रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणाच्या दिवशी सकाळी बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन आपल्या सहकाऱ्यांसमवेत माध्यम प्रतिनिधींना सामोरे जातात.   पतधोरण जाहीर झाले त्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत गव्हर्नरांच्या नेहमीच्या सहकाऱ्याच्या जोडीला एक नवीन चेहराही पाहावयास मिळाला. हा चेहरा होता रिझव्‍‌र्ह बँकेत नोव्हेंबर २०१४ मध्ये मुख्य महाव्यवस्थापक म्हणून दाखल झालेल्या प्राची मिश्रा यांचा.
८० वर्षांचा इतिहास असलेल्या रिझव्‍‌र्ह बँकेने प्रथमच चाळिशीतील मुख्य महाव्यवस्थापक पाहिला. रिझव्‍‌र्ह बँकेत सामान्यत: दोन डेप्युटी गव्हर्नर वगळता वरच्या पदांवर बाहेरील व्यक्ती दाखल होण्याची प्रथा नाही. राजन यांनी या प्रथेला छेद देण्याचे ठरविताच गव्हर्नर व कर्मचारी व अधिकारी संघटना यांच्यात वादास प्रारंभ झाला. त्यासाठी गव्हर्नरांनी संघटनांशी संवाद साधून मार्ग काढण्याचा इतिहास ताजा असल्याच्या पाश्र्वभूमीवर नचिकेत मोर व प्राची मिश्रा हे दोन मोहरे रिझव्‍‌र्ह बँकेत दाखल झाले. प्राची मिश्रा या रिझव्‍‌र्ह बँकेचे महत्त्वाचे काम असलेल्या आíथक धोरण ठरविणाऱ्या खात्याच्या प्रमुख आहेत.  पाटण्यात जन्मलेल्या मिश्रा यांच्याजवळचे नातेवाईक वैद्यकीय व्यवसायात तरी आहेत किंवा  बिहारी परंपरेला साजेसे सनदी अधिकारी.  प्राची मिश्रा यांचा महाविद्यालयीन जीवनात अर्थशास्त्र हा अभ्यासाचा विषय निवडण्याचा निर्णय कुटुंबीयांना फारसा पसंत पडला नाही. १९९९ मध्ये दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. बेंजामिन ग्रॅहम वॉरेन बफे असे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ जगाला देणाऱ्या कोलंबिया विद्यापीठाने २००४ मध्ये त्यांना अर्थशास्त्रातील विद्यावाचस्पतीची पदवी दिली.  भीमराव रामजी आंबेडकर यांनी अर्थशास्त्रातील सर्वोच्च पदवी याच विद्यापीठातून मिळविली होती. अमेरिकेत नोकरीत असताना, ज्यांची पुस्तके अभ्यासक्रमात होती ते स्टॅन्ली फिशर त्यांना वरिष्ठ म्हणून लाभले. रघुराम राजन हेदेखील मिश्रा यांचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत वरिष्ठ होते. व्यापक अर्थशास्त्राच्या जोडीला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र व राजकीय अर्थशास्त्राच्या त्या अभ्यासक आहेत.  गरिबांचे कैवारी समजणाऱ्या काँग्रेसच्या सत्ताकाळात, ‘या देशातील गरिबांचा आवाज रिझव्‍‌र्ह बँकेला ऐकावाच लागेल,’ असे परखड मत माजी गव्हर्नर डॉ. डी. सुब्बाराव यांनी आपल्या शेवटच्या भाषणात मांडले होते.
उजव्या विचारसरणीचे भाजप सरकार सत्तेवर असताना गरिबांचा आवाज ऐकण्याचे व त्या आवाजाला प्रतिसाद देण्याचे आव्हान प्राची मिश्रा यांच्यासमोर कैक पटीने वाढले आहे.