जामिया मिलिया इस्लामिया व अलिगढ मुस्लीम विद्यापीठाने अनेक विद्वान भारताला दिले. त्यातील एक म्हणजे प्रा. मुजीब रिझवी. त्यांच्या निधनाने स्वातंत्र्यपूर्व ते आताच्या काळापर्यंतच्या इतिहासातील साक्षीदार आपण गमावला आहे.
जामिया मिलिया विद्यापीठात त्यांनी प्र-कुलगुरू , भाषा व मानवविद्या विभागाचे अधिष्ठाता म्हणून काम केले होते.  मध्ययुगीन अवधी व ब्रज कवितांमधील ते तज्ज्ञ होते. मुघलपूर्व काळातील सुफी काव्य आख्यान तसेच कबीरदास, तुलसीदास, अमीर खुस्रो यांच्यावर त्यांनी बरेच लेखन केले आहे. सोळाव्या शतकातील हिंदूी कवी मलिक महंमद  यांच्यावर ते अधिकारवाणीने बोलत. रिझवी यांचा जन्म अलाहाबादेतला. त्यावेळी अलाहाबाद हे राष्ट्रवादी चळवळींचे केंद्र होते. त्यांचे शिक्षण अलिगढ मुस्लीम विद्यापीठात झाले. जामिया मिलियात त्यांनी अध्यापन केले. ३० वर्षे त्यांनी हिंदी विभागाचे प्रमुखपद सांभाळले. हिंदू-मुस्लीम, उर्दू-हिंदी अशा सर्व पंडितांशी त्यांचे खंडनमंडन चालत असे. त्यांना आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासण्याची संधी मिळाली. त्याचे श्रेय ताराचंद, नुरुल हसन, सतीशचंद्र यांना होते. शिक्षण घेत असताना ते प्रसिद्ध गांधीवादी सुंदरलाल यांच्या प्रभावाखाली आले. तेलंगण येथे कम्युनिस्ट पक्षाच्या उठावावेळी त्यांनी सुंदरलाल यांच्या शांतीमोहिमेत भाग घेतला. ‘भारत में अंग्रेजी राज’ या त्यांच्या पुस्तकावर त्यावेळी बंदी घालण्यात आली. नंतर त्यांनी ‘हाऊ इंडिया लॉस्ट हर फ्रीडम’ हे पुस्तक लिहिले. त्या काळात फ्रँझ फॅनन व सी.एल.आर. जेम्स यांनी त्यांच्या पुस्तकांची दखल घेतली. महात्मा गांधी व सुंदरलाल यांनी प्रत्यक्ष इंग्रजी राजवटीविरुद्ध लढा दिला, पण रिझवी यांना स्वातंत्र्यानंतरही आपल्यावर असलेल्या इंग्रजीकरणाच्या भुताशी लढावे लागले. इंग्रज नसतानाही त्यांची छाया आपल्यावर होती. सुंदरलाल हे पर्शियन उर्दूच्या व संस्कृतचा प्रभाव असलेल्या हिंदीविरोधात होते.
जामिया मिलियात त्यांनी कवी  जयासी  यांच्या ‘पद्मावत’वर पीएच.डी. केली. रिझवी यांना शोधनिबंधाच्या चोपडय़ा लिहिण्यात रस नव्हता. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये राहून शिक्षक या नात्याने त्यांना घडवले. शाहीद अमीन, मुजफ्फर आलम, आदित्य बेहल, असगर वजाहत, अब्दुल बिसमिल्ला हे त्यांचे विद्यार्थी होते. मुस्लिमांमधील खरे निधर्मी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. त्यांनी आचरणातून निधर्मवाद जोपासला. ते राष्ट्रवादी मुस्लीम होते, पुस्तकी शिक्षक नव्हते, अनुभवी शिक्षक  व गांधीवादी होते, सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते देशी विद्वान होते.