‘तृणमूलचा उद्वेग’ हा अन्वयार्थ (लोकसत्ता, २२ डिसेंबर) वाचला. शारदा चिट फंड घोटाळ्यात तृणमूलचा पाय कितपत खोलात आहे, हे यथावकाश कळेलच; पण यानिमित्ताने सीबीआय वा तत्सम सरकारी तपासयंत्रणा सत्ताधाऱ्यांनाच धार्जण्यिा असतात, हे यूपीए काळात वारंवार सिद्ध झालेले सत्यच पुन्हा अधोरेखित होते आहे की काय, अशी शंका येते.
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाचे बोट धरून भाजपला पश्चिम बंगालमध्ये आपले हातपाय पसरायचे आहेत. म्हणूनच, तृणमूल या प्रतिपक्ष क्रमांक एक असलेल्या पक्षाला खाली पाडण्याची कोणतीही संधी भाजप सोडू इच्छित नाही.
काँग्रेस पक्ष सध्या तरी सुप्तावस्थेत गेलेला असल्यामुळे त्यांची कुलंगडी बाहेर काढण्याची ‘अत्यावश्यकता’ भाजपला वाटत नसावी. असे नसते, तर हरयाणातील रॉबर्ट वडेरा जमीन प्रकरण, दिल्लीतील शीला दीक्षित यांच्यावरील राष्ट्रकुल घोटाळ्यातील आरोप आणि महाराष्ट्रातील कृपाशंकर सिंग बेनामी मालमत्ता प्रकरण, हे गरव्यवहार अचानक ठळक बातम्यांमधून गायब झाले नसते. या तीनपैकी शेवटच्या दोन प्रकरणांचे गांभीर्य असे की, शीला दीक्षित यांनी केरळच्या राज्यपाल असल्याची सबब पुढे करीत खटला न चालविण्याची विनंती केली होती, तर कृपाशंकर सिंग यांच्यावरील खटला चालविण्याला तत्कालीन विधानसभा अध्यक्ष वळसे पाटील यांनी परवानगी नाकारली होती. आता दोघेही पदच्युत झाले असले तरी त्यांच्यावरच्या खटल्यांविषयी काहीच कसे ऐकू येत नाही?
गुलाब गुडी, मुंबई

‘हिंदू’ धर्मवाचक शब्द नसून  ती राष्ट्रवाचक संज्ञा!
‘धर्मातरविरोधी कायदा आणा’ ही बातमी (लोकसत्ता, २२ डिसेंबर) वाचली. हिंदू हा अर्थश: राष्ट्रवाचक शब्द आहे. हिंदू हा धर्म नसून ती जीवन जगण्याची पद्धत आहे. सहस्रावधी वर्षांच्या हिंदू संस्कृतीचे संदर्भ इतिहासामध्ये सापडतात. हिंदू शब्दाला धर्माचे संकुचित वृत्तीचे आवरण देऊन प्रसिद्धीमाध्यमे (अपवाद वगळता) समाजामध्ये गरसमज पसरवत असल्याचे निदर्शनास येत आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे हिंदू राष्ट्राच्या नियत जीवनहेतूविषयी साभिमान निश्चितीने उद्गारतात, ‘‘..ज्या वेळी हिंदू हा हिंदुत्वातीत होतो तेव्हा तो श्री शंकराचार्याप्रमाणे ‘वाराणसी मेदिनी’ ही विशाल भावनाच व्यक्त करू लागतो आणि श्री तुकाराम महाराजांप्रमाणे ‘आमुचा स्वदेश? भुवनत्रयामध्ये वास?’ असेच गर्जून सांगतो. काय म्हणता? माझा स्वदेश? ऐका तर बंधूंनो, माझ्या देशाच्या मर्यादा म्हणजे त्रलोक्याच्या मर्यादा, तीच माझ्या देशाची सीमा?’’ भगवान श्रीकृष्ण, गौतम बुद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदू जीवनशैलीचा व्यापक विचार जगाला दिला. हिंदू जीवनशैली आणि संस्कृतीचे ‘स्वातंत्र्य’ हेच वैशिष्टय़ आहे.
