‘तोच खेळ पुन्हा पुन्हा..’ हा गिरीश कुबेर यांचा लेख (अन्यथा, १० जानेवारी) वाचला. त्यातील ‘खेळ’ हा शब्दप्रयोग कितीही समर्पक असला तरी दोन कारणांनी अतिशय अस्वस्थ करणारा वाटला. पहिले कारण म्हणजे दहशतवाद आणि त्यातून घडणाऱ्या हिंसक घटना वारंवार समोर येत राहिल्या, की त्याकडे बघण्याची आपली  नजर आपल्याच नकळत कशी मरते हे त्यातून अधोरेखित होते. पॅरिसमध्ये घडलेल्या घटनांचे वर्णन करताना अनेक माध्यमांमधून ओलीसनाटय़ ‘रंगले’ होते असा शब्दप्रयोग करण्यात आला. घडणारे प्रसंग अटीतटीच्या खेळासारखे ‘नाटय़मय’ होते हे तर खरेच आहे; पण ते ‘रंगले होते’ (‘घडत होते’ नव्हे!) असे आपण सहज म्हणून जातो. एखादा ‘डेली सोप’ पहावा तसे ते प्रसंग पाहिले जातात, तशीच क्षणिक चुटपुट लागते आणि तशीच लगेच निघूनही जाते!
 दुसरे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणात असे प्रकार बुद्धिबळ खेळावे तसे थंड डोक्याने खरोखरच ‘खेळले’ जातात हे वास्तव तर भयानक आहे. राजकारण, अर्थकारण आणि एकूणच मनुष्यस्वभाव यांचा अभ्यास सध्या ‘गेम थिअरी’ वापरून करण्यात येतो. दहशतवाद कसा ‘खेळला’ जात आहे ते वाचून ‘जेंगा’ या एका घरगुती चिनी खेळाची आठवण होते. त्यामध्ये सोन्याच्या चिपा असतात तशा आकाराचे लाकडी ठोकळे उभेआडवे रचून प्रथम अनेक थरांचा साधारण एक फूट उंचीचा मनोरा उभा केला जातो. आपल्यावर खेळाची पाळी आली, की खेळातून बाद न होण्याकरिता खालच्या थरांमधून एखादा ठोकळा अलगद काढायचा आणि मनोऱ्याच्या माथ्यावर नवा थर रचायला घ्यायचा असतो. सर्व जण ‘खेळात’ टिकून राहण्याकरिता हेच करत राहतात. परिणामी खालचे थर कमकुवत होत जातात आणि मनोऱ्याची उंची मात्र वाढत राहून तो दोलायमान होत शेवटी पडून जातो. मनोरा डळमळीत होत आहे हे दिसत असूनही ‘आजच्या घडीला मी खेळातून बाहेर फेकला जाता कामा नये’ असा तात्कालिक विचार करत सगळेच खेळाडू  नाश ओढवून घेतात! मी थांबलो तरी इतर थांबतील याची खात्री काय, असा विचार करून कोणीच थांबत नाही. सगळ्या जगाचाच एक ‘जेंगा’ होत चालला आहे, ही जाणीव लेख वाचून प्रकर्षांने होते.
– प्रसाद दीक्षित, ठाणे

‘वाघ वाचवा’ मोहिमेचे  हे अपयशच!
गेल्या दीड महिन्यांत तीन वाघिणींचा, इंदूरमधील कमला नेहरू पार्कमध्ये नागाच्या दंशामुळे पांढऱ्या वाघाचा मृत्यू.. खानापूरजवळ नरभक्षक वाघाला गोळ्या घालून मारले. गेल्या वर्षभरात आपापसातील भांडणांमुळे चार , पोलिसांनी गोळ्या घातल्याने दोन, फुप्फुसाच्या आजाराने एक, नसíगकरीत्या एक अशा ६४ वाघांचा अंत झाल्याच्या बातम्या वाचण्यात आल्या. एकीकडे प्रकाश आमटे यांच्या घरात इतर प्राण्यांबरोबर वाघही पाळला जातो. दुसरीकडे बेसुमार जंगलतोड, अन्नसाखळीतील मानवी हस्तक्षेपामुळे माणसांवर आणि पाळीव प्राण्यावर त्यांचे हल्ले वाढत आहेत. पण म्हणून गोळ्या घालून ठार मारणे हा उपाय असू शकत नाही.  सरकार ‘सेव्ह टायगर’ मोहीम चालवते. मोदी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे बोधचिन्हही वाघ आहे. तरीही एका वर्षांत इतक्या वाघांचा मृत्यू होत असेल तर या मोहिमेचे ते अपयश आहे.
शिवाजी  आत्माराम घोडेचोर,  तेलकुडगाव, ता. नेवासा,  जि. नगर

