‘स्पोर्ट्स फ्रॉड बिल’ नावाचे विधेयक आपले सरकार आणणार.. पण त्यातील ‘फ्रॉड’ कशास म्हणावे? राजकारण्यांनी क्रिकेट, फुटबॉल यांसारख्या खेळांच्या संघटनांचे अध्यक्ष होणे, २० षटकांच्या क्रिकेटमधून मनोरंजन करूनही कर मात्र चुकवणे.. हे सारे ‘फ्रॉड’ नव्हेत, असे समजून आम्ही आमचे अज्ञान आणखी वाढवून घ्यावे काय?
या नरेंद्र मोदी यांचे कवतिक करावे तितके थोडे. स्विस बँकेतून काळा पैसा काय आणणार, गंगा काय स्वच्छ करणार, राजकारणातील भ्रष्टाचार काय संपवणार.. त्यांच्या कर्तृत्वास काही सीमाच नाही. इतके कमी म्हणून की काय आता ते क्रीडा क्षेत्रातील भ्रष्टाचारही संपवणार आहेत म्हणे. हे फारच झाले म्हणायचे. वास्तविक भ्रष्टाचार ही एक क्रीडा आहे, असा आमचा समज होता. परंतु तो दृढ होतो न होतो तोच क्रीडा हाच भ्रष्टाचार आहे, याची जाणीव होऊन आम्ही एकदम शरमूनच गेलो. बारावी अनुत्तीर्णास विद्यापीठ आणि सर्व शिक्षण खात्याचे मंत्री झाल्याच्या स्मृतीने जी लाज वाटते तीच लाज क्रीडा हाच भ्रष्टाचार या जाणिवेने आम्हास वाटली. तेव्हापासून सर्वच क्रीडा आम्हास निरस वाटू लागल्या आहेत. असो. आमची रसहीन क्रीडा हा काही येथे चर्चेचा उद्देश नाही. मुद्दा आहे तो नरेंद्रभाईंच्या धाडसी निर्णयाचा. क्रीडा क्षेत्रातील भ्रष्टाचार संपवणारे विधेयक ते आणणार असून त्याबाबतचा कायदाही करणार आहेत. क्रिकेटच्या परिभाषेत बोलावयाचे झाल्यास (आम्हास त्याच भाषेत बोलावे लागेल. एक क्रिकेट आणि लहानपणी खेळलेला लगोरी नामक क्रीडा प्रकार वगळता आम्हास अन्य कोणत्याही क्रीडा प्रकारातील ओ की ठो समजत नाही.) नरेंद्रभाईंचा हा निर्णय म्हणजे एकाच वेळी मार्शल, गार्नर, रॉबर्ट्स, लिली, थॉम्प्सन आणि कपिलदेव यांच्या गोलंदाजीस तोंड देण्यासारखेच. नरेंद्रभाईंच्या धाडसाचे आम्हास कौतुक ते याचमुळे. अर्थात यावर आमच्याइतक्याच आमच्या अन्य निष्क्रिय सहकाऱ्याचे म्हणणे असे की मुदलात गुर्जर बांधव खेळात यथातथाच असतात. ते खेळतात ते सर्व खेळ बैठे. गल्ल्यावर बसून खेळायचे. त्यामुळे त्यांना मैदानी खेळात रस तर नसतो. त्याचमुळे ते भ्रष्टाचार दूर करू पाहतात तो मैदानी खेळांतील. बैठय़ा खेळांचा नाही. हेही असो. तर मोदी सरकार स्पोर्ट्स फ्रॉड बिल नामक विधेयक आणणार असून त्याद्वारे नुसते क्रीडापटूच नाही तर संघटना, पंच, क्रीडा संघटनांचे पदाधिकारी आदी अनेक संबंधितांच्या भ्रष्ट उद्योगास आळा घातला जाईल, असा सरकारचा विश्वास आहे. हा कायदा खरे तर मनमोहन सिंग सरकारच करणार होते. परंतु कोणताही भ्रष्टाचार रोखण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ए राजा यांच्यापासून ते