डॉ. अशोक केळकर यांच्या निधनाची वार्ता वाचताना मला १९७४ साली तेव्हाच्या पुणे विद्यापीठातल्या तीन आठवडय़ांच्या मराठी नवभाषाविज्ञान शिबिराची आठवण झाली. त्या वेळी १०० गुणांच्या पेपरात २० गुण वाङ्मयीन निबंध, ४० गुण पारंपरिक व्याकरण आणि ४० गुण जुजबी भाषाशास्त्र अशी मांडणी होती. ती बदलून नवं वर्णनात्मक भाषाविज्ञान आणण्याचा घाट घातला गेला. केळकर सर आम्हाला प्रशिक्षण देण्यासाठी येत. त्यांची स्वनिम, पदिम, रुपिम ही परिभाषा नव्या प्राध्यापकांना थोडीफार उमगायची आणि जुन्यांच्या डोक्यावरून जायची. केळकर सर मात्र स्थितप्रज्ञ मुनीप्रमाणे संथपणानं वर्गात यायचे व नवभाषा विज्ञान सोपं करून सांगण्याचा प्रयास करायचे. जुनी मंडळी त्यांचा मान राखून हुज्जत घालायची. सर शांतपणे निरूत्तर करायचे, तरीही अधूनमधून उभयपक्षी क्षोभ व्हायचा. इतर प्रशिक्षकांमध्ये डॉ ना. गो. कालेलकर, मु. श्री. कानडे, रा. शं. वािळबे आदींचा समावेश होता. या सगळ्यांमध्ये केळकर सरांची वैचारिक शिस्त, पद्धतशीर विषयमांडणी, फलकलेखन, आग्रही प्रतिपादन नव्या प्राध्यापकांना आदर्शवत वाटायचे. शंका पडल्या तरी विचारायचा धीर व्हायचा नाही, असा त्यांचा अनोखा दरारा व दबदबा होता!
त्यांनी डॉ. रा. भा. पाटणकर, गंगाधर पाटील, म. सु. पाटील यांच्या सहकार्यानं एम.ए. समीक्षाशास्त्राचा अभ्यासक्रम तयार केला. तो पुढील काही वर्षांतच पार पचपचीत करण्यात आला!
विजय काचरे, कोथरुड, पुणे

कार्यकर्ते गोंधळात अन् नेतेही युतीकडे नाहीत!
जागावाटपावरून शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या आपसातील मतभेदांमुळे या पक्षांचे कार्यकत्रे एकमेकांच्या उमेदवारांचा संपूर्ण शक्तिनिशी प्रचार करणार नाहीत. त्यामुळे युतीला विधानसभा निवडणुकीत सहजासहजी बहुमत प्राप्त होईल असे वाटत नाही.
 मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार युतीतर्फे जाहीर न करण्याचा निर्णय चुकीचा आहे. त्यामुळे मतदारांवर छाप पाडू शकेल असा एकही नेता युतीकडे नसल्याचा समज दृढ होण्यास मदत होते.
 दुसरीकडे, निवडणुकीत बहुमत मिळाल्यास मंत्रिपदाची धुरा यशस्वीरीत्या सांभाळून समर्थपणे निर्णय घेऊ शकतील असे किती नेते युतीकडे आहेत याचा विचार केल्यास आशादायक चित्र दिसत नाही हे मान्य केलेच पाहिजे. त्यामुळे युतीचे सरकार आले तर राज्याची सर्वागीण प्रगती होईल यावर विश्वास ठेवणे कठीण वाटते.
केतन र. मेहेर, विरार (पूर्व)

‘मुंडे असते तर..’ हा गोड गैरसमज
‘उल्लू बनािवग’ हा अग्रलेख (२२ सप्टेंबर) महायुतीमध्ये जो काही जागावाटपावरून पोरखेळ चालू आहे त्याचा उत्तम परामर्श घेणारा आहे. परंतु ‘आज गोपीनाथ मुंडे हयात असते तर चित्र वेगळे दिसले असते’ हे विधान पटणारे नाही. कारण लोकसभा निवडणुकांनंतर लगेच प्रसारमाध्यमांसमोर यापुढचा महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री नव्हे तर मुख्यमंत्री मीच होणार हे त्यांनी जाहीर करून टाकले होते. त्यांच्या निधनानंतर विधान भवनात त्यांना श्रद्धांजली वाहताना भाजपचे पांडुरंग फुंडकर काय म्हणाले होते ते गोपीनाथरावांची कन्या विसरली असेल, पण जनता विसरलेली नाही. त्या पांडुरंग फुंडकरांना सध्या या चच्रेमध्ये कुठेच स्थान नाही. १९९९ च्या निवडणुकीनंतर हमखास युतीच्या हाती येऊ शकणारी सत्ता कोणाच्या व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेमुळे गमवावी लागली हेसुद्धा जनता विसरली नसावी. त्यामुळे मुंडे आज हयात असते तर चित्र वेगळे दिसले असते, हा केवळ गोड गरसमज आहे, असे माझे मत आहे.        – मोहन गद्रे, कांदिवली.

