‘पोलीस भरती राज्यात ६१ ठिकाणी होते’ असे सांगणारी बातमी (लोकसत्ता, २४ जून) वाचली. बातमीतील माहिती खरीच आहे, पण त्या ६१ ठिकाणांची गुणवत्ता यादीमधील किमान गुणपातळीत फार तफावत असते. ती कुठे २०० पकी १८० तर कोठे ती १४० देखील असू शकते. एवढा फरक का? तर ज्या ठिकाणी जास्त जागा तिथे गुणपातळी तुलनेने निश्चितच कमी असते.
 त्यामुळेच मुंबईसारख्या ठिकाणी जागा भरपूर असल्याने ही गुणपातळी कमी असण्याची शक्यता उमेदवारांना वाटते, त्या कारणाने तिथे गर्दी जास्त असते.
 पोलीस भरतीची केंद्रे ६१ जागी दिल्याने मार्ग निघणार नाही; तर भरतीची संपूर्ण  प्रक्रियाच केंद्रीभूत व्हायला हवी. जेणेकरून उमेदवाराला बदलत्या गुणपातळीचा घोर राहणार नाही व संपूर्ण महाराष्ट्राची एकच गुणवत्ता यादी लागून सर्वाना समान न्याय मिळेल. नियुक्तीकरिता जिल्ह्याचे पसंतिक्रम देण्याची तरतूद या केंद्रीय प्रक्रियेत ठेवल्यास, उमेदवाराला स्वत:चा जिल्हादेखील मिळू शकतो.
त्यामुळे केंद्रीय पोलीस भरती हा उत्तम उपाय ठरू शकतो, याचा विचार आता राज्य सरकारने देखील करावा.
-गजानन आ. चाटे, लोणार (बुलढाणा)

साकडे घातल्याने पार्थिव पटेलही ‘मास्टर ब्लास्टर’ होतो का?
केंद्राप्रमाणे महाराष्ट्रातही एनडीएप्रणीत शिवसेनेचे सरकार यावे यासाठी आदित्य ठाकरे यांनी खास शिर्डीला जाऊन साईबाबांना साकडे घातल्याचे वाचनात आले. ज्या अंधश्रद्धेच्या समूळ निर्मूलनासाठी डॉ. नरेन्द्र दाभोलकर यांनी आपली सारी हयात खर्ची घातली, इतकेच नव्हे तर प्राणाहुतीही दिली, त्या अंधश्रद्धेचा आजही आणि तोही सुशिक्षितांवर किती पगडा आहे, याचेच हे निदर्शक आहे. पाऊस पडावा, अपत्यप्राप्ती व्हावी यासाठी देवाला साकडे घातले जाते, नवस केले जातात किंवा होम-हवन केले जाते. असे करणे म्हणजे देवाला वेठीला धरणे होय. पाऊस पडणे न पडणे याला वातावरणातील बदल व पर्यावरण कारणीभूत असतात. तसेच अपत्यप्राप्तीसाठी स्त्री-पुरुषाची शारीरिक क्षमता आणि तदनुषंगिक बाबी विचारात घेऊनच योग्य औषधोपचार करावे लागतात. केवळ साकडी घालून वा नवस बोलून अशा गोष्टी कशा काय साध्य होतील?
..तसे असते तर देवाला साकडे घालून दाऊद, टायगर मेमन, हाफीज सईद यांना भारत सहज ताब्यात घेऊ शकला असता. अमिताभ बच्चन-राजेश खन्ना यांच्याजागी रितेश देशमुख, सफ अली खान सुपरस्टार म्हणून दिसले असते. सचिनऐवजी पाíथव पटेलला क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातला ताईत बनविणे सोपे गेले असते. तेव्हा अंधश्रद्धा निर्मूलनाची सुरुवात प्रथम सुशिक्षितांपासून केली पाहिजे.
-अनिल रा. तोरणे, तळेगाव-दाभाडे

भाबडेपणा तर आहेच, पण झळाही लागताहेत..
‘स्विस खुळखुळा’ हा अग्रलेख (२४ जून) भाबडय़ा मानसिकतेवर अचूक प्रकाश टाकणारा. लेखाच्या सुरुवातीला योगाच्या वाढत्या लोकप्रियतेवर अतिशय समर्पक भाष्य आहे. योगाभ्यासासारख्या अनेक शतकांपूर्वीच्या क्रीडा, कालांतराने योग सूत्रांना प्राप्त झालेले वलय, भारतीय संस्कृतीचा देदीप्यमान वारसा असा निर्माण केलेला आभास, याचाही परामर्श लोकसत्तेतून घेतला जावा. बहुसंख्य भारतीयांची मानसिकता अद्याप भाबडी, चटकन भारावून जाणारी अशी मानसिकताच कोणतेही शारीरिक श्रम न करता चित्रवाणीवरील ‘रामदेवासने’ पाहत डोक्याला लावण्याच्या तेलापासून चहाबरोबर खायच्या बिस्किटापर्यंत सर्व बाबी रामदेव बाबांचा शिक्का पाहूनच खरेदी करून निरोगी आरोग्याच्या स्वप्नरंजनात रममाण होतात.
अग्रलेखाच्या शेवटी बांधकाम व्यवसायावर लिहिले आहे. काळय़ा पशावर फोफावलेले बांधकाम क्षेत्र सर्वसामान्यांचे आयुष्य उजाड करणारे. निवारा या मूलभूत गरजेचे ‘गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय’ यात झालेले रूपांतर आणि त्याची सामान्य माणसाला बसलेली झळ, त्यापायी वाढलेला संघर्ष, त्यानंतरची सर्वत्र कुचंबणा यावर ठोस कृती हवी. सामान्य लोकांना देशोधडीला लावणारे, काळा पैसा न देणाऱ्यांना बेघरच ठेवणारे हे बांधकाम साम्राज्य! त्याच्या मुळावर घाव घालण्याचे धाष्टर्य़ कोणामध्ये नाही. त्याऐवजी जनतेच्या हाती कसला न कसला खुळखुळा देऊन तिला गप्प करणे अधिक सोपे. अग्रलेखात ते समर्पकरीत्या मांडले आहे.
-रजनी अशोक देवधर, ठाणे

