वॉशिंग्टन पोस्ट हे केवळ वृत्तपत्र नव्हे. ती एक संस्था – इन्स्टिटय़ूशन या अर्थाने – होती आणि आहे. पत्रनीतीचे पावित्र्य जपणारी वॉशिंग्टन पोस्टची समृद्ध परंपरा ते विकले गेले म्हणून थांबेल असे नाही. पण परंपेरचा वारसा असा बाजारशरण होणे, हे काही सुचिन्ह नाही, हेही तितकेच खरे.
वर्तमानपत्र ही रोज विकली जाणारी वस्तू आहे. हे एक सर्वसाधारण विधान झाले. त्याच्या थोडे खोलात गेले तर दिसेल, की काही वर्तमानपत्रे वाचक रोजच्या रोज विकत घेतात. काही वृत्तपत्रे मात्र वाचकांनी विकत घेण्याआधीच विकली गेलेली असतात! तेव्हा एखाद्या वृत्तपत्राच्या विक्रीच्या बातमीने आपल्याकडे फारशी खळबळ माजण्याचे तसे काही कारण नाही. किंबहुना या घटनेमध्ये काही बातमीमूल्य आहे असा संशयही कोणाला येऊ नये अशीच परिस्थिती आहे. असे असताना अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकाची विक्री झाल्याची घटना एक बातमीविषय ठरावी आणि त्यावरून आपल्या माध्यमवर्तुळातही हलकीशी खळबळ माजावी, हे जरा विशेषच म्हणावे लागेल. गेल्या सोमवारी वॉशिंग्टन पोस्ट विकले गेले. पण अर्थातच ते ‘त्या’ अर्थाने नव्हे. तसे विकले जाणाऱ्यातले ते नाही. वर्तमानपत्र धर्म म्हणून चालविण्याचा जमाना केव्हाच गेला. आम्ही आता बातम्या नव्हे, तर जाहिरातीची जागा विकतो असे सांगणाऱ्यांचा ‘काळ’ सध्या सुरू आहे. अशा परिस्थितीत आजही प्रामाणिकपणे पत्रधर्माचे पालन करणारी जी काही मोजकी वृत्तपत्रे शिल्लक आहेत, त्यांत वॉशिंग्टन पोस्टचे नाव अग्रस्थानी घ्यावे लागेल. त्यामुळेच डोनाल्ड ऊर्फ डॉन मेयर्स यांनी अमेझॉन डॉट कॉम या ऑनलाइन पुस्तकविक्री व्यवसायातील कंपनीचे जेफ बेझोस यांना हे दैनिक विकले, ही बातमी धक्कादायक ठरते. हा धक्का विक्री झाली याहून अधिक वॉशिंग्टन पोस्टसारख्या दैनिकावर ती वेळ आली याचा आहे.
काही महिन्यांत तंत्रज्ञानाची नवी पिढी येण्याचा सध्याचा काळ. हे बदलते तंत्रज्ञान आणि जागतिकीकरणाने बदललेले मूल्यकारण यामुळे एकूणच माध्यमांचे आणि त्यातही खासकरून मुद्रित माध्यमांचे अर्थकारण बदलले आहे. डिजिटल मीडियाचे मोठे आव्हान वृत्तपत्रांपुढे आहे. अमेरिकी समाजशास्त्रज्ञ ऑल्विन टॉफलर यांनी ‘थर्ड वेव्ह’मध्ये मांडलेली ‘प्रोझ्युमर’ ही संकल्पना माध्यमक्षेत्रास लागू होईल, असे त्यांनाही कधी वाटले नसेल. पण इंटरनेटवरील समाजमाध्यमांनी बातमीचे ग्राहक आणि उत्पादक यांतील सीमारेषाच पुसून टाकली आहे. दुसरीकडे माहितीचा प्रचंड कचरा रोजच्या रोज जमा होत आहे आणि त्या वावटळीत सर्वसामान्य वाचक भेलकांडून जात आहेत. दुसरीकडे वृत्तपत्रांचे वस्तूकरण करून त्यातील सत्त्वालाच हात घालीत काही माध्यम उद्योजकांनी आता वाचकांनाच सांगण्यास सुरुवात केली आहे, की तुम्हाला काहीही गंभीर वाचायला आवडत नाही. मुळात तुम्हाला वाचायलाच आवडत नाही. म्हणून आता तुम्ही फक्त आम्ही छापतो त्या जाहिराती पाहा आणि त्यालाच बातमी असे म्हणा. अशा तंत्राची कास ज्यांनी धरली, ती वृत्तपत्रे सर्वाधिक विक्रीचे आकडे मिरवत उडू लागली. मात्र अशा वातावरणातही काही दैनिके चमक दाखवित होती. वॉशिंग्टन पोस्ट हे त्यातलेच. त्याचा दबदबा मोठा. पण खप बेताचाच. पावणेपाच-पाच लाखांचा. परिणामी धंदा कमी. महसुली उत्पन्न कमी. अशा परिस्थितीत ‘वॉशिंग्टन पोस्ट कंपनी’ने हे दैनिक विकण्याचा निर्णय घेतला. वॉशिंग्टन पोस्टचे ‘निकटतम’ स्पर्धक पत्र न्यू यॉर्क टाइम्सचीही विक्री होणार अशी चर्चा आहे. टाइम्सने तसे काही घडणार नाही, असे स्पष्ट केले आहे. पण पुढचे कोणी सांगावे? पोस्टबाबत हे पहिल्यांदाच घडते आहे असेही नव्हे. यापूर्वीही दोन-तीन वेळा पोस्टची मालकी बदलली आहे. त्याचा यापूर्वीचा अखेरचा विक्रीव्यवहार झाला तो १९३३ मध्ये. तेव्हा दिवाळखोरीत निघालेले ते वृत्तपत्र फेडरल रिझव्र्हस् बोर्डचे गव्हर्नर यूजिन मेयर्स यांनी विकत घेतले. तेव्हापासून ते मेयर्स-ग्रॅहम घराण्याकडेच आहे. तर ते आर्थिक कारणांमुळे विकले गेले म्हणून कोणी वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. वाईट याचे आहे, की समाजाला जणू अशा चांगल्या वृत्तपत्रांची गरजच नाही, असा संदेश या व्यवहारातून जात आहे. चांगले चालत नाही आणि दुय्यम दर्जाचे ते खपते, ही गोष्ट समाजाच्या मानसिक आरोग्याबद्दल फार काही चांगले बोलत नसते.
