आता साधा शेतमजूर, अल्पभूधारक, कोरडवाहू शेतकरी जरी असेल तरी त्याला वाटते आपल्या लेकीने शिकले पाहिजे. पोटाला चिमटा घेऊन, अभावग्रस्त परिस्थितीतही झळ सोसून मुलींना शिकविण्याकडे अशांचा कल वाढतोय. आपल्या पोरींनी मिळवलेले यश पाहताना डोंगरवस्त्या आणि वाडी -तांडे उजळताना दिसत आहेत. बदलाची ही खूण आज एखाद्या लकाकणाऱ्या रेघेसारखी ठळकपणे दिसू लागली आहे.
वाऱ्याने बहकणारे रान आणि फुलांच्या नक्षीदार झाडांमधून नागमोडी वळणे घेत धूम्म पळणाऱ्या पोरी अनेकदा सिनेमात पडद्यावर दिसतात. कंबरेवर नक्षीदार घागर घेऊन त्या लचकत-मुरडत पाणवठय़ावर जातात. वेणीचा गोंडा उडवत आपल्याच पदराशी चाळा करतात. मराठी कवितेतही अल्लड, अवखळ, छांदिष्ट, वेल्हाळ आणि पाठीवर चांदणे गोंदणाऱ्या पोरी आता-आतापर्यंत दिसत होत्या. अजूनही त्या क्वचितपणे दिसतात. अशा पोरी कोणत्या गावात असतात हे माहीत नाही, पण कवींना त्यांची तगमग तापल्या भुईसारखी दिसते, त्यांचे भरात येणे म्हणजे पीक उधाणल्यासारखे वाटते आणि त्या रानातून पळाल्या तरी त्यांच्या पावलांच्या चांदण्या उमटताना दिसतात.
 खरे तर खेडय़ातल्या असंख्य पोरींचे जगणे रानाशी बांधलेलेच, पण त्यांचे रान वेगळे आहे. हे रान त्यांना हसण्या-बागडण्याच्या वयातच जखडून टाकते. यातल्या काहींना आपल्या लहानग्या भावाला सांभाळण्यासाठी आई-बापासोबत मोलमजुरीच्या ठिकाणी जावे लागते. अनेकींचे हात त्यांना काही कळण्याच्या आतच पिवळे होतात आणि त्यांना संसाराच्या घाण्याला जुंपावे लागते. ज्या भागातून ऊसतोडणीसाठी मजुरांचे स्थलांतर होते त्यांना ही गोष्ट माहीत आहे. या कामासाठी कोयत्याला उचल दिली जाते. काम करणाऱ्या जोडीसाठी ही उचल असते. अशा वेळी कोयते पूर्ण करण्यासाठीही लवकर लग्ने लावली जातात. एखाद्या जनावराच्या गळ्याला दावे बांधून न्यावे तशा या मुली ढोरकष्टाशी जोडल्या जातात. उन्हाळ्यात मायबाप जेव्हा कामाच्या ठिकाणी असतात तेव्हा पाण्यासाठी तिष्ठत राहावे लागते. अशा वेळी कामधाम सोडून पाण्यासाठी वणवण भटकणे परवडत नाही. आपल्या आईबापासाठी टँकरच्या मागे धावणाऱ्या पोरीही दिसतात. अशा सर्व मुलींच्या जगण्यात येणारे रान वेगळे आहे. त्यांनी आनंदाने बागडावे, रानभर हुंदडावे असे यात काहीही नाही; किंबहुना या रानात फुलांच्या नक्षीऐवजी ढेकळा-धस्कटांचाच सामना त्यांना करावा लागतो आणि आपले पाय रक्ताळून घ्यावे लागतात.
अनेक पोरींचे जगणे हे मुक्या हुंदक्यांनी भरलेले असते. अवेळी झालेले लग्न, कधी समजून न घेणारा जोडीदार, डोक्यावर संसाराचा ताण, अशा वेळी सगळ्या आयुष्याचाच झालेला उन्हाळा आणि माहेरचे दोर तर तुटलेले.. आपले जगणेच नको म्हणून त्यातलीच एखादी गळफास जवळ करते, तर एखादी अध्र्या रात्री विहिरीचा तळ शोधते. अशाच वेळी प्रश्न अस्वस्थ करतो की, अशा रानात फुलपाखरांमागे धावणाऱ्या पोरींचा मग गाव आहे तरी कोणता? सजणाऱ्या-धजणाऱ्या आणि आपलेच विभ्रम न्याहाळणाऱ्या पोरी राहतात तरी कोणत्या गावात? तसा सजण्या-धजण्याचा आणि कष्टाचा कुठेच संबंध येत नाही. ज्यांच्या दिवसाची सुरुवात सकाळी शेणात हात घातल्यापासून होते आणि दिवसभर मातीत राबावे लागते, त्यांनी कोणते पॉलिश लावायचे आपल्या नखांना?
