मराठी साहित्यात संशोधक, समीक्षकांची मोठी परंपरा आहे. प्रा. मा. ना. आचार्य हे त्यापैकीच एक नाव. अलिबागमधील चौलसारख्या छोटय़ा गावात राहून त्यांनी साहित्य-संशोधनात हयात घालविली. संतकाव्य, मराठी व संस्कृत साहित्य आणि व्याकरण हे त्यांच्या संशोधनाचे प्रमुख विषय होते. ‘अनुषंग’, ‘मराठी व्याकरण विवेक’, ‘ज्ञानमयूरांची कविता’, ‘आर्याभारत नवदर्शन’, ‘पञ्चपदी’ ज्ञानेश्वरी, ‘ध्वनितांचें केणें’ आणि ‘कारुण्यकोकिळा’ ही त्यांची प्रमुख पुस्तके. ‘आलोचना’, ‘भाषा आणि जीवन’, ‘ललित’ आणि ‘सत्यकथा’ या मासिकांमध्ये लेखनही त्यांनी नेमाने केले होते. कुठल्याही प्रकारच्या प्रसिद्धीचा हव्यास न धरता त्यांचे लिखाण सुरू असे.
अलिबागनजीकच्या चौलमध्येच वडिलांकडे गुरुकुल पद्धतीने ते शिकले. आचार्याचे वडील संस्कृतचे अभ्यासक होते. तोच वारसा त्यांनी संस्कृत साहित्यात संशोधन करून जपला. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते मुंबईला आले, त्या काळात प्रा. न. र. फाटक यांसारख्या विद्वान प्राध्यापकांचा सहवास त्यांना लाभला. मराठीतील ज्येष्ठ समीक्षक वा. ल. कुळकर्णी यांचा आचार्याच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव होता. संशोधन म्हणजे सूक्ष्म निरीक्षण आणि सूक्ष्म विचार, ही वालंची शिस्त आचार्य यांच्या लिखाणातून दिसते.
एक अभ्यासू आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, व्रतस्थ संशोधक, उत्तम आणि वक्तशीर व्यक्ती अशी गुणवैशिष्टय़े प्रा. आचार्याबद्दल सांगता येतील. वर्गात एखादा विषय शिकवताना पूर्ण अभ्यासानिशी, परिपूर्ण नोट्स घेऊन जाणं, विद्यार्थ्यांच्या प्रत्येक शंकांना समर्पक उत्तरं देणं ही त्यांच्या अध्यापनाची शिस्त होती. अलिबागच्या जेएसएम महाविद्यालयात विद्यार्थीप्रिय प्राध्यापक असले तरीही त्यांच्या भोवती विद्यार्थ्यांचा गराडा पडला आहे, असे चित्र कधी नसे. परंतु आपल्याकडील ज्ञान विद्यार्थ्यांला भरभरून देत. आचार्याची वर्गातील व्याख्याने अभ्यासपूर्ण, मुद्देसूद आणि सर्वस्पर्शी असत. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन झाल्याशिवाय तास संपवायचा नाही, हा त्यांचा शिरस्ता होता.
जुन्या ग्रंथांमधील संदर्भाचा सातत्याने शोध घेणे, हा त्यांच्या संशोधनाचा पिंड होता. एकाच गोष्टीला विविध संदर्भाची जोड देताना त्यावर केलेले मार्मिक भाष्य यामुळे त्यांचे संशोधनपर लिखाण ललितगद्याच्या अंगाने जाणारे असूनही त्याला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. प्रा. रा. श्री. जोग, प्रा. के. ना. वाटवे, प्रा. द. के. केळकर यांच्या परंपरेतील एक संशोधक- अभ्यासक म्हणून ते मानले जात. आधुनिक मराठी साहित्यातही त्यांचा विशेष रस होता. मात्र आधुनिक मराठीच्या संशोधनात ते रमले नाहीत. संस्कृत पुराणे, वेद, उपनिषदे, रामायण-महाभारतादी काव्ये यांच्या अन्वयार्थाचे एक अभ्यासक म्हणूनच ते ओळखले जातात.