५६ दिवसांच्या सुट्टीनंतर राहुल गांधी प्रकट झाले. या अज्ञातवासातून परतल्यानंतर त्यांनी संसदेमध्ये ‘सूट-बूटवाली सरकारवर’ आरोपांचे प्रहार करताना दाखविलेला आक्रमकपणा, टिकवून ठेवण्यात ते कितपत यशस्वी ठरतात, याची सर्वानाच उत्सुकता राहणार आहे.
‘राजकारणात असून नसल्यासारखा’ अशी ख्याती निर्माण होत असलेल्या राहुल गांधींनी आलेल्या नेतृत्वसंधीकडे कायम पाठ फिरवली. त्यांच्या अशा या वैराग्यातून जाणवणारी अनिच्छा, धरसोड वृत्ती व जबाबदारीपासून दूर पळण्याची सवय, यांमुळे संभ्रमावस्थेत गेलेली काँग्रेस पक्षसंघटना कमकुवत झाली आहे. आज बहुमतामुळे हुकूमशाही मानसिकता तयार होत असलेल्या मोदी सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी एका सतर्क, आक्रमक, लढवय्या विरोधी पक्षाची आवश्यकता देशाला तीव्रतेने जाणवत आहे.  विरोधी पक्षात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी जर राहुल गांधींनी या वेळेस परिणामकारक नेतृत्वाची कृती करून दाखविली तर त्यांना व त्यांच्या पक्षाला आत्मचिंतनासाठी रजा घेण्याची वेळ येणार नाही.

शेजाऱ्यांचे उद्योग ही भारताची डोकेदुखी
‘मित्राचा शत्रू तो..’ हा अग्रलेख आणि ‘चिनी त्रिकोणाचे गणित’ हा लेख (२२ एप्रिल) वाचला. या दोन्हींमध्ये भारतासाठी पुढील काळात येऊ शकणाऱ्या संकटांचे भाकीत मांडले आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची महासत्ता, आशियातील पहिल्या क्रमांकाची आíथक महासत्ता, सध्या गेल्या पंचवीस वर्षांतील नीचांकी आíथक वृद्धी दर (७.५४%), सध्या आíथक, इतर अनेक क्षेत्रांत पुनर्रचनेत गुंतलेला, अमेरिकेचा एकमेव प्रतिस्पर्धी देश अशी ओळख. ख्रिस्तपूर्वकालीन सिल्क रूट म्हणजे चीन ते युरोपीय देशांमध्ये व्यापारासाठी असलेला मार्ग, या मार्गाचे नव्याने पुनरुज्जीवन म्हणजेच चीनच्या वाढणाऱ्या सामर्थ्यांचे दर्शन.
अटलांटिक आणि िहदी महासागरावर लष्करी तळ उभारून आपले वर्चस्व निर्माण करणे, त्यासाठी पाकिस्तानला मदत करणे हा सरळ सरळ उद्देश क्षी जिनिपग यांच्या पाकिस्तान दौऱ्याचा दिसतो. पाकव्याप्त काश्मीर, अरुणाचल प्रदेशावरील वाद, सीमेपलीकडे बांधली जाणारी धरणे, रस्ते, आणि तिबेट हे भारत आणि चीनमधील कायम वादग्रस्त मुद्दे. झोपाळ्यावर बसून चर्चा केल्याने यातील कोणतेही प्रश्न सुटणार नाहीत. भारताचे अफगाणिस्तानप्रेम ही चीनची आणि पाकिस्तानची पोटदुखी. अमेरिका आणि चीन हे भावी युद्धातील प्रतिस्पर्धी मानले तर चीनला आज भारतापेक्षा पाकिस्तान जास्त जवळचा वाटणे सहज शक्य आहे. तसेच दीर्घकालीन व्यापारासाठी, युरोपच्या बाजारपेठेसाठी, सिल्क रूटचे (सागर, खुष्की) दोन्ही मार्गावर पकड ठेवण्यासाठी हे चीनचे धोरण भारताच्या विरोधातले ठरेल. अशा स्थितीत पंतप्रधान मोदींचा आगामी चीन दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरेल. या दरम्यान अमेरिका आणि भारत यामध्ये जर काही नवीन करार, घटनाक्रम घडले तर आपोआप चीनवर दडपण येऊन चीनच्या भारतविरोधी धोरणांमध्ये सौम्यता येऊ शकेल.
– शिशिर सिंदेकर, नासिक

ठाणेकरांची होणारी लूट सर्वपक्षीय नेते थांबवतील?
‘ठाणेकरांची दूध कोंडी’ या बातमीमुळे (२२ एप्रिल)  ठाणेकरांची रोज होणारी लाखो रुपयांची लूट उघड झाली आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे फक्त पाच कंपन्यांच्याच दुधासाठी जास्त पसे घेतले जातात असे नाही. मी गोदावरी दूध घेतो, त्यासाठीही   लिटरमागे दोन रुपये जास्त द्यावे लागतात.  काही कंपन्यांच्या दुधासाठी एक रुपया जास्त लावला जातो. या बातमीप्रमाणे ठाण्यात रोज १० लाख लिटर दूध विकले जाते. याचा अर्थ असा की प्रत्येक वर्षी ठाणेकरांची कमीत कमी ५५ कोटी रुपयांची लूट होते.  शासनाने कारवाई चालू केली ही चांगली गोष्ट आहे. सर्व राजकीय नेतेही सर्वसामान्य जनतेची बाजू घेऊन ही लूट थांबण्यासाठी प्रयत्न करतील काय?
-रा. दि. केळकर, ठाणे</strong>

