News Flash

प्र. ल. मयेकर

‘पांडगो इलो रे..’ किंवा ‘रातराणी’, ‘रानभूल’सारखी यशस्वी व्यावसायिक नाटके लिहिणारे प्रभाकर लक्ष्मण मयेकर यांचे त्याहीपेक्षा मोठे यश आज कदाचित आठवणार नाही..

| August 19, 2015 04:06 am

‘पांडगो इलो रे..’ किंवा ‘रातराणी’, ‘रानभूल’सारखी यशस्वी व्यावसायिक नाटके लिहिणारे प्रभाकर लक्ष्मण मयेकर यांचे त्याहीपेक्षा मोठे यश आज कदाचित आठवणार नाही.. त्या काळी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘राज्य नाटय़ स्पर्धे’त दोन  नाटकांनी मयेकरांना सवरेत्कृष्ट लेखनाची बक्षिसे मिळवून दिली, हे ते यश. यापैकी ‘अथं मनुस जगन हं’ आणि ‘मा अस साबरिन’ या त्या दोन नाटकांतून मयेकरांनी माणुसकीबद्दलचे जे चिंतन रंगभूमीवर आणले होते, ते त्यांनी ‘व्यावसायिक’ केले नाही. १९६० ते ८० या दशकांमधून १९९० च्या दशकात येण्याची क्षमता असलेला मी नाटककार आहे, हे मयेकरांनी दाखवून दिले.
‘सत्यकथे’त त्यांच्या काही कथाही प्रकाशित झाल्या. ‘मसीहा’ ही त्यांपैकीच टोकदार कथा निवडून तिचे नाटय़ रूपांतर मुंबईच्या ‘बेस्ट’ उपक्रमात नोकरीस असलेल्या मयेकरांनी केले व ‘बेस्ट’च्याच कला विभागाने स्पर्धेत सादर केले. ‘मा अस साबरिन’ या त्या नाटकाला १९८३ सालचे बक्षीस मिळाल्यावर पुढल्याच वर्षी ‘अथं मनुस जगन हं’ स्पर्धेत चमकले. इथे दिग्दर्शक-अभिनेते आणि त्यावेळी दूरदर्शनवरील निर्माते विनय आपटे तसेच ‘चंद्रलेखा’चे मोहन वाघ यांचे लक्ष मयेकरांकडे गेले. ‘दीपस्तंभ’, ‘रमले मी’, ‘गोडीगुलाबी’ अशी त्यांची अनेक नाटके वाघांनी सादर केली. संवाद व घटना यांतून उभ्या राहणाऱ्या नाटय़पूर्ण प्रसंगांची रेलचेल त्यांच्या व्यावसायिक नाटकांमध्ये असे. त्याआधी, स्पर्धेसाठी केलेल्या नाटकांतही नाटय़मयता होतीच, पण ‘अथं मनुस जगन हं’मधली आदिवासींची अगम्य भाषा खुद्द मयेकरांनीच निर्माण केलेली होती! ‘मनुस..’ किंवा ‘साबरिन..’सारखी निराळ्याच संस्कृतीतली, परंतु माणूसपण दाखवून देणारी नाटके प्रेक्षकांना रुचणार नाहीत, हे कुणीही न सांगता कळल्याप्रमाणे मयेकर आता, प्रेक्षकांना विषय ओळखीचा नि आपला वाटेल अशी काळजी घेऊनच लिहू लागले.. तेही सपक न होता! याचे कारण, त्यांच्या नाटकांत कलाटणी देणारे प्रसंग भरपूर असत आणि प्रत्येक व्यक्तिरेखा ठसठशीत असल्याने गुंतवून ठेवी. पुढे, नाटकाची कथा आजच्या काळातली हवी, हा संकेत झुगारून त्यांनी लिहिलेले ‘तक्षकयाग’ काहीसे हिंदुत्ववादी विचार मांडणारे होते. मोदी-प्रभावाच्या काळात ते दुसऱ्यांदाही रंगभूमीवर आले, पण चालले नाही.
मराठी नाटय़ परिषदेतर्फे नाटय़लेखनासाठी ‘राम गणेश गडकरी पुरस्कार’ (२०१०) याखेरीज एकही सन्मान मात्र मयेकरांना मिळाला नाही. रत्नागिरीतील नाटय़संमेलनाचे अध्यक्षपद मिळावे ही इच्छादेखील ‘माश्या शिंकल्या’ने अपुरी राहिली आणि मग, कर्करोगाने गाठेपर्यंत त्या ‘शिंकणाऱ्यां’शी मयेकर झुंजत राहिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2015 4:06 am

Web Title: prabhakar laxman mayekar profile
Next Stories
1 हमिदा सलीम
2 एन. वलारमथी
3 प्राची मिश्रा
Just Now!
X