लहान मुलं असोत की वृद्ध, ब्रह्मचारी असो की प्रापंचिक, विद्वान असो की अडाणी, श्रीमंत असो की गरीब, योगी असो की साधनपथावर पहिलं पाऊल टाकणारा, तपस्वी असो की मोडकंतोडकं साधन करीत असलेला, परिचित असो की अपरिचित..  भिन्न वयोगटातल्या, भिन्न आर्थिक व सामाजिक स्तरावरल्या, मानसिक व शारीरिक क्षमतांनुसार  भिन्न स्तरावरल्या ज्या ज्या कुणी स्वामी स्वरूपानंद यांचं दर्शन घेतलं त्या प्रत्येकाच्या अंतरंगात त्यांनी एकाच आत्मतृप्तीचं बीज रोवलं. या प्रत्येकाच्या पायरीनुसार, आकलनक्षमतेनुसार, साधनक्षमतेनुसार स्वामींनी त्यांच्याशी जे आत्मीय वर्तन केलं आणि खऱ्या ध्येयाचा सूक्ष्म संस्कार त्यांच्यावर करीत त्यांच्या व्यापक होण्याची प्रक्रिया सुरू करून दिली ते प्रसंग डोळ्यासमोर आणा! कित्येक प्रसंग त्यांच्या चरित्रात, आठवणींच्या संग्रहांत आहेत. मग तो विरक्तीच्या ऊर्मीत अडकलेल्या आपल्या मित्राला कीर्तन शिकण्याच्या निमित्तानं खऱ्या मार्गावर आणणारा मित्रधर्म असो. उत्तरेतून आलेल्या आडदांड योग्यानं त्यांचं दर्शन घेताच त्यांच्या चरणांवर अश्रूंना वाट मोकळी करून द्यावी आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन तात्काळ निघून जाण्याच्या प्रसंगातला आपल्याला अनाकलनीय भासणारा पण त्या योग्याची त्याच्या पातळीवरची गाठ उकलून देणारा मूक बोध असो. प्रगती होत नाही, असा सूर लावत त्या सुरातून सद्गुरू आपल्या साधनेतील प्रगतीसाठी कृपा करीत नाहीत, अशी सुप्त तक्रार लपलेली खंत व्यक्त करणाऱ्या साधकाला, ‘दोन मणांचं ओझं देऊ का मग?’ असा जागं करू पाहणारा सवाल असो की विद्यार्थ्यांच्या निमित्तानं प्रत्येकाला ‘‘सुख शाश्वत जी देते। ती विद्या मिळवू इथे।।’’ हा आत्मविद्येकडे वळविणारा बोध असो ; स्वामींचं वरकरणी सहज साधं भासणारं जीवन म्हणजे प्रत्येकाला त्याच्या त्याच्या पायरीवरील आत्मधर्माची शिकवणच होती. आता ‘‘एथ वडील जें जें करिती। तया नाम धर्म ठेविती। तें चि येर अनुष्ठिती। सामान्य सकळ।। ’’ या ओवीची आणखी एक मार्मिक छटा पाहा. आपल्या या ज्ञानेंद्रियं-कर्मेद्रिययुक्त देहात ‘वडील’ कोण आहे? तर बुद्धी हीच वडील आहे! पण ती शुद्ध बुद्धी नव्हे! तिच्यावर भावनेचा पगडा आहे. आपल्याला वाटतं की बुद्धी निर्णय घेते, प्रत्यक्षात जशी माझी भावना असेल तसा निर्णय घ्यायला बुद्धीला ती भाग पाडते आणि नंतर त्या निर्णयाची वकिली करायला भाग पाडते. तेव्हा भावनेचा पगडा असलेली बुद्धी माझ्या मनोधर्मानुसार निर्णय घेते. मनोधर्म म्हणजे मनाच्या आवडी. तेव्हा जशी माझ्या मनाची आवड, जशी माझ्या मनाची सवय, जशी माझ्या मनाची घडण त्याप्रमाणे बुद्धी निर्णय घेते आणि मग तोच मनोधर्म श्रेष्ठ मानून त्याचंच अनुष्ठान प्रत्येक इंद्रियं अर्थात ‘सामान्य सकळ’  करू लागतात! तेव्हा मायिक भावनेचा पगडा असलेली साधकाची बुद्धी शुद्ध करण्याचं विशेष र्कम संतच पार पाडत असतात! एकदा ही सदसद्विवेक बुद्धी जागी झाली की ती अवघं जीवन उजळून टाकू लागते. ती प्रज्वलित करणं हेच सद्गुरूंचं अखंड कार्य! त्या सद्गुरूंचंच वर्णन ३५व्या ओवीपासून आहे!!