दिवाळीपूर्वीच्या निवडणुकांत ‘लक्ष्मीदर्शन’ हा शब्द प्रचलित झाला होता, तेथून आपण लक्ष्मीपूजनाकडे वाटचाल करतो आहोत. केवळ बाजार फुलला, यापुरते हे समाधान असू नये. धन निर्माण करणे आणि धन कमावणे या दोन्ही गोष्टींना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम पंतप्रधान मोदी यांना करावे लागणार आहे..
शिमगा संपल्याबरोबर दिवाळीला प्रारंभ व्हावा हा योग क्वचितच येतो. तो यंदा आला. हा शिमगोत्सव अर्थातच भारतीय लोकशाहीचा होता. त्याचे कवित्व तसे अजूनही संपलेले नाही. हा बहुधा दूरचित्रवाणी वाहिन्यांनी आणलेल्या ‘जाहिरातकारणे विश्रांती’ संस्कृतीचा परिणाम असावा. दिवाळीच्या ‘ब्रेक’नंतर तो कार्यक्रम नव्या दमाने सुरू होईल. परंतु त्यात आता लोकांचा सहभाग नसेल. दानात दान मतदान केले की मतदारराजाचा कर्माचा अधिकार संपतो. हे उमजण्याची शहाणीव भारतीय मतदारांत नेहमीच होती. त्यामुळे त्यांनीही आता आपला मोहरा दीपोत्सवाकडे वळवला असून त्याची साक्ष बाजारात गेल्या काही दिवसांत लोटलेली गर्दीच देईल. काही अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार बाजारातील हा उत्साह आणि नुकत्याच पार पडलेल्या निवडणुका यांचा अन्योन्यसंबंध आहे. तो असूही शकतो. किंबहुना राज्यातील सत्तालक्ष्मीकडे नजर ठेवून बसलेले नामदार नितीनभाऊ गडकरी यांनी आपल्या खास वैदर्भीय लटक्या-झटक्यांनिशी ते केव्हाच जाहीर करून टाकले आहे. निवडणुकीत लक्ष्मीदर्शन होणार आहे. ते घ्या पण मते आम्हांलाच द्या, असे त्यांनी भरसभेत सांगून टाकले होते. नामदार गडकरी यांनी आपण काहीतरी नवाच विनोद केला अशा थाटात हे ऐकविले. वास्तविक तो विनोद नव्हताच आणि नवा तर मुळीच नव्हता. भारतीय लोकशाहीचे हेही एक जुनेच वळण आहे. इतके प्राचीन की त्याची नाळ थेट पुराणांतील धार्मिक कथांशी जोडता येते. ‘आश्विनातल्या अमावास्येच्या दिवशी बळीच्या तावडीतून लक्ष्मीची सुटका करण्यात आली. म्हणून या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते’ असे सांगितले जाते. आता यातील बळी नेमका कोण? तो परंपरेनुसार शेतकरीराजा मानला तर त्यातून आणखी वेगळीच गुंतागुंत वाढते. बळी म्हणजे आज ज्यांना मगध वगैरे देशी महाबली म्हटले जाते तो हा अर्थ ध्यानी घेतला तर मात्र त्याचा संबंध थेट निवडणुकीशीही लावता येतो. या वर्षी निवडणुकीच्या काळात अनेकांना लक्ष्मी प्रसन्न झाल्याची बोलवा आहे. अशा गोष्टी कोणी चावडीवर येऊन सांगत नसते, परंतु ठिकठिकाणी लक्ष्मीची पावले उमटल्याचे थेटच दिसत होते. कधी ती भिंगरभिवरीसारखी चोरवाटांनी येत होती, तर कधी राजरोसपणे पक्षनिधीच्या नावाखाली फिरत होती. काही माध्यमगृहांना तर तिने विकाऊवार्तेच्या स्वरूपात दर्शन दिल्याचीही चर्चा आहे. तिचे स्वरूप वेगळे होते. कधी ती हिरव्याकंच नोटेसारखी होती, कधी चमकदार वस्तुरूपात होती. एकंदर या निवडणुकीत अनेकांची चांदी झाली. महर्गता महर्गता म्हणून नित्य विलाप करणारी मध्यमवर्गीय माणसेही या काळात मनसोक्त हसली. यामुळे राज्याच्या अनेक भागांत हल्ली मतदानाच्या आदल्या रात्रीलाच लक्ष्मीपूजनाचा सण म्हटले जाते असे ऐकिवात आहे. पण केवळ या ‘जनधन’ योजनेमुळेच बाजार फुलला असे नाही. त्याची कारणे अनेक आहेत. आणि त्यातील सर्वात महत्त्वाचे कारण निवडणुकीने झालेला सत्ताबदल हेच आहे.
देशात नुसताच सत्ताबदल झाला असे नाही. तसा तो दहा वर्षांपूर्वीही झाला होता. त्या वेळी पुन्हा एकदा मनमोहन सिंग यांच्यासारखा लक्ष्मीचा अभ्यासकच सत्तेवर आला होता. त्यांच्या गेल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत जागतिक स्तरावर आर्थिक अरिष्ट आले. त्या लाटेत अनेक पाश्चात्त्य देशांच्या अर्थव्यवस्था अक्षरश: धुपल्या. मनमोहन सिंगांचे कौतुक इतपतच की त्यांनी आपल्या अर्थव्यवस्थेला तगविले. लंकेची पार्वती होण्यापासून वाचविले. येथील मध्यमवर्गाला अच्छे दिनांची चटक लावली ती त्यांनीच. बाकी मग त्यांची दुसरी कारकीर्द गाजली ती त्यांच्या त्या ‘इकॉनॉमिस्ट’नेही शिक्कामोर्तब केलेल्या धोरणलकव्यामुळे आणि कोटी, अब्ज ओलांडून खर्व-निखर्वाच्या घरात गेलेल्या भ्रष्टाचारामुळे. या सर्व गोष्टींमुळे देशातील वातावरणात उदासीनतेचे मळभ दाटले होते. नरेंद्र मोदी यांच्या प्रचारवादळाने पहिल्यांदा ते हटविले. लोकांना त्यांनी अच्छे दिनांची स्वप्ने दाखविली. त्यातून ते सत्तेवर आले, पण एखाद्या गायकाला आपलीच एखादी तान आवडून जावी आणि त्याने मग पहाट झाली तरी त्याने तीच आळवत बसावी, असे काहीसे त्यांचे झाले. तरीही या काळात अर्थव्यवस्थेच्या चारी दिशी मंगल झाल्यासारखे वातावरण निर्माण झाले.
