ब्रिटिश कादंबरीकार जेन ऑस्टिन यांच्या जेम्स अँडय़ूज यांनी काढलेल्या पेंटिंगचा येत्या दहा डिसेंबरला लंडनमध्ये  लिलाव होणार आहे. त्यात हे पेंटिंग १५०० ते २००० पौंडांना (साधारणपणे दीड-दोन कोटी रुपये.) विकले जाण्याची शक्यता आहे. गेली १५० र्वष हे पेंटिंग जेनच्या नातेवाइकांकडे होतं. तेव्हा ब्रिटिश पौंडाच्या नोटेवर जे चित्र छापण्याचे ठरले आहे, त्याचेच हे मूळ चित्र!
चालू वर्ष हे जेनच्या ‘प्राइड अँड प्रेज्युडिस’ या गाजलेल्या कादंबरीचं जन्मद्विशताब्दी वर्ष आहे, तर अजून चार वर्षांनी जेनच्या निधनाला २०० र्वष होतील.
जेनने मोजून सहा कादंबऱ्या लिहिल्या. ‘सेन्स अँड सेन्सिबिलिटी’, ‘प्राइड अँड प्रेज्युडिस’, ‘मॅन्सफिल्ड पार्क’ आणि ‘इम्मा’ या तिच्या हयातीत तर ‘नॉर्थअँगर अ‍ॅबे’ आणि ‘परस्युएशन’ या निधनोत्तर प्रकाशित झाल्या. पण आतापर्यंत जेनची   डझनभर चरित्रं आणि तिच्या कादंबऱ्यांचे रसग्रहण, समीक्षा करणारी काही डझन पुस्तकं लिहिली गेली आहेत.