विनीत शंकर मासावकर, नेरळ  

धर्मात गाळ आहे, पण शिकवणही आहेच
‘धर्मसंस्थेची अवस्था मुदत संपलेल्या औषधासारखी’ ही बातमी (लोकसत्ता, २२ डिसेंबर) वाचली. सुप्रसिद्ध गीतकार गुलजार यांचे हे मत असले तरी यानिमित्ताने चर्चा सुरू होते हे चांगले झाले. आज कुटुंब, राजकीय, शैक्षणिक, अर्थ आदी अनेक संस्थांमध्ये बेदिली, गोंधळ दिसत आहे, म्हणून त्यात सुधारणा करायची की दोर कापायचे? २०११ पासून अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला लोकशाही संस्थांमध्ये माजलेल्या बजबजपुरी व भ्रष्टाचाराने वैतागलेल्या जनसामान्यांनी रस्त्यावर उतरून आपला राग व्यक्त केला म्हणून लोकनियुक्त संस्थांना टाळे लावले जाईल काय? त्यातून मार्ग काढावा लागतो.
आज मूल्यांचा ऱ्हास झाला आहे म्हणून धर्म अडगळीत जाईल, असे भाकीत करणे हे केव्हाही कपोलकल्पित ठरावे. सद्य:परिस्थितीत अगतिक, किंकर्तव्यविमूढ झालेल्या मानव्याला उभारी द्यायची असेल, तर त्याची धर्माशी नाळ जोडून कोणी देत नाही, तर मनुष्यप्राणी तेथे आपोआपच खेचला जातो. त्यात बाबा-बुवा-दादा बनून कोणी गोरगरिबांचे, रंजल्यागांजल्यांचे शोषण करतात, त्यामुळे भ्रमनिरास होतो, हे मान्य केले तरीही धर्माची शिकवण ही इह-पारलौकिक कल्याण करणारी आहे हे विसरून कसे चालेल. आजपण भोळेभाबडे लोक बलात्कार केलेल्या बाबांचे समर्थन करतात, हे त्यांच्या गुलामीचे निदर्शक आहे.
मात्र यावरून धर्माला मोडीत काढणे, निवृत्त करणे ही भाषा भेद करणारी ठरावी, कारण अडाणी, अंध लोकांना विचारकिरणे धर्मवेत्ता गुरूच प्रदान करू शकतो. हरिपाठात नमूद एका ओवीत ‘संताचे संगती मनो मार्ग गती- आकलावा श्रीपती येणे न्याये’ हे धर्ममार्गाची प्राथमिकता ठळक करते. धर्मात गाळ साठला आहे हे मान्य करूनही, पण धर्माने विशिष्ट ध्येय प्राप्त होऊन माणूस समाजात विधायक, रचनात्मक कामास उद्युक्त होतो.
हुशार मंडळी उदासीन राहून मत व्यक्त करतात. परिणामी समाजात असामंजस्य वाढीस लागते. तेव्हा जनसामान्यांचा भेद होऊ नये यासाठी सदर पत्रप्रपंच.
किशोर सामंत, भाईंदर

घरवापसीनंतर जात, गोत्र कोणते ?
भ्रष्टाचार निपटून काढू, काळा पसा हुडकून काढू, गरीब जनतेला सन्मान मिळवून देऊ, अशा आकर्षक घोषणांची मतदारांना भुरळ घालत निवडणुका जिंकून भाजपने सत्ता स्थापन केली खरी; पण आता मात्र त्यांनी स्वत: दिलेल्या वचनांचा त्यांनाच विसर पडलेला दिसतो. इतकेच नव्हे, तर संघ परिवाराने प्रायोजित केलेला धर्मातराच्या छुप्या अजेंडय़ावर त्या पक्षाने सोयीस्कर भूमिका घेत मान डोलावत राष्ट्रीय स्व. संघाला खूश ठेवण्याचे ठरवले आहे. आग्रा, दक्षिण गुजरात येथे काही जणांनी स्वखुशीने हिंदू धर्म स्वीकारला, असे सांगण्यात येते.
