पाठशिवणीच्या खेळात, बाद व्हायची वेळ येते, तेव्हाच मनगटाला जीभ लावून ‘टाइम प्लीज’ मागण्यात एक गंमत असते. राजकारणात तसे काही झाले तर मात्र त्याला वेगळेच अर्थ चिकटतात. मोदी सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला धारेवर धरण्याची अनोखी संधी समोर चालून आल्याने संसदेतील काँग्रेस पक्ष ज्यांच्याकडे अपेक्षेने आणि उमेदीने पाहात होता, त्या राहुल गांधींनीच अचानक असेच ‘टाइम प्लीज’ म्हणत रजा घेण्याचे ठरविले आणि काँग्रेसच्या उरल्यासुरल्या उमेदीवर पाणी पडले. सुमारे तीन वर्षांपूर्वी, उत्तर प्रदेशात गाजावाजा करून शेतकरी मेळावे आणि पदयात्रा आयोजित करून राहुल गांधी यांची ‘शेतकऱ्यांचे नेते’ अशी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला होता. काँग्रेस आघाडी सरकारने २०१३ मध्ये तयार केलेला भूसंपादन कायदा हे त्याचेच फलित होते. जुना भूसंपादन कायदा कालबाह्य़ झाला असून तो बदलण्याची गरज आहे, अशी गर्जना राहुल गांधींनी २०११ मध्ये केली   आणि काँग्रेस आघाडी सरकार कामाला लागले. त्या भूसंपादन कायद्याचा मसुदा बदलून सत्तांतरानंतर संसदेसमोर आलेल्या नव्या भूसंपादन अध्यादेशामुळे देशात विरोधाचे रण माजले असताना, राहुलबाबा संसदेत तोफ डागतील, अशा आशेने काँग्रेसजन त्यांच्याकडे पाहात होते. अशाच क्षणी अनपेक्षितपणे रजेवर जाण्याचा निर्णय घेऊन राहुल गांधी यांनी पक्षाला बुचकळ्यातच टाकले. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राहुल गांधीच नव्हे, तर अवघी काँग्रेसच राजकारणाच्या पटलावरून रजेवर गेल्यासारखेच चित्र होते. राहुल गांधी यांनी ऐन मोक्याच्या क्षणी हक्काची रजा घेतल्याने, काँग्रेसच्या राजकारणाचाही ‘हक्काचा रजाकाळ’ सुरू झाल्याची भावना पक्षात व्यक्त होणे साहजिकच होते. राहुल गांधी यांनी रजा घेण्यात काहीच गैर नाही, पण अशा कसोटीच्या क्षणी रजा घ्यायला नको होती, असे थेट मत व्यक्त करणारे राहुल ब्रिगेडचेच दिग्विजय सिंह वगळता अन्य काँग्रेसजन मात्र, कोणती प्रतिक्रिया द्यावी या संभ्रमातच चाचपडत आहेत. राहुल        यांच्या रजेची अनेक कारणे सांगितली जातात. येत्या दोन महिन्यांत पक्षाच्या सर्वोच्च पदी त्यांची निवड होणार, अशी चर्चा आहे. त्याची पूर्वतयारी करून पक्षाला नवा आकार देण्याकरिता गृहपाठ करण्यासाठी राहुल गांधी रजेवर गेल्याचे बोलले जात असले, तरी ‘राहुलची रजा’ हा समाजमाध्यमांवरील रंजक चर्चेचा विषय झाला आहे, हे मात्र खरे. नव्या राजकारणात राहुल गांधी मुरलेले नाहीत आणि पक्षातील जुने राजकारणी त्यांना त्यांच्या पद्धतीने राजकारण करू देत नाहीत, अशा दुहेरी पेचात ते सापडले असावेत, अशीही चर्चा आहे. ‘छोटा भीम’ मालिकेचे सर्व भाग एकत्र पाहावयाचे असल्याने आईकडे हट्ट धरून त्यांनी रजा मिळविली, या खिल्लीतून समाजमाध्यमांवर जणू निवडणूकपूर्व उखाळ्यापाखाळ्यांचे वातावरण पुन्हा अवतरले आहे. राहुल गांधी संसदेच्या कामकाजात सहभागी झाले असते, तर सरकारला कोंडीत पकडण्यासाठी त्यांनी पक्षाचे नेतृत्व केले असते, असे काही काँग्रेसजनांना वाटते. पण तीच तर पक्षाची ‘झाकली मूठ’ आहे. तसे झाले नसते, तर पुन्हा राहुलबाबांच्या नेतृत्वावर नेहमीप्रमाणे प्रश्नचिन्हे उठली असती. ती वेळ येऊ नये, यासाठीच गृहपाठाचे कारण देत त्यांना रजेवर पाठविले गेले असावे, असे म्हणतात. ही झाकली मूठ येत्या एप्रिलमध्ये उघडेल; तेव्हा घोडामैदान     जवळच आहे!