नव्या विधानसभेतील काँग्रेस गटनेतेपदी आता राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड झाली आहे. हा पृथ्वीराज चव्हाण यांच्या पक्षांतर्गत विरोधकांच्या सामूहिक प्रयत्नांचा विजय की आणखी काही? विखे हे तडजोडीचे उमेदवार असल्याचे सांगितले जाते आणि दुय्यम विरोधी पक्ष म्हणून अस्तित्व टिकवण्याच्या धडपडीचे नेतृत्व त्यांच्याकडे आहे.  परंतु पृथ्वीराज चव्हाण यांना ज्या ‘संस्कृती’चा फटका बसला, ती कायम राखणारे विधिमंडळाबाहेरही आहेत..

महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आपल्या नेतृत्वाखाली लढवाव्या लागतील, असे राज्याच्या राजकारणात अनपेक्षितपणे दाखल झालेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना स्वतला पाच वर्षांपूर्वी कदाचित जाणवलेदेखील नसेल.  पण काँग्रेसमध्ये सारेच अनपेक्षितच असते, आणि केव्हाही काहीही घडू शकते, याची पक्की जाणीव काँग्रेसमध्येच राजकारण शिकलेल्या प्रत्येकालाच असल्यामुळे, पृथ्वीराज चव्हाण यांनी हा बदल सहजपणे पचविला होता. केंद्रातून अचानक महाराष्ट्रात येताना, संभाव्य विरोधाविषयी ते अगदीच अनभिज्ञ नव्हते, हे स्पष्टच आहे. पण एकीकडे सहकारी पक्ष म्हणविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला सांभाळताना तारेवरची कसरत करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांच्या विरोधात पक्षातील मोठी फळीच उभी राहिली होती, हे त्यांच्या उशीराच लक्षात आले होते.  
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सोमवारी ते प्रयोग शमले. अखेर पृथ्वीराज चव्हाण यांना पक्षात पुरते बाजूला सारण्याच्या साऱ्या प्रयत्नांना पक्षांतर्गत अगतिकतेच्या अपरिहार्यतेमुळे का होईना, यश आले, आणि वाताहत झालेल्या या पक्षाच्या पाटीलकीच्या दावेदारीचा संघर्ष अखेर संपला. पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात फारशी पायधूळ झाडली नाही म्हणून सुस्कारा सोडलेल्या काँग्रेसजनांनी तर त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाची गंमत पाहावयाचेच जणू ठरविले होते. लोकसभा निवडणुकीतील वाताहत लक्षात घेऊनच, विधानसभा निवडणुकीतील संभाव्य पराभवाचे खापर काँग्रेसजनांनी सामूहिकपणे नारायण राणे यांच्या हाती देऊन ठेवले होते, आणि ते उगारतच राणे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर बंडाचा झेंडा फडकावला होता. पक्षाच्या पराभवाचे धनी होण्याची आपली इच्छा नाही, असे सांगत राणे यांनी जणू काँग्रेसच्या निवडणुकोत्तर परिस्थितीचीच भविष्यवाणी वर्तविली होती. त्यामुळे त्यांना चुचकारल्यानंतरही, पक्षाला निवडणुकीत तारण्याची जबाबदारी मात्र पृथ्वीराज यांच्यावरच राहिली.
निकालानंतरही पुन्हा पक्षांतर्गत संघर्षांची खुमखुमी मात्र कायमच राहिलेली आहे. पृथ्वीराज चव्हाणांच्या विरोधात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बंड केल्यानंतर प्रचार प्रमुखपदाची जबाबदारी शिरावर पडलेल्या नारायण राणे यांनी चव्हाण यांच्यावरील शरसंधान थांबविले नाही. स्वतच्या पराभवाची मीमांसा करतानादेखील, जणू खापर फोडण्याची स्वपक्षीय चव्हाणविरोधकांनी सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याच्या भूमिकेतून राणे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर नेम साधलाच.
राज्याच्या सत्ताकारणात कितीही उलथापालथी झाल्या, तरी काँग्रेसला त्यामध्ये स्थान असेल, अशी दूरान्वयानेदेखील शक्यता नाही. अशा परिस्थितीत, विधानसभेत विरोधी बाकांवर बसणाऱ्या मूठभर काँग्रेसजनांचे नेतृत्व करण्याच्या मुद्दय़ावरून सुरू झालेला संघर्षदेखील पृथ्वीराज चव्हाण यांना पुरते नामोहरम करूनच शमला. पृथ्वीराज चव्हाण यांनी हाती घेतलेली शुद्धीकरण मोहीम हेच त्यामागाचे कारण, हे स्पष्ट आहे.
