मराठी सर्जनशील लेखकांचे एक बरे आहे. राजवाडे हे वैचारिक लेखन करणारे म्हणून त्यांना आणि केतकर हे चांगले (यशस्वी?) कादंबरीकार नव्हते म्हणून त्यांना दूर ठेवण्याची क्लृप्ती त्यांना साधली आहे.
जगाच्या इतिहासात साम्राज्यवाद ही काही नवी घटना नाही. पूर्वी ग्रीक, इराणी, तुर्कस्तानी अशी साम्राज्ये झालेली होतीच, पण आपापल्या साम्राज्याचे समर्थन करण्यासाठी या मंडळींना तत्त्वज्ञानाची गरज भासली नव्हती. एका राज्याने दुसऱ्या राज्याला जिंकून त्याला अंकित करण्यात काही गैर असल्याचे त्यांना जाणवत नसावे. अपवादाला म्हणून भारतातील राजकीय विचारवंतांचा उल्लेख करता येईल. या विचारवंतांनीही राजाला केंद्रस्थानी ठेवूनच विचार केला. या विचारानुसार राजा हा ‘विजिगीषु’ असतोच असतो. तो तसा असल्याचे गृहीत धरूनच कौटिल्याने शेजारपाजारच्या राज्यांचा दर्जा, भूमिका व संबंध यांची निश्चिती आपल्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात केली आणि त्याचीच ‘री’ इतर बहुतेकांनी ओढली.
पण तरीही भारतीय विचारात वेगळेपण आहे. आपण विजयाचे असुरविजय आणि धर्मविजय असे दोन प्रकार मानले. एखाद्या राजाचा युद्धात विजय झाला आणि त्याने पराभूत राजाचे राज्य खालसा करून आपल्या राज्याला जोडले, तर तो असुरविजय होय. उलट या जेत्या राजाने पराभूत राजाला अभय देऊन, त्याचे राज्य आपल्या राज्यात समाविष्ट न करता त्याने आपले मांडलिकत्व पत्करून, सार्वभौमत्व मान्य करून काही खंडणी वगैरे द्यावी, अशी भूमिका घेणे हा धर्मविजय होय. साम्राज्यनिर्मितीसाठी असुरविजयच हवा, हे आता वेगळे सांगायची गरज नाही. हिंदुस्थानात एकछत्री अंमल नव्हता. ते एक राष्ट्र नव्हतेच असे म्हणत अगदी औरंगजेबाचेसुद्धा कौतुक करणाऱ्या विद्वानांना हा भेद समजतच नाही.
पण आपला मुद्दा वेगळा आहे. आधुनिक काळात असुरविजयावर आधारित निर्माण झालेल्या साम्राज्यांना समर्थनाची गरज भासू लागली ही त्यांची नैतिक प्रगतीच म्हणावी लागते! या समर्थनामधील एक चलाखीचे समर्थन म्हणजे आम्ही पाश्चात्त्य साम्राज्यवादी पूर्वेकडील राष्ट्रांना सुसंस्कृत करण्यासाठी त्यांच्यावर राज्य करतो. इंग्रज लेखक रुदयार्द किपलिंग याने तर या प्रकाराला गोऱ्या माणसाचे ओझे (White man’s burden) मानले!
अर्थात, अशी भूमिका घेण्यासाठी भारताची आणि खरे तर एकूणच पौर्वात्य जगताची मागासलेले, अनाधुनिक, जडशील, परंपरावादी व परिवर्तनविरोध अशी प्रतिमा उभी करण्याची युरोपियन विचारवंतांची गरज होती. ते आपल्या पूर्वज साम्राज्यवाद्यांइतके निर्ढावलेले नव्हते ही त्यांची प्रगतीच. पूर्वेकडील विश्वासंबंधी मांडण्यात आलेल्या अशा सिद्धान्ताला ‘प्राच्यवाद’ (orientalism) या नावाने ओळखले जाते.
अशा प्रकारच्या विचारप्रणालीचे अस्तित्व एडवर्ड सईद यांच्या पूर्वीच्या विद्वानांना ठाऊकच नव्हते अशातली गोष्ट नाही आणि त्यांनी तिचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला नाही असेही नाही. या प्रतिवादाचे वेगवेगळे प्रकार संभवतात हे लक्षात घेतले, तर ते सापडू शकतात. आत्मगौरव, आत्मसमर्थन यांचा अंश या प्रकारात असणार हे तर उघडच आहे. उदाहरणार्थ, आम्ही (म्हणजे आमचे पूर्वज)सुद्धा असेच परिवर्तनशील होतो असे मानणे किंवा मुळात होय आम्ही होतोच परंपरावादी व परिवर्तनविरोधी; परंतु तो आमचा दोष नसून गुणच होता आणि मुख्य म्हणजे आमची समाजरचना इतकी परिपूर्ण आहे, की आम्हाला बदलायची गरजच नव्हती. युरोपियन पाश्चात्त्य वेगवेगळे प्रयोग करीत शेवटी हिंदुस्थानातील प्राचीन आर्याचीच समाजरचना उत्तम आणि अनुकरणीय या निष्कर्षांपर्यंत येतील अशी भूमिका घेणे.