..ज्यांनी राबण्यात आपली हयात घालवली, जगण्याच्या किमान आकांक्षांनाही जिथे धुमारे फुटत नाहीत, अशा राबणाऱ्यांच्या जगात नवा बदल घडतोय. तळपातळीवर एक ठिणगी नव्याने आकार घेताना दिसत आहे. राबणाऱ्या सर्वानाच आता आपल्या पुढच्या पिढीने यातून बाहेर पडावे असे वाटू लागले आहे. आमच्या जन्माचा उन्हाळा झाला तो तुमचा होऊ नये, अशी भावना आता आई-वडीलच बोलून दाखवत आहेत. परिस्थिती नसतानाही शिक्षण घेण्याचे प्रमाण आणि त्यातही मुलींच्या शिक्षणाचा टक्का वाढताना दिसतो आहे.
पूर्वी ग्रामीण भागात शाळा होत्या, पण शाळेत मुलींना पाठवले जात नसे. कालांतराने मुलीही शाळेत यायला लागल्या, पण सहावी-सातवीनंतर त्यांची शाळा थांबायची. गावात शाळा असूनही शिक्षणाची दारे मात्र बंदच. आता साधा शेतमजूर, अल्पभूधारक, कोरडवाहू शेतकरी जरी असेल तरी त्याला वाटते आपल्या लेकीने शिकले पाहिजे. पोटाला चिमटा घेऊन, अभावग्रस्त परिस्थितीतही झळ सोसून मुलींना शिकविण्याकडे अशांचा कल वाढतोय. गावात शाळा नसेल, तर तालुक्याला आणि जिल्ह्य़ाच्याही ठिकाणी खेडय़ापाडय़ांतल्या मुली शिकताना दिसत आहेत. आधी गावातल्याच शाळेत पाठवले जात नसेल तिथे आता दूरच्या एखाद्या निवासी शाळेतही मुलीला दाखल केले जाते. ही सगळी राबणारी माणसे आहेत. जे ढोरकष्ट आपल्या वाटय़ाला आले ते पुढच्या पिढीला येऊ नयेत यासाठीच त्यांची धडपड आहे. शेतावर राबणाऱ्या सालगडय़ाला गुढीपाडव्याच्या दरम्यान उचल दिली जाते.आपल्या वर्षभराच्या राबवणुकीपोटी जी रक्कम सुरुवातीला हाती पडते ती थेट एखाद्या निवासी शाळेचे शुल्क भरून आपल्या मुलीला शिक्षणासाठी बाहेरगावी ठेवण्याचा निर्णय आता ही माणसे घेऊ लागली आहेत.
दिवस उगवण्याआधी आकाश उजळून जावे असे वाटणारे हे दृश्य आता खेडय़ापाडय़ांमध्ये दिसू लागले आहे. असंख्य पोरी रानाच्या तावडीतून सुटताना दिसत आहेत. शिकण्याची जबर आकांक्षा त्यांच्यात आहे.
 सध्या सकाळी ग्रामीण महाराष्ट्रातल्या कोणत्याही बसस्थानकावर पाहा, मुलींचे जथ्थेच्या जथ्थे शिक्षणाच्या गावी जाताना दिसतात. काही ठिकाणी सायकलवर, काही ठिकाणी पायी मुलींचे हे थवे एक नवी उमेद घेऊन वाट तुडविताना दिसतात. सुरुवातीला शहरात आल्यानंतर त्या बावरतात, आपल्यातल्या अभावाचे ओझे वागवत वावरतात, घरच्यांनी आपल्यासाठी खाल्लेल्या खस्ता आठवून जिद्दीने अभ्यासाला लागतात. काही दिवसांनंतरचा दबलेपणा दूर होतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरही नवा आत्मविश्वास दिसू लागतो.  कधीकधी कुठल्या तरी आडवळणाच्या गावातून आलेली एखादी मुलगी चमकदार असे यश मिळवताना दिसते. आपल्या पोरींनी मिळवलेले यश पाहताना डोंगरवस्त्या आणि वाडी-तांडे उजळताना दिसत आहेत. त्यांची रानातून बाहेर पडण्याची धडपड जितकी उत्कट, तितकीच चिवट आहे. कुणाची चप्पल तुटलेली असेल, कुणाच्या अंगावर धड कपडे नसतील, कुणाचे दप्तर फाटके असेल, गणवेशाला टाके घातलेले असतील.. पण त्यांना शिकायचे आहे.
जे रान आपल्याला मुक्त, हवेशीर, बेबंद वाटते, त्याच रानातून त्यांना मुक्त व्हायचे आहे. बदलाची ही खूण आज एखाद्या लकाकणाऱ्या रेघेसारखी ठळकपणे दिसू लागली आहे.