 ज्या राज्यात सत्तेचा प्रमुख काँग्रेसचा असतो, त्या राज्यातील पक्षाचा प्रमुख हा मुख्यमंत्र्याचा कट्टर विरोधक असतो. महाराष्ट्रात ही परंपरा सातत्याने पाळली गेली आहे. आजवरच्या प्रत्येक मुख्यमंत्र्याचा प्रदेशाध्यक्षाशी संघर्ष होत राहील याची काळजी केंद्रीय नेतृत्वाने जाणीवपूर्वक घेतली आहे. केंद्रीय नेतृत्वाची पसंती म्हणून महाराष्ट्रात आलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनाही त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात या परंपरेपासून सवलत मिळाली नाही. हे सारे विस्ताराने नमूद करण्याचे कारण असे की, नवी विधानसभा अस्तित्वात येण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काँग्रेसमध्ये सुरू झालेल्या सत्तासंघर्षांचे केंद्रस्थानही पृथ्वीराज चव्हाण हेच राहिले. मुळात, मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेल्या नारायण राणे यांनी जुलै महिन्यात मंत्रिपदाचा राजीनामा देऊन चव्हाण यांच्या नेतृत्वाविरुद्ध बंड पुकारले होते. आता नव्या विधानसभेत राणे नाहीतच. तरीही, विधिमंडळ काँग्रेसच्या गटनेतेपदासाठी मोर्चेबांधणी सुरू होताच पृथ्वीराज चव्हाण यांचा पत्ता कापण्यासाठी सर्वात पुढे तेच सरसावले. आत्ता निवडून आलेल्या कोणाही नेत्याच्या अंगी विधिमंडळ पक्षाचे नेतृत्व करण्याची क्षमता नाही असे सांगत त्यांनी चव्हाण यांच्यासमोर पहिला अडथळा उभा केलाच होता. सत्ता असो वा नसो, पदाच्या आणि नेतृत्वाचा मुद्दा निघाला की विरोध सुरू करणे ही जणू काँग्रेसी संस्कृतीच होऊन राहिली आहे. मूळचे काँग्रेसी नसलेले, तुलनेने पक्षात नवखेच असल्याने या संस्कृतीशी नाळ न जुळलेले नारायण राणे यांनी विरोधाच्या संस्कृतीचा झेंडा मात्र स्वतच्या खांद्यावर वाहिला, आणि पृथ्वीराज चव्हाण यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड होणार नाही, याची निश्चिती झाल्यानंतरच तो खाली ठेवला.
नव्या विधानसभेतील काँग्रेस गटनेतेपदी आता राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड झाली आहे. हा पृथ्वीराज चव्हाण यांच्या पक्षांतर्गत विरोधकांच्या सामूहिक प्रयत्नांचा विजय, की उरलेसुरले अस्तित्व टिकविण्याची केविलवाणी धडपड हे लवकरच स्पष्ट होईल. विधानसभेतील दारुण पराभवानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस पुरती खचली आहे. कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे मनोबलही खालावले आहे. पुन्हा उभे राहण्यासाठी लागणारी उमेद मिळविण्याकरिता कोठे पाहावयाचे, हेदेखील महाराष्ट्रातील काँग्रेसजनांना अजून उमगलेले नाही. ज्या दिल्लीश्वरांच्या सत्ताशीर्वादासाठी आजवर सारे काँग्रेसजन उत्तरेकडे धाव घेत असत, त्या दिल्लीतही पक्षात सारे सामसूमच आहे. त्यामुळे, काँग्रेसचे महाराष्ट्रात जे काही अस्तित्व उरले आहे, ते टिकविणे हे विधिमंडळ गटनेत्यासमोरील आव्हान असणार, हे निश्चितच आहे. चव्हाण यांच्या नेतृत्वावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवणारे नारायण राणे निवडणुकीतील पराभवामुळे या जबाबदारीतून आपोआपच मुक्त झालेले आहेत. तर विखे पाटील ही तडजोडीची निवड असल्याचे बोलले जात आहे. मरगळलेला व सत्तेच्या गाद्यांवर ऐषारामाची सवय लागलेला काँग्रेसजन सत्तेविना विरोधी बाकांवर किती काळ राहू शकतो, या चिंतेचे सावट यापुढे काँग्रेसवर सातत्याने राहणार आहे. अल्पमतात असतानादेखील केंद्रातील भक्कम बहुमताचे सरकार पाठीशी असल्याने निर्धास्त असलेले भाजप सरकार सत्तेचा बहुमताचा आकडा टिकविण्यासाठी ज्या खेळी करेल, त्यास पक्षातील कुणीही बळी पडणार नाही याची काळजी घेण्याचे आव्हानदेखील नव्या गटनेत्यासमोर आहे.
राज्याच्या विधानसभेत काँग्रेस हा संख्याबळानुसार दुसऱ्या क्रमांकाचा विरोधी पक्ष आहे. दुय्यम विरोधी पक्ष म्हणून काम करताना, अगोदर याच राज्यात आपल्या पक्षाने सरकार चालविले होते, याची जाणीवही काँग्रेसला ठेवावी लागणार आहे. साहजिकच, काँग्रेसी नेतृत्वाखालील सरकारच्या कर्तबगारीचे सारे खापर वेळोवेळी काँग्रेसवरच जेव्हा फोडले जाईल, तेव्हा त्यातून सुरक्षितपणे बाहेर कसे पडायचे याचे कसब काँग्रेसच्या नव्या गटनेत्याला अंगी बाणवावे लागणार आहे. विखे पाटील यांच्याकडे ते आहे की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. कदाचित, त्यामुळे काही काळानंतर या नेतृत्वाविरुद्धही पुन्हा बंडाचे आणि टीकेचे झेंडे फडकावले जातीलच. त्यासाठी विधिमंडळाबाहेरही अनेकजण तयार असतील. ती तर पक्षाची संस्कृतीच आहे.
dinesh.gune@expressindia.com