काही मिश्र वंश नवीनच्याच घराण्यात वाढतोय, त्या वंशाची आहेत. या प्रत्येक माणसाला त्याची स्वतंत्र गोष्ट असणारच, असा विश्वास नवीन रवन्चायकुल याला वाटतो.. पण त्यापुढे, ही त्या माणसाची गोष्ट माझ्याशी कशी जोडली जातेय, याचा खूप विचार नवीन करतो. हे असे विचार करून काय होतं? तर चित्रात कुठली माणसं कुठल्या जागी हवीत हे त्याला कळतं.
लक्षात घ्या, अवतीभोवतीच्या आणि जिवंत माणसांना तो हे कमीअधिक महत्त्व देतोय. कुणाला किती महत्त्व दिलं हे ती माणसं प्रत्यक्षच पाहू शकणार आहेत. त्यावरनं कदाचित नवीनशी भांडू शकणार आहेत. पण तसं होत नाही. कारण नवीनला स्वत:ची गोष्ट सांगायची असली तरी ती आजच्या जगासाठी महत्त्वाची आहे, यावर या माणसांचा विश्वास बसतो.  
 नवीनचं नाव ‘नवीन’ असं आहे आणि आडनाव  ‘रवन्चायकुल’ आहे, यावरूनच या गोष्टीची सुरुवात होते. त्याचे आईवडील मूळचे पाकिस्तानातले हिंदू, फाळणी अटळ ठरल्यावर भारताऐवजी थायलंडमध्ये राहू लागलेल्या काही पंजाबी-सिंधी कुटुंबांपैकी एक. नवीनचा जन्म थायलंडमधलाच, १९७१ चा. चियान्गमाइ या उपनगरवजा गावात तो वाढला. चित्रकला चांगली होतीच, पण याला पर्यावरण वगैरे विषयांमध्ये रस होता. नदीचं गढूळ पाणी भरलेल्या परीक्षानळ्याच हारीनं मांडून याचं पहिलं मांडणशिल्प (इन्स्टॉलेशन) झालं होतं. रेखाटन उत्तम होतंच, रंगकामातही तरबेज होता, पण कलाशिक्षणानंतर त्यानं टॅक्सी चालवणं सुरू केलं तिथं त्या टॅक्सीतच हा छोटीछोटी चित्रं मांडायचा. विकायचा. इतरांपेक्षा कमवायचा, समकालीन चित्रकलेबद्दलची पुस्तकं आणूनआणून वाचायचा. पर्यावरणविषयक कलाकृतींमुळेच चित्रकलेची शिष्यवृत्ती मिळवून थायलंडहून जपानला गेला. तिथं पुढे जपानी मुलीशी लग्न केलं. एक मुलगी, ती आता दहाएक वर्षांची असेल.. २०११ साली नवीनच्या चित्रांमध्ये आणि त्याच्या त्याच प्रदर्शनातल्या एका पुतळ्यात त्याची ही मुलगी आठएक वर्षांची दिसली होती..
तुम्हाला ही मुलगी बघायची असेल तर नीट बघावं लागेल सोबतचं चित्र. त्यात साधारण मधोमध, बसलेल्या मुलांच्या शेजारी जी एक पाय वर केलेली आहे, ती याची मुलगी. हे पाय वर करणं नवीननंच शिकवलंय, भारत-पाकिस्तान सीमेवर रोज करतात, तसं!
या चित्रात जी बाकीची खूप माणसं आहेत, ती जुनी वाटताहेत. या सर्वानी साठ वर्षांपूर्वी आजच्या पाकिस्तानातून थायलंडमध्ये स्थलांतर केलं, त्यांचे किंवा त्यांच्या पुढल्या पिढीचे १९४० ते १९६० याच दशकांमधले फोटो नवीननं जमवले आणि तेच या चित्रात वापरले. पुन्हा इथं या चित्रात कोण कुठे उभं राहणार हे नवीननं ठरवलं. ही ठरवाठरवी तयार दृश्यापेक्षा निराळी होती. कोणाच्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं, हे नवीननं ठरवलं आहे आणि त्याप्रमाणे चित्रात एकेका माणसाचे आकार कमीअधिक केलेले आहेत. त्यामुळेच, एकेकटय़ांचे फोटो जमवून चित्रात मात्र ग्रुप फोटो दिसतो. या ग्रुप फोटोच्या अगदी कडेला असलेली माणसं मोठी दिसतात.
माणसांचं हे लहान-मोठं असणं प्रत्यक्षातलं नसतं. प्रत्येक माणसाची जी स्वत:ची गोष्ट असते, तिला कधी समांतर जाणारी, कधी तिच्याशी एकरूप होणारी अशी निराळी गोष्ट नवीन रचत असतो. मग, पंजाबी/सिंधी वंशाच्या थाई नागरिकांना सरदारचाचांनी कसा आधार दिला हे या चित्रात महत्त्वाचं ठरतं आणि बाकीच्या सगळ्यांची गोष्ट साधारण सारखीच आहे असं नवीनला वाटतं तेव्हा ते सगळे ग्रुप फोटोतल्यासारखे- एकेकटे उठून न दिसणारे होतात.
