गुजरातची राजधानी गांधीनगरपासून १९८ कि.मी.वर असलेले सौराष्ट्रातील भावनगर हे जिल्ह्य़ाचे ठिकाण ब्रिटिशराजमध्ये ७६७० चौ.कि.मी. क्षेत्रफळाचे महत्त्वाचे संस्थान होते. मारवाडचे गोहिल राजपूत आपसातील सत्तास्पध्रेमुळे तेराव्या शतकात दक्षिण सौराष्ट्राच्या समुद्रकिनारी प्रदेशात स्थलांतरित झाले. सेजकपूर, उमराला आणि सिहोर ही गावे त्यांनी तिथे वसविली. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला पिलाजी गायकवाडाने केलेले सर्व हल्ले सिहोरचा राजा भावसिंहजी गोहीलने परतविले, त्याने सिहोरपासून २० कि.मी.वर आपली राजधानी हलविली आणि या गावाचे नामकरण भावनगर असे केले. भावसिंह भावनगर येथे मजबूत किल्ला आणि शहराला कोट बांधून सुरक्षित केले. भावनगर बंदराचा त्याने विकास केल्यामुळे पुढची दोन शतकभर ते एक गजबजलेले बंदर राहिले. सागरी व्यापारातून महसूल उभा राहावा म्हणून भावसिंहने शेजारच्या सुरत आणि खंबायत या मोठय़ा व्यापारी बंदरांचे शासक सिद्दी यांच्याबरोबर काही करार केले. हे करार केल्यापासून भावनगर राज्याचा त्यांच्या बंदरातून चालणारा व्यापार अनेक पटींनी वाढला. भावनगर बंदरातून आफ्रिका, झांजीबार, मोझांबिक, सिंगापूर इत्यादी ठिकाणी दोन शतके मोठय़ा प्रमाणात व्यापार चालला. भावसिंहच्या काळात झालेल्या व्यापारवृद्धीमुळे राज्याची भरभराट होऊन एका छोटय़ा राज्याचे रूपांतर भावनगरच्या संपन्न, विशाल राज्यात झाले. भावसिंहने व्यापाराच्या साहाय्याने समृद्धी मिळवीत असतानाच आसपासचा प्रदेश घेऊन राज्यक्षेत्राचा विस्तारही केला. इ.स. १७२४ साली त्याने स्थापन केलेल्या भावनगर संस्थानचे शासन १७६४ साली त्याचा मृत्यू होईपर्यंत म्हणजे चाळीस वष्रे उत्तम प्रकारे सांभाळले.

सुनीत पोतनीस, sunitpotnis@rediffmail.com