भारतातील बँकाच आधी तपासा!
स्वित्र्झलडहून भारतीय काळा पसा परत आणून आíथक तूट भरून काढण्याची कल्पना करणाऱ्यांच्या अज्ञानाची ‘स्विस खुळखुळा’ या अग्रलेखातून व्यक्त झालेली कीव योग्यच म्हणायला हवी. पद्मनाभ मंदिरात सापडलेला सोन्याचा पुरातन खजिना पोत्यात भरून रिझव्‍‌र्ह बँकेत नेणेही जिथे सोपे नाही तिथे परदेशातल्या बँकांना आमचा पसा द्या असे छातीठोकपणे सांगणे शक्य तरी आहे का? आपल्याच देशात फिरणारा पसा तिकडे जाऊन पडत असेल, ही भाबडी कल्पना असणाऱ्यांनी पसा काळा कसा होतो याचा विचार करणे गरजेचे आहे. कुठल्याही क्षेत्रातली कामाची मोठी मोठी कंत्राटे घेणारे उद्योगी खरेदी-विक्रीत किती कागदी घोडे नाचवत असतील, उच्च दर्जाच्या मालासाठी खर्च केलेला दाखवून निकृष्ट दर्जाचा माल वापरून इमारती, रस्ते, पूल जनतेच्या माथी मारीत असतील, उघड होणारे काळे व्यवहार पांढरे करण्यासाठी अधिकाऱ्यांचे हात ओले करीत असतील, ‘भ्रष्टाचाराला प्रतिसाद देऊ नये’ अशा पाटय़ांखालीच ‘देवाणघेवाण’ होत असेल याची कल्पना शासनाधिकारी, नेते, राजकारणी आणि ‘स्विस खुळखुळा’ खेळणाऱ्यांना नसेल, असे नव्हे. आता प्राप्तिकर, विक्रीकर, सेवाकर, उत्पादन कर हे सारे विभाग संगणक प्रणालीने एकमेकांकडील माहितीची देवाणघेवाण करून खोटय़ा व्यवहारांचे पितळ उघड करू शकत आहेत. ‘कोअर बँकिंग’मुळे बँक खात्यांची माहिती क्षणार्धात मिळवू शकत आहेत. अशा परिस्थितीत भारतातील बँकांमध्येच किती काळा पसा इकडून तिकडे पळत असतो, हे जाणून घेण्यासाठी आपल्याकडची बडी बँक खाती आधी तपासायला हवीत.
परदेशी बँकांत इकडून पसा जातच नसेल असा दावा करता येणार नाही. पण अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे, आपल्याच भूमीत जिरवलेला काळा पसा त्याचेच उत्पादन वाढवत राहील आणि आपण परदेशाची भूमी धोपटून वाट बघत बसू. यात आपलेच हसे होण्याची शक्यता दिसते.
-श्रीपाद पु. कुलकर्णी, बिबवेवाडी, पुणे

या गुरकावणीने काय साधणार?
‘स्विस खुळखुळा’ हा अग्रलेख (२४ जून) वाचला. याच अंकात अन्यत्र,  ‘काळ्या पशाचा तपशील तातडीने द्या’ ही केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींची गुरकावणीसुद्धा वाचण्यात आली. भावनांना चुचकारून, एकमेकांस पूरक भाष्य व प्रसंगी सहकार्य करून वातावरणनिर्मिती करावयाची आणि देशाला लुटणाऱ्या खऱ्या दरोडेखोरांवरून लक्ष विचलित करायचे, हे राजकारण नेहमीचेच. आपले काहीही गर असू द्या, सतत भ्रम निर्माण करून राजकीय पोळी शेकणाऱ्यांच्या परंपरेत, सुज्ञ मतदारांनी आपले मन व बुद्धी जैसे थे गहाण ठेवून अण्णा, बाबा व आमचे नेते म्हणतील तेच करावे व आपले भले करून घ्यावे काय?
-संजय कळमकर, अकोला</strong>

देव नव्हे, संत
साईबाबा देव नाहीत असे द्वारकापीठाचे शंकराचार्य सांगतात त्यात काही गर नाही. कुणा सर्वसामान्य व्यक्तीचेही हेच मत असू शकते. केवळ शंकराचार्यानी जाहीरपणे व्यक्त केले म्हणून त्यावर वाद उत्पन्न झाला. सोन्याचे सिंहासन बनवून, कोटी रुपयांच्या देणग्या देऊन पशांनी गब्बर असलेल्यांनी हे स्तोम माजवून साई-श्रद्धेचा प्रचंड बाजार निर्माण केला आहे हे सत्य आहे. साईबाबा हे संत होते असे मला वाटते. ‘माझे मंदिर बांधा, पूजा करा’ असे साईबाबांनी कधीही सांगितले नाही. मला कोणीही वारस नाही असे साईबाबांनी सांगूनही बापूसारखे स्वत:ला साईबाबांचे अवतार म्हणवून घेत जनतेला फसवत आहेत.
– नंदकिशोर पेडणेकर, अहमदनगर</strong>