वॉशिंग्टन पोस्ट हे केवळ वृत्तपत्र नव्हे. ती एक संस्था – इन्स्टिटय़ूशन या अर्थाने – होती आणि आहे. पत्रकारितेतील अनेक मापदंड या संस्थेने निर्माण केले. या वृत्तपत्रातील पत्रकारांनी आतापर्यंत तब्बल ४७ पुलित्झर पुरस्कार मिळविले आहेत. सत्तरच्या दशकात गाजलेले वॉटरगेट प्रकरण हा तर पोस्टच्या शिरपेचातील मानाचा तुरा होता. पोस्टचे प्रतिनिधी बॉब वुडवर्ड आणि कार्ल बर्नस्टेन यांनी ज्या पद्धतीने तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि व्हाइट हाऊसमधील त्यांच्याभोवतीच्या कोंडाळ्याने केलेल्या भ्रष्टाचाराचा गौप्यस्फोट केला, ते सर्व आता पत्रकारितेच्या इतिहासात अजरामर झाले आहे. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की वुडवर्ड आणि बर्नस्टिन यांना हे शक्य झाले, कारण वॉशिंग्टन पोस्टच्या प्रकाशक कॅथरिन मेयर्स ग्रॅहम आणि संपादक बेंजामिन ब्रॅडली हे त्यांच्या पाठीशी ठाम होते. हीच वॉशिंग्टन पोस्टची परंपरा होती. त्यासाठी पडेल ती किंमत मोजण्याचीही त्यांची तयारी होती. वाचकांप्रती बांधीलकी हा फार घासून गुळगुळीत झालेला शब्द आहे. परंतु वॉशिंग्टन पोस्टची बांधीलकी ही खरोखरच वाचकांप्रती होती. आणि ‘सत्य तेच सांगेन’ हा त्यांचा बाणा होता. आपल्या पत्रकारांसाठी पोस्टने जे नियम तयार केले होते, त्यात बातमी सत्याधारित असलीच पाहिजे या नियमाला अग्रस्थान आहे. वॉशिंग्टन पोस्टलाही ते नेहमीच जमले असे नाही. एके काळी तर हे पत्र एवढे डावे बनले होते की, पोटोमॅकवरचा प्रावदा म्हणून त्याची संभावना केली जात होती. परंतु ते त्याचे बळही होती. इराकवरील हल्ल्याच्या वेळी मात्र ते तद्दन उजवे बनले. पण असा अपघात हा अपवादच. नियम मूल्यांवर श्रद्धा ठेवण्याचा होता. वॉशिंग्टन पोस्टची विक्री झाली म्हणून ही परंपरा, ही मूल्ये संपतील असे मानण्याचे कारण नाही. हे पत्र ज्यांनी विकत घेतले ते जेफ बेझोस हे ‘रुपर्ट मर्डॉक’ आहेत, असा काही इतिहास नाही. उलट त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अमेझॉन डॉट कॉम ज्या कौशल्याने यशोशिखरावर नेली ते पाहता त्यांच्याकडून वॉशिंग्टन पोस्टबाबत अपेक्षाच अधिक आहेत. कदाचित ते या वृत्तपत्राची सांगड संगणकाशी घालून त्याचे व्यावसायिक गणितही ताळ्यावर आणतील. आज मात्र डॉन मेयर्स यांचा हा पोटोमॅकवरचा ‘प्रावदा’ विकला गेला, ही बातमी तोंडावर कडू चव आणणारीच ठरत आहे. चांगल्या परंपरा अशा बाजारशरण होणे, हे काही सुचिन्ह नाही.