जावईबापू रॉबर्ट वढेरा यांच्यापर्यंत अनेकांना दुखवणे हे चतुरोत्तम मनमोहन यांना ठाऊक असल्याने ते कोणाच्याच भ्रष्टाचारास आळा घालण्याच्या फंदात पडले नाहीत. परंतु मनमोहन यांच्याप्रमाणे नरेंद्रभाईंना कोणाच्याच जावयाची चिंता करावयाची नसल्याने त्यांनी या क्षेत्रातीलही भ्रष्टाचार समूळ उखडून टाकण्याचा वज्रनिर्धार केला आहे. अर्थात नरेंद्रभाईंचे सर्वच निर्धार वज्र असतात. तेव्हा स्वतंत्रपणे त्याचा उल्लेख करण्याची गरज नाही. पुन्हा एकदा असो. तेव्हा या विधेयकाचे जाहीर झालेले प्रारूप पाहून आमच्या मनी काही मूलभूत प्रश्न निर्माण झाले आहेत. ते वाचकांच्या मनापर्यंत पोहोचवण्याच्या कर्तव्यभावनेतून हा लेखप्रपंच.
या नव्या विधेयकाचे नाव स्पोर्ट्स फ्रॉड बिल. त्यावरून आम्हास पडलेले हे काही मूलभूत प्रश्न. त्यातील सर्वात प्रथम म्हणजे फ्रॉड नक्की कोणास म्हणावे? ज्याने आयुष्यात कधीही क्रिकेटची बॅटच काय पण कोणतेही फळकूट धरलेले नाही त्याने क्रिकेट संघटना चालवणे म्हणजे फ्रॉड काय? एखाद्याने राजकारणातील प्रतिस्पर्धी, प्रसारमाध्यमे हे सन्माननीय अपवाद वगळता अन्य कोणाला कधीही लाथ मारलेली नसेल त्याने फुटबॉल संघटनेचे तहहयात अध्यक्ष राहावे हा फ्रॉड आहे काय? प्रियरंजन दासमुन्शी यांच्या देदीप्यमान कामगिरीनंतर फुटबॉल संघटनेची सूत्रे प्रफुल्लभाई पटेल यांच्याकडे आली आहेत. यात काहीही फ्रॉड नाही हे कोणास पटेल काय? सचिन तेंडुलकर या महान खेळाडूस शतकांचा विक्रम लवकरात लवकर आणि सुखेनैव साजरा करता यावा यासाठी बांगलादेशासारख्या लिंबूटिंबूंतील लिंबूटिंबू संघाविरोधात सामना ठेवणे यास फ्रॉड म्हणावे काय? आपल्या आसपास मॅच फिक्सिंगचे प्रकार ढळढळीतपणे घडत असताना.. आम्ही नाही ते पाहिले असे म्हणणाऱ्या सचिन तेंडुलकराचे वागणे हे फ्रॉड या सदरात बसते काय? सचिन मराठी. तेव्हा मराठी मनात सहानुभूती निर्माण व्हावी यासाठी त्यास थेट भारतरत्न देणे हे तर फ्रॉड नव्हे? आणि ते तसे नसेल तर राजीव शुक्ल यांच्यासारख्या राजमान्य बांडगुळाचे बोट धरून संसदेपर्यंत जाणे हे फ्रॉड ठरते काय? खेळातील कोणा महानायकास बक्षिसी म्हणून मिळालेल्या मोटारीवरील कर माफ करणे म्हणजे तर फ्रॉड नव्हे? राजमान्य राजश्री राष्ट्रकुलदीपक सुरेश कलमाडी यांचे काही उद्योग या कायद्याच्या कचाटय़ात येणार काय? भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपल्या मतदारांची सरबराई करण्यासाठी कोलकाता येथील           सर्व पंचतारांकित हॉटेले बुक करणे हे तरी फ्रॉड या व्याख्येत बसेल काय? रा. रा. रा. कलमाडी यांना तोडीस तोड ठरतील अशा जगमोहन दालमिया यांचे कोणते