मग मनात असा प्रश्न येतो की, ज्यांनी हिंदू धर्म स्वीकारला, असे सांगितले जाते त्यांचा कोणत्या जातीत समावेश केला जाईल? त्यांनी केलेल्या सरकारी अर्जातील  ‘तुमची जात कोणती?’ या रकान्यात त्यांनी काय लिहायचे?
जन्मत: हिंदू असलेल्या व्यक्तीस त्याच्या परिवारात चालत आलेले विशिष्ट गोत्र लावण्याची परंपरा भारतात पूर्वापार रूढ आहे. मग भारतीय संस्कृतीचा वसा जपण्याचा ताम्रपट आपल्याचपाशी आहे, असा दावा करणारा संघ परिवार हिंदू धर्मात प्रवेश केलेल्यांना कोणते गोत्र चिकटवणार आहे? मुंबई, कोल्हापूर, पुणे या परिसरांत असाच एक भंपक गुरू आपल्या समर्थकांना स्वत:चे नावच गोत्र म्हणून लावायला सांगतो! त्याच्या भक्त म्हणवून घेणाऱ्या स्त्रियांनी कसलाही विचार न करता त्याचा ‘आदेश’ स्वीकारला आणि त्या भंपक गुरूचे नाव आपले गोत्र म्हणून स्वीकारले. याला कोणत्या संस्कृतीचा आधार आहे?
‘धर्म म्हणजे मुदत संपलेले औषध’ हे कवी गुलजार यांचे उद्गार अगदी समयोचित आहेत!
पम्मी आणि प्रदीप खांडेकर, माहीम, मुंबई

स्वेच्छेने धर्मनिवडीचे स्वातंत्र्य हवे
‘धर्म म्हणजे मुदत संपलेले औषध’ हे कवी गुलजार यांचे प्रतिपादन अगदी नेमके आहे. पुरातनकाळात ज्ञान-विज्ञान आणि साहित्य, जाणिवा यांच्या कक्षा रुंदावलेल्या नव्हत्या त्या काळच्या अप्रगत मानवाच्या समाजव्यवस्थेसाठी देव, धर्म या संकल्पनांचा धाक आवश्यक होता. ही मुदत केव्हाच उलटून गेली आहे. एक्सपायरी डेट उलटल्यामुळे हे औषध आता किती विषारी बनले आहे ते सिद्ध करणारे पुरावे विविध हत्याकांडांच्या स्वरूपात दिसत आहेत. या औषधाचा त्याग करणेच इष्ट आहे हेच विविध पुरस्कारप्राप्त विचारवंत, कलावंत आणि वैज्ञानिक आपल्याला परोपरीने सांगत आले आहेत. देवाधर्माच्या या कुबडय़ा आता फेकून दिल्या पाहिजेत, अन्यथा त्यांचा वापर अण्वस्त्रांप्रमाणे मानवजातीच्या विनाशासाठी होईल.
धर्मनिरपेक्ष असलेल्या भारतीय घटनेने प्रत्येक नागरिकाला स्वत:साठी धर्म निवडण्याचा हक्क दिलेला आहे. तसेच कोणताही धर्म न अंगीकारता जगण्याचा अधिकारही दिलेला आहे. मात्र एक खटकणारी पद्धत म्हणजे आई/वडिलांचाच धर्म जन्मलेल्या मुलाला (बाय डिफॉल्ट) दिला जातो. यात अनवधानाने त्याचा स्वेच्छाधिकार डावलला जातो. जन्मसिद्ध धर्म बदलण्यासाठी अथवा धर्मनिरपेक्ष राहण्यासाठी त्याला स्वत:ला सरकारी कागदपत्रात तसे फेरफार करून घ्यावे लागतात. त्याऐवजी जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीने कोणत्याही धर्माची निवड स्वेच्छेने करेपर्यंत त्या व्यक्तीला धर्मनिरपेक्ष समजून त्या गटात त्याची नोंदणी (गणना) व्हावी अशी कायदेशीर तरतूद असावी.            
– प्रमोद तावडे, डोंबिवली