अर्थात, अशी भूमिका मांडण्यासाठी आपल्या परंपरेप्रमाणेच आधुनिक युरोपीय ज्ञानविज्ञानाचीही पुरेशी माहिती हवी. मराठी विचारविश्वात इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे, आहिताग्नी शंकर रामचंद्र राजवाडे, गो. म. जोशी अशा विद्वानांना ही माहिती होती आणि त्यांनी तसे प्रयत्नही केले होते. यांच्यापैकी वि. का. राजवाडय़ांचा मुख्य विषयच इतिहास हा असल्यामुळे त्यांना आपल्या अखेरच्या पर्वात भारतीय समाजरचनेतील परिवर्तनांचा म्हणजेच स्थित्यंतरांचा साक्षात्कार झाला. (बदल नसेल तर इतिहासाला काही अर्थच उरत नाही.) त्यांनी भारतीय विवाहसंस्थेचा इतिहासच लिहायला घेतला. हा इतिहास मानवशास्त्रीय (Anthropological) होणे स्वाभाविक होते. राजवाडय़ांचे प्रतिपादन फ्रेडरिक एंगल्सच्या मार्क्‍सवादी विचारांच्या जवळचे वाटल्याने तेव्हाचे नवकम्युनिस्ट कॉ. श्रीपाद अमृत डांगे त्यांच्याकडे आकृष्ट झाले; पण तो वेगळा मुद्दा.

राजवाडेद्वयी आणि जोशी यांना स्थितिवादी विचार मांडावेसे वाटले याचे कारणच मुळी तेव्हाच्या नवशिक्षित तरुणांमध्ये निर्माण झालेली परंपरेविषयीची अप्रीती आणि पाश्चात्त्य सुधारणांचे आकर्षण. या पिढीचे वैचारिक प्रतिनिधित्व गोपाळराव आगरकर यांनी केले हे वेगळे सांगायची गरज नाही.
सुधारकाग्रणी आगरकरांचे किंवा एकूणच सुधारणावादी संप्रदायाचे नशीब चांगले की त्यांना या विचारांची मांडणी व समर्थन ललित साहित्यात म्हणजे कथा, कादंबरी व कविता या ककारत्रयीत करणारे लेखक मिळाले. कवितेच्या क्षेत्रात केशवसुत ‘जुने जाऊ द्या मरणालागुनि, जाळुनि किंवा पुरुनि टाका’ अशी जहाल भाषा वापरू लागले, तर कथा-कादंबऱ्या या गद्यलेखनप्रकारात हरिभाऊ आपटे यांच्यासारखा खंदा लेखक निर्माण झाला. अशा प्रकारच्या लेखकांवरील संताप सुधारणाविरोधी प्रतिस्पध्र्याकडून व्यक्त होणेही स्वाभाविकच होते.  आहिताग्नी राजवाडय़ांनी आपटय़ांची संभावना ‘रेम्याडोक्या’ अशी केली, मात्र इतिहासाचार्य राजवाडे हरिभाऊंचा मोठेपणा मान्य करतात.
राजवाडय़ांची खंत अशी होती, की ज्याप्रमाणे सुधारणावादी विचारसंप्रदायाला हरिभाऊंसारखा चांगला ललित लेखक लाभला तसा तो राजवाडय़ांच्या पक्षाला लाभला नाही. राजवाडय़ांनी (मराठी) कादंबरीविषयी लिहिलेल्या प्रसिद्ध लेखातून ही खंत व्यक्त केली आहे.
