राजेन्द्र यादव ही केवळ एक व्यक्ती नव्हती तर हिंदीतले ते एक अव्वल ज्ञानपीठ होते. मराठी साहित्यातल्या कंपूशाहीबद्दल बऱ्याचदा बोलले जाते, पण अमुक साहित्यिक हे ज्ञानपीठ आहेत, असे सहसा ऐकायला मिळत नाही. साहजिक आहे, तशी परंपराच मराठीत फारशी नाही. (खांडेकर, कुसुमाग्रज ही ज्ञानपीठे होती, पण मर्यादित अर्थाने) मराठीतल्या ज्येष्ठ-श्रेष्ठ लेखकाने दीर्घकाळ वाङ्मयीन मासिक चालवले आणि त्यात नवनव्या विचारधारा, साहित्यप्रवाह यांना सामावून घेत तरुण लेखकांना सतत उत्तेजन दिल्याचीही फारशी उदाहरणेही सापडत नाहीत. याउलट हिंदीमध्ये मात्र ज्येष्ठ-श्रेष्ठ साहित्यिकांची तितकीच दमदार-सशक्त ज्ञानपीठे पाहायला मिळतात. ‘ज्ञानोदय’चे रवीन्द्र कालिया, ‘बहुवचन’चे (माजी संपादक) अशोक वाजपेयी, ‘तद्भव’चे अखिलेश..‘हंस’चे राजेन्द्र यादव हे त्यापैकीच, पण अग्रणी. गेली २७ वर्षे यादव यांनी प्रेमचंदांनी सुरू केलेल्या ‘हंस’ या कथामासिकाचे एकहाती संपादन केले. एवढेच नव्हे तर त्याला हिंदीतील सर्वात आघाडीचे कथामासिक असा लौकिक मिळवून दिला. अनेक साहित्यिक वाद निर्माण केले. ओढवून घेतले. भरपूर लिहिले. यादव यांनी सगळ्याच गोष्टी तब्येतीत केल्या. ‘तेरी मेरी उसकी बात’ हे त्यांचे ‘हंस’मधील संपादकीय नितांत वाचनीय असे. हिंदी वाचणारा एक वर्ग केवळ यादव यांचे संपादकीय वाचण्यासाठी ‘हंस’ घेत असे. अंकातील साहित्यावर आणि खुद्द यादव यांच्यावर खडसून टीका करणारी पत्रे ‘हंस’मध्ये प्राध्यान्याने छापली जात. साहित्यिक-वैचारिक वाद, संस्कृतीची चिकित्सा, स्त्रीप्रश्नांविषयीची चर्चा, दलित लेखकांचे साहित्य, वैचारिक साहित्य, समीक्षा, नाटक, चित्रपट, संगीत, कला..‘हंस’ला कुठलाच विषय वज्र्य नव्हता. दलित साहित्य आणि स्त्रीसाहित्य यांचे तर ‘हंस’ हे हक्काचे व्यासपीठ होते. यादव यांच्यासाठी कुठलाच वाद अस्पर्शित नव्हता. भारतीय मिथकांपासून ते स्त्रीलेखकांच्या मुक्तसाहित्यातील अश्लीलतेपर्यंत अनेक विषयांतील वादस्थळे जागी केली, ती यादवांनीच. यादव मैत्री आणि दुश्मनी या दोन्ही गोष्टी टोकाला जाऊन करत. पण घमासान वाद घातल्यानंतरही समोरच्या व्यक्तीला चहा प्यायला घेऊन जात. हिंदीतील आघाडीच्या कथालेखिका मन्नू भंडारी या त्यांच्या पत्नी. चाळीस वर्षांच्या सहजीवनानंतर ते विभक्त झाले. तेव्हा मन्नू भंडारींनी आत्मचरित्र लिहून यादव यांच्यावर काही आरोप केले. मग त्यांनीही आपले आत्मचरित्र लिहिले. पण संयतपणे आपल्या चुका मान्य करत स्वत:ची बाजू मांडली. या पत्नी-पत्नीने एकत्रितपणे ‘एक इंच मुस्कान’ ही कादंबरी लिहिली आहे. यादव यांनी दमदार कथालेखनही केले. हिंदीतील ‘नई कहानी’चे ते कमलेश्वर, मोहन राकेश यांच्यासह एक प्रणेते होते. वयाच्या २२व्या वर्षी यादव यांची ‘प्रेत बोलते हैं’ ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीने पारंपरिक भारतीय संस्कृतीविषयी महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. त्यावर पुढे बासू चटर्जी यांनी ‘सारा आकाश’ या नावाने चित्रपटही बनवला. ‘उखडे हुए लोग’, ‘कुलटा’, ‘शह और मात’ या त्यांच्या कादंबऱ्या गाजल्या. पण त्यांच्या फटकळ बोलण्याने ते तितकेच अप्रियही होते. त्यामुळे त्यांच्या वाटय़ाला पुरस्कारांचे दान फारसे आले नाही. पण वाचकांचे, तरुण लेखकांचे प्रेम मात्र भरपूर आले. एक वाङ्मयीन नेतृत्व त्यांच्या निधनाने लोपले आहे.