क्रिकेटपटूंची धडक
‘क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल’ने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पध्रेत अंकित केसरी याची झेल घेण्यासाठी धावलेल्या गोलंदाजाबरोबरच धडक झाली. तीन दिवसांनी अंकित केसरीचे दुर्दैवी निधन झाले. क्रिकेटच्या मदानावर दुखापत होऊन अगदी अलीकडच्या काळात निधन झालेला केसरी हा दुसरा क्रिकेटपटू आहे.  क्रिकेटच्या मदानावर क्षेत्ररक्षकांची धडक होणे ही काही नवीन गोष्ट नाही.  १९६८च्या सुरुवातीस सिडनी येथे झालेल्या कसोटी सामन्यात एम. एल. जयसिंह व रुसी सुरती यांची धडक झाली. सुदैवाने दोघांना किरकोळ दुखापत होण्यावरच निभावले. परंतु, त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज बॉब काऊपर याचा झेल मात्र सुटला. त्याचा फायदा उठवून काऊपरने १६५ धावा करून आपल्या संघाच्या विजयास हातभार लावला. पर्यायाने काऊपरचे ते कसोटी क्रिकेटमधील शेवटचे शतक ठरले.
दुसरा प्रसंग आहे १९७६ मधील. पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद येथील कसोटी सामन्यात ब्रिजेश पटेल व एकनाथ सोलकर एकमेकांना धडकले. त्या भानगडीत वेस्ट इंडिजचा कर्णधार क्लाइव्ह लॉइडचा झेल मात्र सुटला. त्याचा फायदा उठवून त्याने ७० धावा केल्या आणि आपल्या संघाला पराभवाच्या नामुष्कीतून वाचवले. पण सुदैवाने पटेल व सोलकर यांना फारशी इजा झाली नाही.
 – संजय चिटणीस, मुंबई</strong>

मराठी चित्रपटांच्या प्राइम टाइमचे हसे..!
चित्रपटगृहावर होणाऱ्या प्रेक्षकांचे डोळसपणे सर्वेक्षण न करता प्राइम वेळेत मराठी चित्रपट प्रदíशत करण्यासाठी फतवा काढून सरकारने स्वत:चे हसे कसे करून घेतले ते दिसले.
प्रेक्षकांची तुरळक गर्दी तर सोडाच, पण काही ठिकाणी प्रेक्षकच नव्हते म्हणून मराठी चित्रपटाचे खेळ रद्द करावे लागले. वास्तविक मराठी भाषा, मराठी चित्रपट यांच्याबद्दल मला आपुलकी जरूर आहे. काही मराठी चित्रपट दर्जेदार असले तरी ते प्राइम वेळेत प्रदíशत केले तरच प्रेक्षक पाहतील, ही भाबडी अपेक्षा करणे मूर्खपणाचे आहे. चित्रपट खरोखर चांगला असेल, तर भाषेचे कोणतेही बंधन न पाळता प्रेक्षक तो चित्रपट पाहणारच.  खोटय़ा स्तुतीने चित्रपट डोक्यावर घेतल्याचे प्रेक्षकांना अचूकपणे कळते; परंतु याचे भान ‘स्वत:ची मते रेटणाऱ्या’ शैलीतील लोकांना राहिले नाही.
अखेर चित्रपटगृह मालकास व्यवसाय नेटका करावा लागतो हे ‘सगळे फुकट मिळणार नाही’ असा दम देणाऱ्यांच्या लक्षात कसे आले नाही?
– मुरली पाठक, (विलेपाल्रे) मुंबई

यात कोणती घोषणाबाजी?
‘घोषणांच्या जाळ्यात शिक्षण’ हा रसिका मुळ्ये यांचा लेख (२२ एप्रिल) वाचला. सध्या राज्याच्या शिक्षण व्यवस्थेत मोठय़ा प्रमाणावर बदल घडवून आणण्यासाठी शिक्षणमंत्री प्रयत्न करत आहेत. त्यांचे प्रयत्न पूर्णपणे योग्य आहेत. सत्ता बदलली की जुन्या शैक्षणिक धोरणांमध्ये बदल होणार हे उघडच आहे. सत्ता स्थापनेपासून या सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. आगामी काळात त्याचे परिणाम दिसून येतील. शिक्षण हक्क कायदा बदलून उच्चभ्रू शाळांना शुल्क परतावा द्यायचा नाही. तसेच या कायद्याच्या अनेक तरतुदी बदलण्याचे जाहीर करणे यांत कोणती घोषणाबाजी आहे? ग्रामीण विद्यार्थ्यांला दुर्लक्षित व शैक्षणिक हक्कांपासून वंचित न ठेवता त्यासाठी आवश्यक त्या सुविधा पुरवायच्या तर खर्च करावा लागेल. यामधूनच समाजाची आणि विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेऊन धडाडीचे निर्णय घेऊन बदलांना गतिमान करण्यासाठी मंत्री  प्राधान्य देत आहेत. ही संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
 -सुजित शरद झानपुरे, पांगरी (सोलापूर)