पण राजवाडय़ांची समस्या वेगळीच आहे. पश्चिमी वाऱ्यांच्या झंझावातात उडून-उन्मळून जाण्याची त्यांची तयारी नव्हती. त्याचप्रमाणे सनातनी लोकांप्रमाणे परिवर्तनाला पूर्ण नकार देणे शक्य नसल्याचेही त्यांच्या लक्षात आले होते. असा नकार देणे म्हणजे जीवनकलहात नष्ट होणे हे त्यांना पटले होते. ‘सर्वनाशे समुत्पन्ने अर्ध त्यजति पंडित:’ या न्यायाने ते बदलायला ते राजी होते. तथापि, हा बदलसुद्धा पाश्चात्त्य पद्धतीऐवजी आपल्या पारंपरिक पद्धतीने व्हावा असे त्यांना वाटत होते. आधुनिक नवशिक्षितांच्या सुधारकांच्या पद्धतीपेक्षा वेगळी पद्धत व पक्ष आपल्याकडे उपलब्ध असल्याची त्यांना खात्री होती. या पद्धतीला व पक्षाला किंवा संप्रदायाला त्यांनी उद्धारक पक्ष असे नाव दिले. एका अर्थाने राजवाडे परंपरेचे रिसायकलिंग करू पाहत होते. परिवर्तनाच्या उद्धारक पक्षाची कथा-कादंबरीतून मांडणी करणाऱ्या प्रतिभावंतांची त्यांना प्रतीक्षा होती.
उद्धारक पक्षाची बाजू अशा प्रकारे ललित साहित्यातून मांडणारा लेखक त्यांना त्यांच्या आयुष्यात पाहायला मिळाला, पण त्याच्या ललित लेखनास समाजात पुरेशी प्रतिष्ठा मिळाली नाही. समाजशास्त्रज्ञ व ज्ञानकोशकार म्हणून प्रसिद्धी पावलेला कादंबरीकार श्रीधर व्यंकटेश केतकर हा तो लेखक होय. राजवाडे व केतकर यांच्यातील हा नातेसंबंध न समजल्यामुळे मराठी समीक्षक केतकरी कादंबऱ्यांची समीक्षा करण्यात सपशेल अपयशी ठरले! केतकरांच्या कादंबऱ्यांचा प्रवास हा स्वत: राजवाडय़ांच्या विचारांचाच प्रवास आहे. गोंडबनातील प्रियंवदा ते ब्राह्मणकन्या असे त्याचे स्वरूप सांगता येईल.
मौजेची गोष्ट म्हणजे अगोदरचे स्थितिवादी राजवाडे उत्तरकाळात बदलून गतिवादी- परिवर्तनवादी होऊ पाहत होते, असे आपण म्हणू शकतो. शेजवलकरांनी ते म्हटलेही आहे. ते मार्क्‍सच्या विचारांकडे (मार्क्‍सचे लिखाण उपलब्ध नसतानाही) झुकत चालले होते. भारतीय आणि मराठी पातळीवर त्यांना गांधी आणि ज्ञानेश्वर यांचे महत्त्व उमगू लागले होते.
केतकरी कादंबऱ्यांत पडलेल्या प्रतिबिंबावरून बिंबाचे अनुमान करायचे झाल्यास, होय! अखेरच्या टप्प्यात ते स्त्रीसत्ताक निदान स्त्रीप्रधान समाजरचनेकडे झुकले होते, असेही म्हणता येते. वैजनाथशास्त्री धुळेकर व केतकरांनी राजवाडय़ांवरून बेतलेल्या पात्राकडून हा बदल स्पष्ट होतो. हे शास्त्रीबोवा आता नव्या युगाची स्मृती लिहीत आहेत. तिच्यात वर्णजातिव्यवस्था, जातिभेद, स्त्रीदास्य यांना स्थान नाही. राजवाडे-केतकरांच्या या रूपाकडे मराठी समीक्षकांनी पूर्ण दुर्लक्ष केले. अलीकडील काळात कॉ. शरद् पाटलांसारखे महाविचक्षणसुद्धा तेथपर्यंत पोहोचू शकले नाही हे विशेष. मनुस्मृतीला बाजूला सारून बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना आली हे चांगलेच झाले, पण मराठी समाजाच्या स्थितिगतीचा विचार केला असता त्याने केतकरांच्या वैजनाथस्मृतींकडे दुर्लक्ष केले हे बरे नव्हे. मराठी सर्जनशील लेखकांचे एक बरे आहे. राजवाडे हे वैचारिक लेखन करणारे म्हणून त्यांना आणि केतकर हे चांगले (यशस्वी?) कादंबरीकार नव्हते म्हणून त्यांना दूर ठेवण्याची क्लृप्ती त्यांना साधली आहे. शिवाय पुरोगामी असल्यामुळे सामाजिक स्थितिवाद ते नाकारणार हे उघड आहे; पण त्याचबरोबर साहित्यात नियतीच्या नावाने आलेला स्थितिवाद हे डोक्यावर घेतात हे कसे?
(समाप्त)

*लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक असून संतसाहित्याचे व्यासंगी व विचारवंत आहेत.
*उद्याच्या अंकात मुकुंद संगोराम यांचे ‘स्वरायन’ हे सदर