हिंदी सिनेमांची (बॉलीवूड, मूव्ही आदी शब्द प्रचलित होण्यापूर्वीच्या काळातली) पोस्टरं जशी ‘पिक्चरची स्टोरी’ आणि ‘हीरो/ हीरोइन/ व्हिलनचा भाव’ या दोन्हीला महत्त्व देऊन बनायची, त्या हिंदी सिनेमांच्या पोस्टरांमध्ये जसं एखाद्याचं- लक्षणीय ठरेल अशा – मुद्रेला महत्त्व असायचं.. तसं म्हणजे तसं म्हणजे तस्संच नवीनचं चित्र असतं. हे गेल्या पाचेक वर्षांत अनेकदा दिसलंय. त्याचं मुंबईतलं पहिलं प्रदर्शन २००८ साली ‘साक्षी गॅलरी’नं भरवलं, तेव्हापासून ते पुढे तो २०११ साली ‘व्हेनिस बिएनाले’मध्ये थायलंडच्या ‘पॅव्हिलियन’मधला एकमेव चित्रकार म्हणून निवडला गेला, त्या प्रतिष्ठेच्या संधीसाठी त्यानं केलेल्या कामातूनही ‘सिनेमा पोस्टर’सारखी रचना दिसली. २०१२ नंतर नवीनची चित्रं कमी दिसू लागली आहेत. व्हेनिसनंतर त्याचं आणखीही एक प्रदर्शन मुंबईत २०११ सालीच ‘साक्षी’नं भरवलं, तेव्हाची प्रचंड मोठी चित्रंही अशीच होती. या तिन्ही वेळी नवीनची भेट झाली होती, तेव्हा-तेव्हा त्याला हा सिनेमा-पोस्टरांसारख्या रचनेचा प्रश्न विचारला. नवीननं सरळ उत्तर दिलं नाही. कधी ‘मस्त ना? छान असतात ती (पोस्टरं)’ किंवा ‘मी कलेची लोकभाषा काय आहे ते पाहातो रे.. तू ते मी माझेच माओसारखे छोटे सोनेरी पुतळे केले होते पाहिले होतेस का? चीनमधल्या प्रदर्शनावेळी केले आणि पुढे इथं मुंबईत (२००८ च्या प्रदर्शनात) मांडले.. ती चिनी कलेची लोकभाषाच’ अशी उत्तरं त्यानं दिली. व्हेनिसला म्हणाला की, तिथल्या सर्वच लोकांना हिंदी सिनेमाचं पोस्टर कसं असतं ते माहीत नसणार असं वाटल्यामुळेच त्यानं एका काल्पनिक सिनेमाचं नावच त्या चित्रात हिंदीतसुद्धा लिहिलं. नवीनच्या या असंबद्ध उत्तरांमधून एक लक्षात आलं की, ‘इतर पात्रांमधून स्वत:ला हवी असलेली गोष्ट सांगणं’ या हेतूसाठी हिंदी सिनेमाच्या पोस्टरसारखी रचना ही नवीनला सर्वात सोयीची वाटते.
थायलंडमध्ये सिनेमा फार बहरला नाही, पण जो काही जनसामान्यांचा सिनेमा आहे, त्याची पोस्टरं ही अशीच असतात. फोटो सर्रास वापरले जाण्याअगोदर इंग्रजी सिनेमांची पोस्टरंही अशीच असायची.
दुसरीकडे, पुतळे घडवून घेणं, ‘नवीनलँड’ या काल्पनिक देशाच्या झेंडय़ासकट त्या देशाचं अस्तित्व दृश्यांमधून सांगण्याची साधनं (म्हणजे राजचिन्ह, पासपोर्ट वगैरे) वापरून कलाकृती घडवणं. ‘नवीन हे ज्यांचं नाव असेल त्यांना विनंती की मी या शहरात आलोय तेव्हा मला येऊन भेटा’ असं आवाहन काही शहरांमध्ये (मुंबई, बँकॉक, सिंगापूर) करणं.. हे सगळं मिळून नवीन रवन्चायकुल याची कला ही ‘समकालीन संकल्पनात्मक कला’ या सदरात मोडते.
या संकल्पनात्मक कलेबद्दल नंतर कधी तरी बोलूच, पण नवीन ‘चित्रासारखी चित्रं’ काढतो, तेव्हा तो माणसांकडे पाहातो, त्यांना स्वत:शी जोडून पाहातो आणि या अशा नात्याचं प्रकटीकरण त्याला सिनेमा-पोस्टरच्या रचनाबंधाप्रमाणे करावंसं वाटतं, हेही महत्त्वाचं आहेच.
का महत्त्वाचं आहे?
जनप्रिय किंवा उपयोजित कला, ही स्वत:हून मोठी नसते.. मात्र ही कला काही तंत्रांना जनसामान्यांपर्यंत नेण्यात       यशस्वी ठरलेली असते. अशी तंत्रं राजकीय-सामाजिक आशयाच्या कलेसाठी वापरणं, तसं करताना ‘हा घ्या सामाजिक आशय’ असं दडपून न देता स्वत:च्या बहुसांस्कृतिकतेला  खणून काढत स्वत:चा ‘समाज’ तरी कोणता, देश तरी    कोणता, असे खरेखुरे प्रश्न मांडण्याचा प्रामाणिक कलावंतपणा राखणं.. अशा बऱ्याच कारणांमुळे नवीन रवन्चायकुल याचं ‘पोस्टरसारखं दिसणारं चित्र’ महत्त्वाचं आहे. या चित्रांनी जनप्रियतेशी नातं जोडताना खरेपणा कायम ठेवला, म्हणून ते महत्त्वाचं.
स्वत:च्या सत्यापासून सामूहिक सत्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करताना कलाकार लोक शैलीचा, तंत्राचा जो ‘जनाधार’ शोधतात, त्याबद्दल जुलै महिन्यात आपण आणखी बोलू शकू.