उद्योग या फ्रॉड या व्याख्येत बसणार नाहीत, हे सरकार आपणास सांगेल काय? विजय कुमार मल्होत्रा हे तिरंदाजी संघटनेचे अध्यक्ष होते, यास फ्रॉड म्हणता येईल काय? भारतातील आदिवासी परंपरेने तीरकमठे चालवीत असतात. तेव्हा त्यांच्यातून जागतिक कीर्तीचा तिरंदाज तयार होईल अशी आशा दाखवत आदिवासींच्या नावे भलत्याच कारणांसाठी उधळपट्टी करणे हे       तरी फ्रॉड या व्याख्येत बसेल काय? लिंबाराम नामक एक तिरंदाज मध्यंतरी काही नेम साधून गेला. पुढे त्याचे सर्वच नेम चुकले. त्याचे जे काही कोणी केले हे फ्रॉड ठरते काय? हे सर्व काहीच नाही, असे आताचे उद्योग म्हणावयास हवेत. अलीकडे खेळाडूंचा लिलाव होतो आणि त्यासाठी बोली लागतात. बकरी ईद नामक सणाच्या पूर्वसंध्येस धट्टाकट्टा बोकड अधिक बोली घेतो तद्वतच चांगले तगडे क्रि केटपटू तितक्याच गलेलठ्ठ उद्योगपती    वा उद्योगपत्नींच्या गलेलठ्ठ बोलीवर विकले जातात आणि आपापसात वीस वीस षटकांचे सामने खेळतात, यास फ्रॉड म्हणावे काय? या सामन्यात क्रिकेटचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी सीमारेषेवर.. म्हणजे सभ्यासभ्यतेच्या सीमारेषेवर.. उत्तान नृत्य करीत असतात, त्याबाबत आम्हास काही म्हणावयाचे नाही. कारण पोटाची खळगी भरण्यासाठी कोणास काय करावे लागेल हे सांगता येत नाही. परंतु आमचा मुद्दा हा की ही असली थेरे खेळाच्या नावाखाली आयोजित करणे आणि जनताजनार्दनाचे मनोरंजन करूनही मनोरंजन कर न देणे यास का बरे फ्रॉड न म्हणावे? या खेळांडूना विकत घेणारे धनदांडगे सरकारी तिजोरीत कर भरीत नाहीत आणि तो वाचवून हा असा दौलतजादा करीत बसतात, हे तरी नक्कीच फ्रॉड या व्याख्येत बसेल काय? असो.
तेव्हा फ्रॉड ही भानगड काय आहे ते एकदा सरकारने स्पष्ट करावे. न जाणो इतके सगळे    होत असूनही खेळावर प्रेम करतो म्हणूनच  सामान्य नागरिकाच्या कपाळावर या फ्रॉडचा शिक्का बसावयाचा आणि तोच मोठा फ्रॉड ठरावयाचा. त्याचमुळे आम्हास प्रश्न पडला आहे, फ्रॉड म्हणजे रे काय भाऊ?

 

Devendra Fadnavis, Ajit Pawar & Eknath Shinde Astrology
शिंदे, पवार, फडणवीसांना ‘या’ अंकाचा धागा ठेवतो जोडून; २०२४ मध्ये मात्र येईल ‘हा’ अडथळा, ज्योतिषी काय सांगतात?
narayan rane marathi news, deepak kesarkar marathi news
वैयक्तिक स्वार्थापोटी अपशकून करत असेल तर पर्वा करणार नाही, नारायण राणे यांचा मित्र पक्षाच्या नेत्यांना टोला
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!
Girish Mahajan criticizes Unmesh Patil in jalgaon
“एक संधी नाकारताच पक्ष सोडणे म्हणजे…” गिरीश महाजन यांचा उन्मेष पाटील यांना टोला