साहित्य संमेलने हवीतच कशाला इथपासून ते मराठीतील हल्लीच्या साहित्यात कसच नाही इथपर्यंतच्या साऱ्याच छटांची नापसंतीदर्शक विधाने अवघ्या अडीच-तीन दिवसांत वातावरणात पसरू लागली आणि ती वाऱ्यावर विरण्याच्या आतच चिपळुणात ८६व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे सूप रविवारी वाजले. संमेलनाध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांनीही मग या नापसंतीदर्शक वक्तव्यांच्या मांदियाळीत सहभाग नोंदवला आणि धार्मिक प्रतीके संमेलनाच्या मंडपात आणू नका, अशी आवाहनवजा इशारा घंटा जाता जाता वाजवली. संमेलनाध्यक्षांनी ज्याबद्दल खडे बोल सुनावले ते धार्मिक प्रतीक कोणते, याची कल्पना सर्वानाच होती. नव्हे, कल्पना करावीच लागणार नाही इतक्या धडधडीतपणे हे प्रतीक संमेलनाच्या मांडवात प्रकटले होते. त्यामुळे संमेलनाध्यक्ष सरस्वतीबद्दल किंवा समईसारख्या गोष्टींबद्दल अथवा रांगोळय़ांमध्ये वापरल्या गेलेल्या एकाच धर्माच्या प्रतीकांबद्दल बोलत नसून परशुरामाच्या प्रतिमेबद्दल त्यांना बोलायचे असावे, अशी अटकळ बांधूनच साऱ्यांनी त्यांचे बोलणे गांभीर्याने ऐकले. यातही परशुराम हे धार्मिक प्रतीक नाहीच, ते तर कोकणचे भौगोलिक प्रतीक आणि परशुरामाने समुद्रात कोकणभूमी वसवली हा स्कंदपुराणातला उल्लेख म्हणजे वैज्ञानिक सत्य, असे मानणारे अनेक जण संमेलनाच्या मांडवात आणि मांडवाबाहेरही असतील; परंतु तसे न मानणाऱ्या थोडय़ांनी कोत्तापल्ले यांना काय म्हणायचे आहे, हे समजून घेतले. प्रतीके धार्मिक आहेत, म्हणून ती वापरू नका असे कोत्तापल्ले यांना म्हणायचे नसून संमेलनाचे आयोजकत्व, त्यातून येणारी सत्ता आणि अशा आयोजनांना साहजिकच मिळणारा लोकांचा प्रतिसाद यांचा फायदा धार्मिक अस्मितेच्या प्रदर्शनासाठी घेऊ नका, असे त्यांचे आवाहन असावे. तसे असेल तर मग, परशुरामाच्या प्रतीकाचा थेट उल्लेख कोत्तापल्ले यांनी केला की नाही, हा मुद्दाच गौण ठरतो. मात्र कोत्तापल्ले किंवा कुणीही कितीही बोलले, तरी तसे होईल असे मानण्यास अजिबात जागा नाही. याला कारणे अनेक आहेत. एकदा का अ. भा. मराठी साहित्य संमेलन हाच मराठी अस्मितेचा उत्सव मानला की मग तिथे मराठी मुलखात घट्ट होऊ पाहणाऱ्या अस्मिता दाखवून देण्याची ऊर्मी थांबवता येणार नाही. ही ऊर्मी आयोजकांची की संमेलन उधळून लावू म्हणणाऱ्यांची, याबद्दलचे वाददेखील पुन्हा आपण अमुक एका अस्मितेला किती महत्त्व देतो, याच्याच आधाराने प्रत्येक जण लढवणार, हे उघड आहे. हा अस्मितेचा उत्सव नसून साहित्याचा आहे, अशी भूमिका घेणे सर्वाना गैरसोयीचे वाटणारच, याचे कारण तशी भूमिका घेताना साहित्यातही निरनिराळय़ा अस्मिता असणार हे मान्य करून उत्सवाची फेरमांडणी करावी लागेल. साहित्य संमेलनातल्या परिसंवादांत ‘सेलेब्रिटी’सारखी राजकारण्यांची आणि व्यंगचित्रकारांच्या परिसंवादात छायाचित्रकारांचीही वर्णी लावणाऱ्या आजच्या काळात अशी फेरमांडणी साहित्यिक अंगाने होण्याची शक्यता कमीच आहे. आपल्या गावात आपलेच ऐकायचे, अशा संमेलनाधीशाच्या थाटात वागू लागलेले आयोजक तसे होऊ देणार नाहीत. अशा वेळी कोत्तापल्ले यांनी जाता जाता दिलेला इशारा म्हणजे पालथ्या घडय़ावर पाणी ठरावे. अध्यक्षीय सुरात सभेला चार युक्तीच्या गोष्टी सांगाव्यात, असा प्रयत्न माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनीही चंद्रपुरात केला होता. पण जागतिकीकरणानंतरच्या मराठी साहित्य-प्रवाहांचे महत्त्व जाणले पाहिजे, ही डहाके यांची अपेक्षा या उत्सवात किती फोल ठरते, हे चिपळुणात दिसले आहेच. संमेलनाध्यक्षांपेक्षा संमेलनाधीश मोठे, हे वारंवार दिसते आहे. धार्मिक प्रतीके हवी की नको, हे ठरवणारे कोत्तापल्ले कुणीही नाहीत आणि फार तर समांतर दिंडीत सहभागी होण्याचे स्वातंत्र्य त्यांनी घ्यावे, असा संमेलनाधीशांचा खाक्या असल्याचे चिपळुणात पहिल्याच दिवशी दिसले. प्रतीके उत्सवभर वापरली गेल्यानंतर ती वापरू नका, असे जाता जाता म्हणणे एवढाच मार्ग कुणाही संमेलनाध्यक्षाला संमेलनाधीशांनी खुला ठेवला होता आणि कोत्तापल्ले यांनी जे धाडस दाखवले, ते तो उपलब्ध मार्ग पत्करण्याचे!