अगा जया जे विहित। ते ईश्वराचे मनोगत! विहित म्हणजे वाटय़ाला आलेलं, अटळ. आपलं जीवन आपल्या वाटय़ाला आलेलं आहे. जन्मापासून मरेपर्यंत हे वाटय़ाला आलेलं, अटळ असं जगणं सुटणार नाही. या जीवनात दु:खाचे जे प्रसंग आले ते जसे अटळ होते तसेच सुखाचे प्रसंगही अटळच आहेत! अनेकदा चांगलं वागूनही दु:खाचा प्रसंग येतो आणि विशेष प्रयत्न केले नसतानाही सुखाचा प्रसंग येतो! अर्थात माझं आत्ताचं जे वागणं आहे त्यावरच सुख किंवा दु:ख येणं अवलंबून नाही, याचा मला अनुभव येतोच. अर्थात यातही काही शंका नाही की, वाटय़ाला आलेलं सुख किंवा दु:ख हे माझ्याच कोणत्या ना कोणत्या कर्मातून फळस्वरूप निर्माण झालं आहे. फक्त ते नेमकं सत्कर्म वा दुष्कर्म कोणतं होतं आणि मी ते कधी केलं होतं, हे मला उकलत नाही. सर्वसाधारणत: सत्कर्माचं चांगलं फळ मिळतं आणि दुष्कर्माचं वाईट. त्यामुळे माझं दु:ख हे माझ्याच कोणत्या तरी दुष्कर्माचं फळ आहे, माझं सुख हे माझ्याच कोणत्या तरी सत्कर्माचं फळ आहे. त्यामुळे मी सत्कर्मच करीत राहिलो तर पुढील जन्मांतही माझ्या वाटय़ाला सुखच येईल, अशी भारतीय श्रद्धेची धाटणी आहे. त्यामुळे भले माझ्या आत्ताच्या वागण्यावरून सुखाचा तात्काळ लाभ संभवत नसेलही, तरी मी चांगलंच वागलं पाहिजे. ‘साधक’ झालेल्या आपल्याला मात्र हा धीर धरवत नाही. मी एवढा जप करतो, मी एवढं देवाचं करतो, मी सगळ्यांशी इतका चांगला वागतो, मी दुसऱ्यांसाठी इतकं काही करतो, तरी माझ्या वाटय़ाला हा प्रसंग का यावा, ही सल दु:खाचा प्रसंग उद्भवताच मनाला डाचू लागते. म्हणूनच आपल्यासारख्या साधकांना ही ओवी सांगते की, बाबा तुझ्या वाटय़ाला जे काही आलं आहे ना, ते ईश्वराचं मनोगत आहे. ईश्वराची इच्छा आहे, असंच मान. त्या प्रसंगातही तू विहित कर्म सोडू नकोस. इथे विहित कर्म म्हणजे कर्तव्य जे आहे ते सोडू नकोस. आता कर्तव्य कोणतं तर माणूस म्हणून जन्मलो आहोत तर पशुवत वागायचं नाही, हेच प्रमुख कर्तव्य आहे. हे विहित कर्म करशील तर ईश्वराची भेट होईल, हे नि:संशय! आता हा ईश्वर काय आहे हो? ईश्वर हा अदृष्ट आहे. तो दिसणारा नाही. ईश्वर अज्ञात आहे. त्याचं ज्ञान सहज होणारं नाही. ईश्वर हा अत्यंत सूक्ष्म आहे. तो स्थूल वस्तूगत पटकन दिसणारा नाही. त्या अदृष्टाची, त्या अज्ञाताची, त्या सूक्ष्माची भेट होण्यासाठी ही ओवी काय सांगते? तर विहित कर्म करं, वाटय़ाला आलेलं कर्तव्य कर्म कर! याचा गूढ अर्थ लक्षात घ्या. ईश्वर जसा अदृष्ट आहे, तसंच माझ्या जीवनाचा उगमही अदृष्टातच आहे. ईश्वर जसा अज्ञात आहे, तसंच माझ्या जीवनाचा उगमही अज्ञातातच आहे. ईश्वर सूक्ष्म आहे तसंच माझ्या जीवनाचं उगम कारणही सूक्ष्मच आहे. माझ्या अस्तित्वाचं मूळ असं अज्ञात, अदृष्ट, सूक्ष्म असताना माझं भौतिक जीवन मात्र स्थूल, ज्ञात आणि दृश्यात्मक आहे! माझं शरीर, माझा भवताल, माझी आर्थिक-सामाजिक स्थिती, माझा आप्तेष्टांचा गोतावळा, माझी ओळख हे सारं स्थूल, ज्ञात आणि दृश्यात्मक आहे. हे सारं कुठून आलं आणि या साऱ्यात मी कुठून आलो?