‘संपला वर्ल्ड कप?’ या एकाच वाक्यातून ‘काय चाललंय काय’मध्ये (१६ फेब्रु.)  प्रशांत कुलकर्णी यांनी आम्हा भारतीयांच्या मानसिकतेवर अगदी नेमके भाष्य केले आहे. पाकला धोपटण्यात एक आगळाच आनंद आणि नशा असते यात काहीच दुमत नाही, परंतु ‘पाकला हरवा मग वर्ल्ड कप जिंकला नाही तरी चालेल’ ही सर्वसाधारण धारणा मात्र व्यीवसायिकतेपासून मैलोगणती दूर वाटते. सर्वोच्चतेचा ध्यास न घेता केवळ वैयक्तिक शत्रुत्वाला अतिमहत्त्व देणे ही खास विकसनशील मानसिकता वाटते. काही ‘चाहते’ असा युक्तिवाद करतात की पाकसोबत खेळतानाच त्यांची भावना तशी असते, पण एकदा का पाकला हरवले की मात्र त्यांना विश्वविजेतेपदाचे वेध लागतात, पण फिरवून फिरवून या गोष्टीचा अर्थ तोच होतो.
ऑस्ट्रेलियासारख्या देशात ‘अमुकतमुकला हरवा मग नंतर जिंकला नाहीत तरी चालेल,’ असा बालिश दृष्टिकोन सहसा दिसून येत नाही. साहजिकच अशा संघांची मानसिकता जेतेपदासाठी जास्त अनुकूल ठरते. एका बाजूला क्रिकेट डिप्लोमसीसारखे प्रकार चालू असताना भारत-पाक सामन्याला धर्मयुद्धाचे रूप देणारी जनता आणि तितकाच पोरकट मीडिया पाहून जॉर्ज ऑर्वेल यांच्या एका वचनाची आठवण होते की, खेळ वगरे गोष्टीतून सद्भावना इत्यादी गोष्टी निर्माण होऊन कटुता कमी होत नसते या उलट एकमेकांप्रती कटुता व्यक्त  करण्याचेच हे आणखी एक माध्यम असते. भारतीय आणि पाकिस्तानी चाहते उन्मादाकडून आनंदाकडे लवकरच वाटचाल करतील ही अपेक्षा.    
अनिरुद्ध ढगे, वास्को (गोवा)

उभा दावा नकोच, आडवी येणारी मैत्रीही नको!
दोन भिन्न पक्षांच्या नेत्यांची वैयक्तिक मत्री लोकांना खटकता कामा नये, कारण विचारातले मतभेद वैयक्तिक जीवनात उमटण्याचे काहीच कारण नसते. पण लोकांना अशी मत्री खटकण्यास नेतेच कारणीभूत असतात. ते परस्परांवर तुटून पडतात तेव्हा आपले हल्ले विचारांपुरते मर्यादित ठेवत नाहीत. शरद पवार पूर्वी बाळासाहेबांच्या छातीच्या हाडांचा उल्लेख करीत असत तर ठाकरे पवारांना मद्याचे पोते म्हणत असत. अशा शेरेबाजीमुळे त्यांचे वैचारिक मतभेद शारीरिक पातळीवर येतात आणि ते कट्टर शत्रू असल्याचे चित्र निर्माण होते. तेव्हा नेत्यांनी परस्परांवरील हल्ले विचारांपुरते आणि धोरणांपुरते मर्यादित ठेवून वैयक्तिक मत्री जपावी. दुसरी अपेक्षा अशी की, परस्परांचे मित्रत्व कितीही जपले तरीही एकाने सत्तेवर आल्यानंतर दुसऱ्याच्या भ्रष्टाचारावर मत्रीपोटी पांघरूणही घालू नये. एवढीही गाढ मत्री असू नये आणि असली तरीही ती भ्रष्टाचाराच्या चौकशीत आडवी येऊ नये.
अरिवद जोशी, सोलापूर

शिवराळ संस्कृतीचा विजयोन्माद
क्रिकेटच्या विश्वचषक स्पध्रेत भारतीय संघाच्या पहिल्याच यशाने भारतीय समाजमन हरखून गेले. पण या यशाचा निभ्रेळ आनंद भारतातील काही विकृत क्रीडाशौकिनांच्या प्रतिक्रियांमुळे घेता आला नाही. सामन्याच्या दिवशी दिवसभर सोशल मीडियावरून पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या आई-बहिणीवरून अतिशय हीन अभिरुचीच्या शिव्यांचा प्रसार चालू होता. त्याच पद्धतीचे फोटोही बनवून प्रसारित केले जात होते. भारतीय संघाच्या विजयानंतर तर या उन्मादात आणखीच वाढ झाली. अश्लीलतेने कळस गाठला. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंची आई-बहीण काढणे ही कोणती संस्कृती आहे?
– वाघेश साळुंखे, मु. पो. वेजेगाव (ता.खानापूर जि. सांगली)

