एवढा भीषण दुष्काळ आपण पहिल्यांदाच पाहतो आहोत, या राहुल गांधी यांच्या वक्तव्याने औरंगाबादेतील त्या जनावरांच्या छावणीत उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माणिकराव ठाकरे यांच्यासह अनेकांचे डोळे अक्षरश: पाणावले असतील. राज्यातील दुष्काळाच्या कहाण्या वृत्तपत्रांतून रोजच्या रोज प्रसिद्ध होत आहेत, त्या राहुल यांना वाचायला वेळ मिळाला नसणे शक्य आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून या दुष्काळाचे दारुण वास्तव प्रत्यक्ष दाखवले जाते आहे, ते पाहायलाही त्यांना वेळ मिळाला नसणे स्वाभाविक आहे. दुष्काळ संपण्यापूर्वी त्यांनी एकदा तरी महाराष्ट्रात पायधूळ झाडावी, यासाठी पृथ्वीराजबाबांपासून अनेकांनी गळ घातली होती. पण कधी कर्नाटकातील निवडणूक तर कधी पक्षाच्या सहकाऱ्यांची झाडाझडती अशा दुष्काळापेक्षाही अतिशय महत्त्वाच्या कारणांसाठी त्यांना महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांचे दु:ख समजून घ्यायला वेळ मिळाला नाही. ‘कर्नाटकातील विजय ही तुमच्याच कर्तृत्वाची निशाणी आहे,’ असे दिग्विजय सिंह यांनी सांगितले, तेव्हा राहुल यांचाच गळा दाटून आला होता म्हणे. देशावर अनेक दशके राज्य केलेल्या काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीसपदाचा भार स्वीकारल्यापासून फुटकळही विजय प्राप्त करता न आलेल्या युवराजांना कर्नाटकातील यशाने मूठभर मास चढले, तर नवल नाही. त्या आवेशात आपल्या पक्षाच्या अतिरथी-महारथींना ‘नीट वागला नाहीत तर  नानी याद आएगी,’ असे सांगून राहुल गांधींनी धुरळा उडवून दिला होता. गेली पंधरा वर्षे दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिलेल्या शीला दीक्षितही त्यामुळे हडबडून जाग्या झाल्या. युवराजांनी आपल्याला झोपेतून उठवले, अशी प्रतिक्रिया देऊन त्यांनी गेल्या १५ वर्षांतील आपल्या कारकिर्दीचेही सार्थ वर्णन करून दाखवले. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि काँग्रेसची सत्ता असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जात असले, तरी राहुल यांना इथे पोहोचायला तसा वेळच लागला. दुष्काळ पाहायचा म्हणजे काय करायचे, हे माहीत नसल्याने ही जबाबदारी राज्यातल्या काँग्रेस नेत्यांवर सोपवण्यात आली. त्यांनी युवराजांना उस्मानाबादेत न्यायचे ठरवले. तिथे दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याने त्यांच्या अनुभवात मोलाची भर पडेल, असा त्यामागचा विशाल दृष्टिकोन. पण नंतर लक्षात आले, की उस्मानाबादेत दुष्काळ निवारणाचे म्हणावे असे कामच झालेले नाही. बरे, राहुल यांना दुष्काळ दाखवण्यापेक्षा निवारण दाखवणे काँग्रेसनेत्यांसाठी अधिक उपयुक्त होते. शिवाय उस्मानाबाद हा तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. पद्मसिंह पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाने कायम दुष्काळीच राहिलेला असा जिल्हा. तेथील नागरिकांनी कागाळ्या केल्या, तर सारेच पितळ उघडे पडण्याची शक्यता. काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसांना आणि देशाच्या भावी पंतप्रधानांना आपला देश किती भयावह अवस्थेत आहे, हे समजता कामा नये. या उदात्त हेतूने सुरक्षित अशा औरंगाबादेत न्यायचे ठरले. ताबडतोब सारी सरकारी यंत्रणा कामाला लागली. राहुलजी जनावरांना हात लावतील, तर त्यांच्या हाताला शेण लागता कामा नये, म्हणून मग जनावरांना अंघोळ घालण्यात आली. त्यांच्यासाठी ताज्या चाऱ्याची व्यवस्था करण्यात आली. पशुवैद्य आले, पाठोपाठ त्यांची औषधेही आली. युवराजांना धुळीचा त्रास होऊ नये, म्हणून परिसरात टँकरभर पाणी मारण्यात आले. एवढे सगळे झाल्यानंतर मग सरकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीने या जनावरांच्या छावण्यांवर काँग्रेसचे झेंडेही लावण्यात आले. राहुल यांनी छावण्यांना भेट देऊन राज्यातील काँग्रेस सरकारचे कौतुक केले आणि सारे उपस्थित भरून पावले.. राहुल गांधींच्या टेबलावर असलेल्या ‘करावयाच्या कामांच्या यादी’त उशिराने का होईना, पण ‘दुष्काळाचा दौरा’ या नोंदीपुढे ‘टिकमार्क’ पडला!