उमेदवार कोण आहे, हे पाहूनच पुढले सारे..
आपल्याच पक्षाला बहुमत मिळणार आणि मीच मुख्यमंत्री होणार या भ्रमात काही नेते वावरत आहेत. लोकसभेच्या यशानंतर महाराष्ट्रात भाजपचा कधी नव्हे एवढा आत्मविश्वास वाढला आहे, त्यामुळे गेल्या २५ वर्षांच्या आणि ‘विचारांच्या तत्त्वावर आधारित’ असलेल्या युतीत गोंधळ चालू आहे, तर राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा दोन जागा जास्त मिळाल्यामुळे त्यांच्याही आघाडीत बिघाड आला आहे.  या पक्षांना आपापली ताकद जास्त आहे असे वाटत असल्याने प्रत्येकाला आपापली ताकद अजमावायची आहे; परंतु युती अथवा आघाडी तुटल्याचा ठपका आपल्यावर येऊ नये याची प्रत्येकजण काळजी घेताना दिसत आहे. मतदार आता दुधखुळे राहिलेले नाहीत.. उमेदवार बघूनच ते मतदान करतात हे लोकसभेच्या निवडणुकीवरून स्पष्ट झाले आहे. पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी येणार हे पाहूनच मतदारांनी एकगठ्ठा मतदान भाजपला केले होते; तशी स्थिती महाराष्ट्रातील कुठल्याच नेत्याबाबत नाही.
त्यामुळे नेत्यांनी आपलेच सरकार येणार म्हणून हवेत महाल बांधू नयेत. नाहीतर त्यांची ती दिवास्वप्ने ठरतील.
भरत माळकर

सुवर्णसंधी, पण दुर्बुद्धी
शिवसेनेचे पदाधिकारी जेव्हा विधानसभेच्या जागावाटपाबाबत प्रतिष्ठा, ‘आत्मसम्मान’ या शब्दांचा वापर करतात तेव्हा हसावे की रडावे हेच समजत नाही. गेली १५ वष्रे तुम्ही सत्तेच्या बाहेर आहात त्याची काही चाड नाही आणि आता सत्तेत येण्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे तर यांना दुर्बुद्धी सुचते! किती ताणावे यालादेखील काही मर्यादा हव्यात. इतकी वष्रे निवडणुका हरलात तेव्हा तुमची प्रतिष्ठा गेली नाही. रामदास कदमांना आपली खेडची जागादेखील राखता आली नाही तेव्हा यांची प्रतिष्ठा गेली नाही. मुंबईत खड्डय़ांचे साम्राज्यच केलेत तेव्हा तुमची प्रतिष्ठा वाढली? यांना राजकीय शहाणपण केव्हा येणार? मराठी माणसाचे दुर्दैव! आणखी काय?
एस. एम. खोत

फटका दोघांना..
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत फूट आणि आघाडीची बिघाडी या विषयावर एवढा ऊहापोह सुरू आहे की, सर्व पक्षांतील कार्यकत्रे बऱ्यापकी बुचकळय़ात पडले असतील. पंचवीस वर्षांची युती आज निर्वाणीच्या स्थितीत आहे आणि जर का भाजपच्या अती ‘ग’मुळे युती तुटली तर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणे पाहावयास मिळतील.
मोदी लाटेचा फायदा होईल या आशेवर शिवसेनेशी फारकत घेण्याची भाजप जी तयारी करत आहे ती नक्कीच भाजपच्या मुळाशी येईल, कारण महाराष्ट्रात मराठी मते ही शिवसेनेला साथ देतील, असा नेहमीचा कल आहे.
सामान्य कार्यकर्त्यांच्या इच्छेविरुद्ध युती तुटली तर शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांना त्याचा परिणाम दिसून येईल आणि कोण किती पाण्यात आहे हेही कळेल.
अमित देवळेकर, कांदिवली (मुंबई)

.. पुन्हा निवडून या!
लोकसभा निवडणुकीत या वेळी राज्यात शिवसेनेचे जास्त खासदार निवडून आले, कारण ‘मोदी लाट’ होती हे जगजाहीर आहे. परंतु आता विधानसभा निवडणुकीत शिवसेना ते कबूल करायला तयार नाही, तर ‘आम्ही आमच्या बळावर निवडून आलो व त्याचा भाजपला फायदा झाला’ हे त्यांचे म्हणणे. याला मुख्य कारण म्हणजे मुख्यमंत्री पदावर डोळा.
हीच जर भावना शिवसेनेची असेल तर त्यांच्या सर्व खासदारांनी राजीनामे द्यावेत व पुन्हा निवडणुकीत विजयी होऊन दाखवावे. अजूनही मराठी जनतेची युतीला निवडून आणायची इच्छा आहे, परंतु शिवसेनेला ते मान्य नाही, असे वाटते.
कुमार करकरे, पुणे</strong>

‘ओझे’ नकोच!
‘निवडणुकीचे अकारण ओझे’ (१९ सप्टें) हा ‘अन्वयार्थ’ वाचला. निवडणुकीच्या कामामुळे सरकारी कर्मचारी व शिक्षक आदींवर ताण वाढतो व  रोजच्या कामावरही अन्याय होतो. त्यामुळेच, जे सरकारी कर्मचारी वा शिक्षक निवृत्त झालेले आहेत व ज्यांची शारीरिक स्थिती चांगली आहे व ज्यांची योग्य मोबदल्यात करण्याची इच्छा आहे अशा निवृत्तांना निवडणुकीचे काम सोपविण्यात यावे, त्यांच्या अनुभवाचा या कामास उपयोग होईल. आवड असणाऱ्या निवृत्तांचा वेळ सत्कारणी लागेल.
– वीणा वैद्य