मतदारांचा संभ्रम अशा नेत्यांमुळेच
‘बेरजेच्या राजकारणातील वजाबाकी’ या अग्रलेखामध्ये (१६ फेब्रुवारी) अधोरेखित केलेला ‘राजकारण हे मुद्दय़ांभोवती फिरावयास हवे, व्यक्तींभोवती नव्हे’ हा मुद्दा वस्तुनिष्ठपणे विचार केला तर नक्कीच पटणारा आहे. पण सिंचन खात्यामधील कोटय़वधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेला राष्ट्रवादी पक्ष जेव्हा स्वत:हून हात पुढे करतो व डोळ्यात खुपणाऱ्या आपल्या मित्रपक्षाला धडा शिकविण्यासाठी संधीच्या शोधत असलेला भाजप जेव्हा त्याला सूचक प्रतिसाद देतो, तेव्हा नक्कीच या सगळ्या प्रकाराकडे वस्तुनिष्ठपणे न बघता विषयनिहाय बघावे लागते.
मोदी व पवारांच्या भेटीकडे (अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे)  ‘राजकारण आणि समाजकारण यातील केलेली गल्लत’ असे म्हणून दुर्लक्ष करणे म्हणूनच चुकीचे व धोक्याचे ठरेल.     
भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना व इतरही पक्षांतील नेतेमंडळींनी प्रतिस्पर्धी नेत्यावर हल्ला चढविताना नेहमीच व्यक्तिगत पातळीवर जाऊन शेरेबाजी केलेली आहे. तेव्हा मतदारांमध्ये, ‘हे एकमेकांचे राजकीय शत्रू की व्यक्तिगत शत्रू?’ हा संभ्रम निर्माण झाला तर त्याला हे नेतेच कारणीभूत नाहीत काय?
‘राजकारण आणि लोकशाही प्रक्रिया आपल्या समाजात पूर्णपणे रुजलेली नाही’ हे अग्रलेखातील वाक्य काहीसे न पटणारे आहे. मे महिन्यातील लोकसभा निवडणूक असो वा आता दिल्लीत झालेल्या विधानसभा, भारतीय मतदाराने या दोन्ही निवडणुकीत नक्कीच विकासाभिमुख विचारांना मत दिले आहे व व्यक्तींना झिडकारले आहे.
डॅनिअल मस्करणीस, वसई

नेत्यांचे मोठेपण..
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणूक प्रचारात शरद पवार  यांच्यावर खरमरीत टीका करताना अत्यंत कठोर व बोचरे शब्द वापरले होते. भाजपचे महाराष्ट्रातील एक जबरदस्त दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांनीही शरद पवार यांनाच लक्ष्य करून निवडणूक प्रचार मोठय़ा ताकदीनिशी केला होता. पण काही प्रसंगी बाळासाहेबांनी व मुंडे यांनीही शरद पवारांच्या संसदीय लोकशाहीतील योगदानाचा आणि उत्तम कार्यकर्ता घडविण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचा अगत्यपूर्वक यथोचित गौरव केला होता. हे विसरून चालणार नाही.
आजही सर्वच पक्षांतील वरिष्ठ नेते शरद पवार यांचे राजकीय व सामाजिक मोठेपण मान्य करूनच त्यांच्यावर टीका करतात. कारण प्रत्येक विषयाची सर्वागीण माहिती घेऊन, महाराष्ट्राला कल्याणकारी अशी काय उपाययोजना अमलात आणता येईल याबद्दलचे त्यांचे निर्णय उपयुक्त ठरतात, याची प्रचीती बऱ्याच वेळा राज्यकर्त्यांना आली आहे. सहमतीच्या राजकारणानेच या देशाचा राज्यकारभार पुढे नेता येतो हे सत्य सर्व राजकीय धुरिणांना कळून चुकल्यामुळे राजकारणात आता कोणालाच अस्पृश्यता पाळून चालणार नाही हे सत्यही सर्व जाणून आहेत. तेव्हा मोदी आणि पवार भेटीदरम्यान जे झाले ते महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला साजेसेच झाले. त्यावर टीका जरूर होऊ शकते, पण त्याची ही बाजूही आवर्जून लक्षात घेतली पाहिजे.  
मोहन गद्रे , कांदिवली.

लोकशाही वर्तनाचा मोठा धडा..
‘बेरजेच्या राजकारणाची वजाबाकी’ हा अग्रलेख (१६ फेब्रु.) वाचल्यावर संयुक्त महाराष्ट्राचे दिवस आठवले..
रत्नागिरीतून बॅ. नाथ प प्रचंड मताघिक्याने निवडून आले होते. वातावरणात एक बेभानता भरली होती. तिचा परिणाम म्हणून असेल पण एक वक्ते म्हणाले, ‘आज नाथ पंनी मोरोपंताना लोळविले आहे.’ क्षणाचाही विलंब न लावता नाथ पनी त्यांच्या हातातला माइक घेतला आणि म्हणाले, ‘असे म्हणू नका, मोरोपंत जोशी हे मोठे नेते आहेत. आजपर्यंत त्यांनी लोकसभेत रत्नागिरीचे प्रतिनिधित्व केले आहे. आज ते जनमतापासून दूर गेले म्हणून त्यांचा पराभव झाला आहे. पण अशा शब्दांत त्यांची अवहेलना करणे योग्य नव्हे!’.
महाविद्यालयात शिकणाऱ्या आम्हा तत्कालीन तरुणांना मिळालेला हा लोकशाही वर्तनाचा मोठा धडा होता. असे नेते आज दुर्मिळ झाले आहेत, पण लोकशाहीत काय हवे आहे हे अधिकारवाणीने सांगणारे अग्रलेख अजूनही वाचावयास मिळत आहेत याचा परम संताष वाटतो.
– व्ही. सी. देशपांडे