या भावनेचा अपेक्षित परिणाम झाला. सरकारी कंपन्यांतून निर्गुतवणूक, ‘मेक इन इंडिया’सारखा उपक्रम अशा विविध गोष्टींतून भांडवली बाजारात दिन दिन दिवाळी आली. अलीकडेच मोदी सरकारने डिझेल नियंत्रणमुक्त केले. त्यातून लक्ष्मीची पावले अधिक वेगाने फिरू लागतील अशी अपेक्षा आहे. तशी ती आताही फिरतच आहेत. धनत्रयोदशीला सोन्यासारख्या मौल्यवान धातूंची विक्री ३० टक्क्यांपर्यंत वाढली. घरांची मागणी २० टक्क्यांच्या पुढे गेली आहे. गेल्या चार-सहा महिन्यांत वाहन उद्योग घसरणीला लागला होता. त्यानेही आता ‘मोसम’ घेतला आहे. दिवाळीच्या काळात बाजार असा फुलणे यात फार आश्चर्यकारक असे काही नाही. परंतु या उत्सवाच्या तब्बल दहा दिवस आधी भल्या सकाळपासून फ्लिपकार्टादी ऑनलाइन दुकानी कोटय़वधी लोक खरेदीचा मनसोक्त आनंद लुटताना दिसले होते. एका दिवसात ६०० कोटींची खरेदी केली लोकांनी. ही सगळी बाजारातील अच्छे दिनांच्या आगमनाची ललकारीच होती. कोटय़वधी लोकांच्या कराग्रावर आता पैसा खेळू लागला आहे याचीच ही लक्षणे.
बाजारातील या उधाणामध्ये कोणाला चंगळवाद दिसेल. त्याने अनेकांच्या डाव्या पोटात दुखू लागेल. हा तसा पुराणा आजार. या रुग्णाईतांना पुढे मग दृष्टिदोषही जडतो आणि त्यात गरिबीसुद्धा भरभक्कम दिसू लागते. मराठीत धट्टीकट्टी गरिबी आणि लुळीपांगळी श्रीमंती असा एक तद्दन टाकाऊ वाक्प्रचार आहे. लक्ष्मीकडे आपण कोणत्या नजरेने पाहतो हेच त्यातून दिसते. वास्तविक दारिद्रय़ कधीच निरोगी असू शकत नाही. ते सर्व रोगांचे मूळ आहे. ते उखडून काढायचे असेल, तर लक्ष्मी फिरती राहावी लागते. त्यासाठी तिला मनोभावे पूजणारा, संपत्तिनिर्मितीमध्ये रस घेणारा समाज असावा लागतो. आपण लक्ष्मीच्या पूजनाचे विधी वगैरे तयार केले, पण आपले दारिद्रय़ असे की संपत्तिनिर्मिती ही संकल्पनासुद्धा आपल्या भाषेत नाही. आपण पैसा कमावतो. बनवत नाही. आपला देश उत्पादनात मागे आणि सेवाक्षेत्रात पुढे असणे ही काही ठरवून झालेली गोष्ट नाही. तो आपल्या गुणसूत्रांचा दोष. मोदी यांनी हे नेमके ताडले, हे त्यांचे वैशिष्टय़. त्यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठांना मात्र वाटलेल्या पैशांत लोकांनी लक्ष्मीदर्शन घ्यावे असे वाटावे याला काय म्हणावे? हा गडकरींचा अव्वल ‘मराठी’ विनोद असे म्हणता येईल. ‘मैं गुजराती हूं’ अशा शब्दांत आर्थिक शहाणपणाची चुणूक देणाऱ्या मोदींना नेमके अशा प्रवृत्तींशीच यापुढे लढावे लागणार आहे. धन निर्माण करणे आणि धन कमावणे या दोन्ही गोष्टींना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम आपल्या पंतप्रधानांना करावे लागणार आहे. लक्ष्मीच्या चेहऱ्याला लागलेली काळय़ा धनाची काळोखी पुसून टाकण्याचे वचन तर त्यांनी दिलेच आहे, पण ते काम कठीण आहे. ग्रीक आणि रोमन मिथकांमध्ये प्लूटो ही देवता संपत्तीची, पण या प्लूटोचेच दुसरे रूप मानली जाणारी अधोविश्वाची आहे आणि तिच्या नावाचा अर्थ संपत्ती असा होतो. गंमत अशी की हे मिथक आपल्याकडे वास्तव बनून अवतरताना दिसते.
अशी मिथके पुसून नव्या कथा रचणे हे यापुढे एक देश म्हणून आपल्याला करावे लागणार आहे. अन्यथा थांब लक्ष्मी, कुंकू लावते.. हे केवळ म्हणण्यापुरतेच राहील आणि लक्ष्मीपूजनाचा उपचार मात्र विधिवत पार पडत राहील.