दुचाकी, चारचाकी, हलक्या किंवा अवजड अशा सर्व वाहनांची आणि माणसांची जेथून ये जा चालते त्याला रस्ता म्हणतात, एवढय़ाच अर्थाने मुंबईतील वाहतुकीच्या मार्गाला रस्ता म्हणावे लागेल. किंवा, दुतर्फा इमारती किंवा बांधकामांच्या मधून वाट काढता येईल अशी मोकळी जागा म्हणजे रस्ता, अशीही मुंबईतील रस्त्यांची सुटसुटीत व्याख्या करता येईल. कारण, रस्ता या शब्दासाठी जो अर्थ अभिप्रेत आहे, तो मुंबईतील रस्त्यांसाठी मुळीच लागू होत नाही, हे आता पुरते स्पष्ट झाले आहे. पावसाळ्यातील रस्त्यांच्या दुर्दशेवर प्रसार माध्यमांनी विदारक प्रकाशझोत टाकल्यावर उच्च न्यायालयाने खड्डेमय रस्त्यांच्या गंभीर समस्येची स्वत:हून दखल घेत राज्य सरकार आणि पालिका प्रशासनावर ‘कारणे दाखवा’ नोटीस ठोकली, तेव्हा, रस्त्यांवरील खड्डय़ांची कारणे काय द्यायची या मुद्दय़ावर या यंत्रणांची कशी तिरपीट उडाली, हे दोनच दिवसांपूर्वी उघड झाले. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठीच्या आजवरच्या, म्हणजे, ‘हॉट मिक्स’, ‘कोल्ड मिक्स’सारख्या मोठा गाजावाजा केलेल्या साऱ्या उपाययोजना खड्डय़ात गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता नेमके कारण काय द्यायचे हा संभ्रम प्रशासनापुढे माजणेही साहजिकच होते. ही परिस्थिती सुधारण्यासाठी कोणती पावले उचलणार, हे न्यायालयासमोर स्पष्ट करण्याऐवजी त्याच समस्या आणि त्याच्या तकलादू कारणांचाच पाढा प्रशासन यंत्रणांनी वाचला. त्यामुळे खड्डेमुक्तीची कायमस्वरूपी योजना सध्या तरी प्रशासनाकडे नाही, हे उघड झाले. तसे असेल, तर खड्डेमुक्तीच्या नावाने वर्षांगणिक केलेल्या करोडो रुपयांच्या उधळपट्टीचाही जाब प्रशासनाला द्यावा लागणार आहे. पाऊस, खोदकाम आणि अवजड वाहनांची वाहतूक ही रस्त्यांच्या दयनीय अवस्थेची कारणे आहेत, असा केविलवाणा दावा करून पालिका प्रशासनांनी बचावाचा प्रयत्न केला असला, तरी खड्डय़ांच्या या कारणांचा जप याअगोदर असंख्य वेळा झालेला असल्याने, आता शेंबडय़ा पोराला झोपेतून उठविल्यानंतर तोदेखील हीच कारणे सांगेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे, पुन्हा तेच रडगाणे गाऊन आपली सुटका करून घेण्याचा हास्यास्पद प्रयत्न करणारी पालिका यंत्रणा आणि ‘ते आमचे काम नव्हेच’ असे सांगत समस्येच्या जबाबदारीपासून पळ काढणाऱ्या अन्य यंत्रणा या दोन्ही एकाच खोटय़ा नाण्याच्या दोन बाजू ठरतात.  ‘खड्डेमय रस्ते सुरू झाले की मुंबई आली असे खुशाल समजा’ असे सांगण्याचा परप्रांतांत प्रघात पडल्याचे गमतीने बोलले जाते. आता महापालिकेची अवस्था, चढत्या पाण्यापासून पिल्लाला वाचविण्याची कसरत करणाऱ्या त्या गोष्टीतील माकडिणीसारखी झाली आहे, एवढेच या साऱ्या कसरतीतून दिसत आहे. कधी कंत्राटदारांच्या निविदांचा मुद्दा, कधी तांत्रिक बाबींची ढाल, तर कधी अति पावसाचे आणि कधी अवजड वाहनांचे कारण अशी बचावाची अनेक साधने पायाखाली घेऊनही आरोपांचे पाणी गळ्यापर्यंत चढतच राहिले आहे. आता, मुंबईच्या रस्त्यांवर अवजड वाहनांना बंदी घालण्याचा विचार करण्याच्या स्थायी समिती अध्यक्षांनी दिलेल्या सल्ल्यावर प्रशासन विचार करत असल्याचे सांगण्यात येते. त्या गोष्टीतील माकडीण पिल्लाला वाचविण्यासाठी खटाटोप करत होती, पण पाणी नाकातोंडापर्यंत वर चढल्यानंतर अखेर त्या पिल्लालाच पायाखाली घेऊन स्वत:चा बचाव करण्याची वेळ तिच्यावर आली होती. तशी स्थिती इथे होऊ नये, याचे भान आता तरी ठेवावेच लागेल.