रेल्वे गोंधळाचे खापर कार्यालयांच्या वेळेवर!
रेल्वे गोंधळाचे खापर कार्यालयांच्या वेळेवर फोडून उपनगरीय रेल्वेवरील ताण कमी करण्यासाठी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत बदल करावा, ही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची सूचना वाचून आश्चर्य वाटले. पुढे आठवडय़ातील सुट्टय़ांचे वार एकसारखे ठेवू नयेत, कौटुंबिक कारणांसाठी घरातील कुटुंबाने उपनगरीय रेल्वे वापरू नये अशाही सूचना रेल्वेकडून येऊ शकतील. पुन्हा कार्यालयीन कामकाजाचे सर्वच दिवस वाटून झाल्यानंतर  मेगा ब्लॉक कधी घेणार हेही रेल्वेने जाहीर करावे.
इकडे मुंबई उपनगरीय रेल्वेची ७५ लाख प्रवासी दररोज ने-आण करताना दमछाक होते, तर मग जपानमध्ये एकटय़ा टोकियो शहरात त्यांच्या ४८ ऑपरेटर्सनी (कंपन्यांनी) चालविलेली खासगी रेल्वे खचाखच भरून (दरवाजे पुशरच्या मदतीने बंद करून) रोजची कमीत कमी २ कोटी प्रवासी ने-आण करते! परंतु त्यांच्याकडे अशी सूचना आल्याचे वाचनात नाही. त्याऐवजी मागे कोर्टाने आदेश दिल्याप्रमाणे मुंबईत ज्या ज्या आस्थापनांना शक्य आहे अशांनी म्हणजे काही सरकारी कार्यालये, बँक, इन्शुरन्स, वीज, टेलिफोन क्षेत्रांतील  कर्मचाऱ्यांची कामाची ठिकाणे त्यांच्या  घरापासून जवळ ठेवल्यास हा ताण काही प्रमाणात कमी होणार नाही काय?
प्रवीण आंबेसकर, ठाणे  

तेच पोलीस अधिकारी काय करणार?
‘कायदा-सुव्यवस्थेचा तिढा आता दिल्ली दरबारी ’ ही बातमी (१० जाने.) वाचली.  रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस यांच्यात कशा तांत्रिक अडचणी आहेत (की बेबनाव?) आहे याची माहिती घेतली आणि आता  विषयावर चर्चा करण्यासाठी १५ जानेवारी रोजी देशातील सगळ्या पोलीस महासंचालकांची बठक  त्यांनी बोलावली आहे.
 ही एक चांगली गोष्ट असली तरी रेल्वे प्रवाशांच्या समस्या या फक्त काही सुरक्षेपुरत्याच मर्यादित नाहीत. आता ‘दिवा’ स्थानकात जे काही घडले त्यावरून मंत्र्यांना प्रवाशांच्या सुरक्षेची जाणीव होऊ लागली आहे; पण सगळ्यात मोठा अडसर आहे तो भ्रष्टाचाराचा! तो कसा काय मंत्री महोदय दूर करणार आहेत? ज्या कारणासाठी या महासंचालकांची बठक बोलावली आहे त्यांना रेल्वे समस्यांची जाणीव नाही असे नाही आणि नसेल तर ते महासंचालक कसले?
 मंत्री सतत बदलत असतात, पण हे सुरक्षा अधिकारी कायम आपल्या अधिकारावर असतात. फक्त त्यांची क्षेत्रे बदलतात; पण परीघ हा सुरक्षेचाच असतो. त्यामुळे  रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेला विद्यमान सुरक्षा अधिकारीच जबाबदार आहेत आणि त्याच अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा प्रश्न कसा काय सुटणार?
अनिरुद्ध गणेश बर्वे, कल्याण</strong>

विद्यार्थ्यांत वैज्ञानिक दृष्टिकोन कसा रुजणार?
भारतीय विज्ञान परिषदेच्या समारोप समारंभात एक वक्ते म्हणाले की, ‘‘आपल्या विद्यार्थ्यांत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला पाहिजे, तरच मूलभूत संशोधन होईल.’’ मागे ‘किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना’ (केव्हीपीआय) या संदर्भात पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. गाडे यांनी म्हटले होते, ‘‘या योजनेतील विद्यार्थ्यांशी राष्ट्रीय पातळीवरील वैज्ञानिक थेट संवाद साधून त्यांची चाचणी घेतात. या प्रक्रियेत रॅशनल िथकर्सच टिकू शकतात.’’ या योजनेच्या प्रवेश-परीक्षेत उत्तीर्ण होणारे विद्यार्थी बुद्धिमान असतात, गहन विषयाचा अभ्यास करण्यास सक्षम असतात, यात शंका नाही. वानवा असते ती तर्कशुद्ध विचारसरणीची. ती विचारसणी अभ्यासता येत नाही. बालपणापासून मनावर होणाऱ्या संस्कारांतून ती विकसित वा कुंठित होत असते. ‘वैष्णवी! अगं, परवा तुझी  परीक्षा आहे ना? गणपती मंदिरात जाऊन ये. ’ यांसारखे उद्गार बालपणापासून कानी पडले, तर वैष्णवी तर्कशुद्ध विचार कशी करणार? विज्ञान शिक्षक विशेष मार्गदर्शन वर्गाचा प्रारंभ शुभ मुहूर्ताला करणारे.  घरी, शाळेत, टीव्हीवर, रस्तोरस्ती, देवळात.. जिथे जावे तिथे असे श्रद्धामय वातावरण सतत पाहिलेले. बुद्धिमत्ता असली तरी अशा स्थितीत वैज्ञानिक विचारसरणीचा विकास दुरापास्तच. बुद्धिमान मुले मूलभूत संशोधनाकडे का वळू शकत नाहीत त्याचे हे एक प्रमुख कारण असावे.
– प्रा. य. ना. वालावलकर