News Flash

जलपुरुषाचा गौरव

पाणी हा मानवी संस्कृतीचा आणि जगण्याचा अविभाज्य घटक असून त्याकडे होणाऱ्या दुर्लक्षाकडे सातत्याने लक्ष वेधणाऱ्या राजेंद्रसिंह यांना यंदाचे ‘स्टॉकहोम वॉटर प्राइज’ जाहीर होणे ही बाब

| March 22, 2015 11:16 am

पाणी हा मानवी संस्कृतीचा आणि जगण्याचा अविभाज्य घटक असून त्याकडे होणाऱ्या दुर्लक्षाकडे सातत्याने लक्ष वेधणाऱ्या राजेंद्रसिंह यांना यंदाचे ‘स्टॉकहोम वॉटर प्राइज’ जाहीर होणे ही बाब जेवढी आनंदाची आहे, तेवढीच आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारीही आहे. ‘जलपुरुष’ या नावाने ओळखले जाणारे राजेंद्रसिंह यांनी गेली काही दशके पाण्याची चळवळ तेवत ठेवली आहे. या देशातील नद्यांची भीषण अवस्था खरे तर सामान्य माणसांपेक्षाही सत्ताधाऱ्यांना कशी पाहवते, असा प्रश्न पडतो. प्रश्न दिसल्यानंतर सामान्यत: त्याबद्दल टीका करून गप्प बसण्याची सामान्यांची प्रवृत्ती असते. राजेंद्रसिंह यांनी मात्र या प्रश्नाकडे समाजाचे आणि सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी विधायक आंदोलन करण्याचे ठरवले. राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशातील पाण्याची समस्या मोठय़ा शहरांमध्ये राहून सत्तेच्या खुर्चीची ऊब घेणाऱ्यांच्या लक्षात येण्याची शक्यता कमीच. प्रश्न फक्त राजस्थानचा नाही, तर तो देशव्यापी आहे, याचे भान जनसामान्यांच्या मनात निर्माण करणे हेच मुळी मोठे आव्हान होते. व्यक्तिगत फायद्याच्या कोणत्याही गोष्टीसाठी कोणत्याही प्रकारचे आंदोलन झटकन होऊ शकते. परंतु सामाजिक फायद्याच्या गोष्टीसाठी सरसकट कुणी पुढे येताना दिसत नाही. अशा स्थितीत राजेंद्रसिंह यांनी जे संघटन केले, ते केवळ कौतुकास्पद नाही, तर अनुकरणीय आहे. देशाच्या ग्रामीण भागात नद्यांची दुरवस्था आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी राजेंद्रसिंह यांनी आपल्या चळवळीद्वारे जे अनेक उपक्रम केले, त्यातील ‘जोहड’ ही पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या छोटय़ा तलावांची चळवळ विशेषत्वाने नजरेत भरणारी ठरली. गेल्या २० वर्षांत असे सुमारे नऊ हजार तलाव तयार करण्यात आले. या आणि अन्य उपक्रमांतून किमान एक हजार गावांत पिण्याचे पाणी मिळण्याची व्यवस्था झाली. हे चळवळीचे यश आहे, यात शंकाच नाही, परंतु केंद्र आणि राज्य सरकारांची ती नामुष्कीही आहे. गंगेच्या शुद्धीकरणासाठी काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारने स्थापन केलेल्या प्राधिकरणात राजेंद्रसिंह यांनी उत्साहाने भाग घ्यायचे ठरवले, परंतु त्यांच्या वाटय़ाला सरकारी दुर्लक्षाशिवाय काहीच आले नाही.  शेवटी कंटाळून राजेंद्रसिंह यांनी आपला राजीनामा सादर केला. तरीही त्यांच्या प्रयत्नाने गंगेला मिळणाऱ्या ११५ उपनद्यांपैकी सात नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यात यश आले.  पावसाद्वारे मिळणारे पिण्याचे पाणी  प्रयत्नपूर्वक उपयोगात आणण्यासाठी समाजात जलसाक्षरता निर्माण होणे अधिक आवश्यक आहे, याकडे लक्ष देऊन राजेंद्रसिंह आपल्या चळवळीची आखणी करतात. केवळ पाणी वाचवण्याने जसे बरेच प्रश्न सुटतात, तसेच पाण्याचा गैरवापर थांबवल्यानेही अनेक समस्यांवर तोडगा निघू शकतो. त्यामुळे साक्षरतेची ही चळवळ देशाच्या आणि खरे तर जगाच्या लक्षात न येणारी ठरती तरच नवल. पाण्याच्या क्षेत्रातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘स्टॉकहोम वॉटर प्राइज’साठी त्यांची निवड होणे म्हणजे त्यांच्या चळवळीला आणि कृतिशील विचारांना मिळालेली जागतिक पावती आहे, असे म्हटले पाहिजे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2015 11:16 am

Web Title: rajendra singh wins stockholm water prize
टॅग : Rajendra Singh
Next Stories
1 कोरडवाहू कोरडेच!
2 शिक्षणातील राजकीय चबढब
3 वातकुक्कुटांची रीत..
Just Now!
X