सेवा आणि सत्ता या संकल्पना सध्या परस्परांपासून दूर होऊ लागल्या आहेत. सत्तेचा वापर सेवेसाठी करावा, ही संकल्पना आता जुनी झाली. सेवा करणारे ते सारे विझलेले, निस्तेज कोळसे आहेत आणि सत्तेवर असणारे ते सारे धगधगते निखारे असतात. असे निखारे ‘सेवेकरी’ झाले तर सेवेची संकल्पनाच करपून जाईल. एवढा समंजसपणा असतानाही, नारायण राणे नावाच्या एका धगधगत्या निखाऱ्याला काँग्रेस सेवादलाच्या वळचणीला ठेवण्याचे धाडस कुणी तरी करते आहे.. आपले सेवादल करण्याचा कट काँग्रेसमध्ये शिजत असल्याचा सुगावा कोकणपुत्र नारायण राणे यांना लागला आहे. शिवसेनेच्या अंगारातून काँग्रेसच्या धगीत उडी घेतल्यानंतर काही काळातच हा सुगावा त्यांना लागला असावा. त्यामुळेच सोनिया गांधी यांच्या मुंबई भेटीत ‘राणे स्टाइल’चा दुर्मीळ अनुभव काँग्रेसी संस्कृतीला मिळाला होता. काँग्रेस ही एका अस्सल राजकारणाची संस्कृती आहे, त्यामुळे कोणताही धगधगता निखारा या संस्कृतीत आपोआपच मवाळ होईल आणि संस्कृतीत विरघळून जाईल, असा अनेकांचा समज होता. पण काळाच्या चक्रासोबत या विश्वासाची चक्रेही उलट फिरविण्याची हिंमतही एखाद्याच्या अंगी असते, हे या ‘स्टाइल’ने तेव्हा दाखवून दिले होते. सेवादल ही काँग्रेसी संस्कृतीची आचारसंहिता आहे, अनुशासित व प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून काँग्रेसची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम सेवादलाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे, असे पक्षात मानले जाते. या समर्पित कार्यकर्त्यांचा दूरदृष्टीने लाभ करून घ्यावयाची जबाबदारी पक्षाची असते, असे उद्गार काँग्रेसच्या सत्ताकारणातील नेते वारंवार सभा-संमेलने आणि मेळाव्यांतून काढत असतात. त्यामुळे सभा-मेळाव्यांसारख्या प्रसंगी सलामी देणाऱ्या, सभेआधी सतरंज्या अंथरणाऱ्या किंवा खुच्र्याची शिस्तबद्ध मांडणी करून नंतर आवराआवर करणाऱ्या गणवेशधारी कार्यकर्त्यांनाच खुच्र्याची फेकाफेक आणि मोडतोड करण्याच्या संस्कृतीच्या झळा लागल्या तर काय होईल याचा विचार करण्याइतपत भान या संस्कृतीमध्ये मुरलेल्या पक्षश्रेष्ठींना नसेल, असे मानता येणार नाही. पारतंत्र्याच्या काळात, १९२४ मध्ये स्थापन झालेल्या हिंदुस्तानी सेवा मंडळ या संघटनेला १९३१ मध्ये काँग्रेस सेवादल या नावाची ओळख मिळाली, तेव्हापासून आजवर या संघटनेने अनेक स्थित्यंतरे अनुभवली आणि पचविली. सेवादलाच्या कार्यात उतरणाऱ्या कार्यकर्त्यांस राजकारणापासून दूर राहण्याची शपथ त्या काळी घ्यावी लागत असे. राजकारणापासून दूर राहणारा सेवादलाचा कार्यकर्ता हा धगधगता निखारा असणे ही तर दूरचीच बाब, पण विझत चाललेल्या निखाऱ्याची धगदेखील त्याच्या अंगी असणार नाही, हे या ‘धगधगत्या निखाऱ्या’ने ओळखले आहे. आपला जन्म सेवेसाठी नव्हे, तर सत्तेसाठी झाला आहे, असे समजून राजकारण करणारा एक वर्ग असतो. सत्ताकारणात सेवेला स्थान असते असे हा वर्ग मानत नाही. राणे यांना लागलेल्या एका सुगाव्यामुळे सेवादलात सत्ताकारणाची नवी पहाट उमटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. समाजात काँग्रेसी विचारधारा पोहोचविण्याची शपथ घेणाऱ्या निष्ठावान सेवादल कार्यकर्त्यांला पद मिळाले पाहिजे, असे सांगून संघटनेच्या नव्वदीच्या वाटचालीतील परंपरेला नवी दिशा देण्याचे एक आगळे कार्यदेखील या एका व्यक्तिगत सुगाव्यामुळे सहजपणे घडून गेले आहे. सेवादलाच्या कार्यकर्त्यांना आता सत्तेची स्वप्ने पडू लागतील आणि सेवेची रडगाणी संपून सत्तेच्या गाण्याचे सूर त्यांच्या मनात रुंजी घालू लागतील. एका परिवर्तनाची नांदी काँग्रेसी संस्कृतीत नव्याने दाखल झालेल्या एका नेत्याने गायिली आहे. सेवादलाचे ‘सत्तादल’ घडविण्याची स्वप्ने या नांदीतून रुजतील आणि धगधगत्या विचारधारेच्या स्पर्शाने काँग्रेसी संस्कृतीही पावन होईल.