कोकण मराठी साहित्य परिषदेचे १४ वे संमेलन गेल्या रविवारी दापोली येथे झाले. पुढील महिन्यात चिपळूण येथे होत असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदावरून चालू असलेल्या राजकीय रंगपंचमीच्या पाश्र्वभूमीवर या संमेलनाची ‘यशस्वी’ सांगता झाली. कोमसापचे संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश ऊर्फ मधुभाई कर्णिक यांनी गेली सुमारे बावीस वष्रे या संघटनेचे यशस्वी नेतृत्व केले आहे. काही महिन्यांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्याच्या पातळीवर पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देऊन मधुभाईंपुढे पेच निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण अशी अनेक वादळे पचवलेल्या मधुभाईंनी आपल्या पद्धतीने हा फुगा फोडून टाकला आणि संमेलनावर त्याचे सावट येऊ दिले नाही. तरीसुद्धा शेजारच्या तालुक्यात स्वागताध्यक्षपदावरून होत असलेल्या राजकीय चिखलफेकीकडे मधुभाईंचे काही पत्रकारांनी लक्ष वेधले तेव्हा एरवीचे व्यावहारिक चातुर्य विसरून त्यांनी अचानक तत्त्वज्ञाची भूमिका घेतली आणि साहित्य व राजकारणाचा अजिबात संबंध असू नये, अशा आशयाचे विधान केले. आपल्या मधुर वाणीने सर्वच पक्षांच्या राजकारण्यांशी मधुभाईंनी कायम जिव्हाळ्याचे संबंध ठेवले आहेत. त्यामुळे सरकार कुणाचेही असो, सत्ताधारी वर्तुळात त्यांचा सुखेनैव संचार चालू असतो. सध्या तर राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष या नात्याने लाल दिव्याची गाडी त्यांच्या दिमतीला आहे. हे सारे साहित्य व राजकारण यांचा काहीही संबंध न ठेवता प्राप्त झाले असेल तर इतरही अनेक साहित्यिक ही विद्या त्यांच्याकडून शिकून घ्यायला अतिशय आतुर असतील. चिपळूणच्या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाचे वादग्रस्त मानकरी सुनील तटकरे हेच गेल्या वर्षी रोहा येथे झालेल्या कोमसापच्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते, हाही निव्वळ योगायोग नाही. पण त्याबद्दल अपराधी का वाटावे? मराठी साहित्याच्या क्षेत्रात १९७५ ते ८० हा दुर्गावताराचा काळ वगळला तर आमचे साहित्यिक पेशव्यांच्या रमण्यातील ब्राह्मणांप्रमाणे सरकारदरबारी वर्णी लावून घेण्यातच धन्यता मानत आले आहेत. शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांसाठी आमदार-मंत्र्यांच्या चिठ्ठीवजा शिफारसी येऊ लागल्या आहेत. राजकारणी किंवा उद्योगपतींची चरित्रे लिहिणाऱ्या साहित्यिकांची रसाळ प्रतिभाही वाचकांनी वेळोवेळी अनुभवली आहे. असे परस्परांचे सुमधुर संबंध तोडून सवतासुभा निर्माण करण्याची अवदसा त्यांना का बरे आठवावी? तटकरे यांची स्वागताध्यक्षपदी निवड केल्याबद्दल चिपळूणच्या बापडय़ा स्थानिक संयोजन समितीला दूषणे देणे म्हणूनच अन्यायकारक वाटते. त्यांच्यापैकी बहुतेकजण संघाच्या मुशीत तयार झाले असल्यामुळे त्यांच्याकडून साधनशुचितेची अपेक्षा भले काही भाबडे लोक करत असतील तर तो त्यांचा दोष आहे. संमेलनाच्या निमित्ताने पदरात पडणाऱ्या पुंजीच्या भरवश्यावर संस्थेच्या विकासाची भव्य स्वप्ने या मंडळींनी उराशी बाळगली आहेत. हा स्वप्ने याचि देही याची डोळा पूर्ण होण्यासाठी अशा मूल्यांना मूठमाती देत राजाश्रयाचा सोपा मार्ग त्यांनी अवलंबला, या मागील त्यांची व्यावहारिक चतुरता खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. काहीतरी बुरसट मूल्यविचारापायी पेटय़ा किंवा खोकी लाथाडण्याचा करंटेपणा करण्यात कोणता शहाणपणा आहे? आपला काहीसा डागाळलेला पांढरा डगला उजळवण्यासाठी तटकरेंनाही परिमार्जनाची संधी मिळत आहे. आयोजकांना ते नक्कीच नाराज करणार नाहीत.  एक बरे आहे की, चिपळूणच्या संमेलनात तटकरे-पवार येणार म्हणून मधुभाईंनी त्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला नाही. तसे त्यांच्या मनाला शिवणारही नाही. त्यामुळे त्यांचा हा मौलिक सल्ला इतरही कुणी फारसा मनावर घेणार नाही. चिपळूणच्या कुंभमेळ्यात सारेजण आनंदाने सहभागी होतील आणि साहित्यातील राजकारणाला नवे उधाण येईल.