News Flash

वाचनदेशाटनाचे विच्छेदन

कोणत्याही ग्रंथोपासकाची वाढ फुलपाखरूनिर्मितीच्या ‘अंडी-अळी-कोष-पतंग’सारख्या अवस्थेप्रमाणेच होत असते.

| April 18, 2015 01:25 am

२३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन..
त्या निमित्तानं हे दोन लेख. एक अगदी नव्या आणि ‘संगणकयुगातल्या’ पुस्तकप्रेमाचा जागतिक धांडोळा घेणाऱ्या पुस्तकाबद्दल; तर दुसरा अगदी ओळखीच्या- जुनी पुस्तकं विकणाऱ्या दुकानाशीही जडलेल्या नात्याबद्दलचा..

कोणत्याही ग्रंथोपासकाची वाढ फुलपाखरूनिर्मितीच्या ‘अंडी-अळी-कोष-पतंग’सारख्या अवस्थेप्रमाणेच होत असते. पण बरे पुस्तकीय संस्कार आणि कुतूहललालसा यांची मात्रा अधिक असली, तर त्याचे वाचकपण खऱ्या अर्थाने विस्तारते. अन्यथा फुकाच्या भाषिक अभिमानाचे गोडवे गात कालमृत साहित्यप्रवाहाला चिवडणारे डबक्यांतील ‘पट्टीचे वाचक’ अवतीभवती भरपूर तयार होतात. असे खरे तर होऊ नये, देशाटनाने जी अनुभववृद्धी होते, त्याहून कैक पटीने वाचनदेशाटनाची प्रक्रिया वाचकाला विस्तारत नेते. गोष्टी-कथा-कादंबऱ्या-वैचारिक-उपयोजित साहित्य-आध्यात्मिक अशा वाचनाच्या आपल्या देशी अवस्था आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये वाचकतेचे अमर्यादपण बिंबविणारा ‘पुस्तकांवरील पुस्तके’ (‘बुक्स ऑन बुक्स’) हा गटही त्यात समाविष्ट झाला आहे.
वाचण्याच्या वेडाविषयी वाचून अल्पकाळासाठी वाचनउत्साह वृद्धिंगत होतो. वाचनलालसा ढवळली जाते, पण अशा वाचनाची अवस्था रहस्यसम्राट चित्रकर्ता आल्फ्रेड हिचकॉकच्या ‘रेफ्रिजरेटर मूव्ही’ संकल्पनेशी काहीशी मिळतीजुळती आहे. (या संकल्पनेनुसार तुम्हाला एखादा चित्रपट पाहताना तो किती थोर आहे, याचीच जाणीव होत राहते. चित्रपट पाहून घरी आल्यावर पाणी घेण्यासाठी रेफ्रिजरेटर उघडेस्तोवर त्या ‘थोर’ चित्रपटातील एकेक त्रुटीचा साक्षात्कार व्हायला सुरुवात होते.) येथे त्या वाचनवेडाच्या अवस्थेतील त्रुटी दिसत नाही. फक्त ती अवस्था प्राप्त करणे किती असाध्य आहे, याची कालांतराने जाणीव होते. त्यामुळे पुस्तकांविषयीच्या पुस्तकांचे परमउत्साहापुरते वाचन करणे म्हणजे एक प्रकारे ‘रेफ्रिजरेटर रीडिंग’च बनते. त्यातून लाभलेल्या अतिउत्साहामुळे तुमची पुस्तकखरेदी वाढते, वाचनयादी विस्तारते किंवा त्या यादीच्या अमर्यादतेच्या ओझ्याखाली वाचनच दबून जाते. बहुतेकदा जगण्यातल्या इतर कार्यबाहुल्यामुळे वाचनाचे क्षेत्र कमी झालेलेच पाहायला मिळते.
जगातील सर्व वाचनकर्त्यांची (अगदी ‘बुक्स ऑन बुक्स’ लिहिणाऱ्याचीही) समाधानपूर्ण वाचन होत नसल्याची खंत ही त्याचा वाचनश्वास सुरळीतपणे चालल्याची पावती असते. वाचनईप्सिते साध्य करण्यात आयुष्य खर्च करणाऱ्या ग्रंथवेडय़ांच्या कणभर गाथांनी मणभर वाचनभूत झोंबवून घेणाऱ्या वाचनप्रेमींना ‘बुक्स ऑन बुक्स’ गटातीलच, पण ‘रेफ्रिजरेटर रीडिंग’हून वेगळा वाचनानंद देणारे पुस्तक अगदी नव्याने बाजारात दाखल झाले आहे. ‘रीडिंग द वर्ल्ड- कन्फेशन ऑफ ए लिटररी एक्स्प्लोरर’ या अ‍ॅन मॉर्गन लिखित पुस्तकाचा वाचन पसारा आणि त्यातील वाचनलालसेची प्रजाती ही यापूर्वी वाचलेल्या कोणत्याही पुस्तकवेडाशी साधम्र्य नसलेल्या जातकुळीतील आहे. ही एका अर्थाने, संगणकोत्तर पिढीच्या वाचनाची तऱ्हा आहे..
साधारणत: २०११ सालाच्या अखेरीस (वाचनाचा एक अवघड प्रकल्प पूर्ण करून) २०१२ सालात जगातील प्रत्येक देशातील एक पुस्तक वाचण्याची मनीषा अ‍ॅन मॉर्गन यांनी आपल्या ब्लॉगवर व्यक्त केली. या इच्छेतील मर्यादांची जाणीव असलेल्या मॉर्गन यांना ब्लॉगवर आलेल्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांनी यथायोग्य इंधन मिळाले. जगभरातील हजारो व्यक्तींकडून सूचना, माहिती आणि थेट पुस्तकांचा ओघ सुरू झाला. त्यामुळेच एका प्रदीर्घ वाचन प्रकल्पाला सुरुवात झाली. जगातील १९६ देशांमधील प्रत्येकी एक साहित्यरत्न वर्षभरात वाचून पूर्ण करण्यासाठी ही विदुषी सज्ज झाली. त्या वर्षभरातील वाचनदेशाटनाचे संचित १२ दीर्घ निबंधांमधून पुस्तकरूपात एकत्रित आले आहे.
 जगाच्या कानाकोपऱ्यात विखुरलेल्या पुस्तकांपर्यंत पोहोचण्याच्या आणि त्यातून लाभलेल्या मनोरम्य आनंदाच्या जागा वाचकांसोबत वाटण्याचा या पुस्तकाचा हेतू नाही; किंबहुना या पुस्तकात अशा जागाच नाहीत. अत्यंत अभ्यासूपणे पुस्तक व्यवहाराची सांगड त्या त्या ठिकाणच्या संस्कृती, इतिहास, भूगोल, राजकीय आणि सामाजिक घटकांशी जोडण्याचा अवघड प्रकार लेखिकेने कष्टपूर्वक साध्य केला आहे. दक्षिण सूदान, चाड यांसारख्या युद्धसंपृक्त भागांतून प्रसविलेल्या साहित्याचा माग घेता घेता ज्या देशात इंग्रजीतून एकही पुस्तक भाषांतरित झाले नाही, अशा साहित्यकृतींचे अनुवादसुद्धा तिने अवघड वळणांनी प्राप्त केले आहेत. उझबेकिस्तान, उत्तर कोरियापासून न्यूझीलंडमधील बेटांवरील अल्पसाहित्याचा पाठलाग येथे लेखिका करताना दिसते. ती प्रकरणे वाचताना, पुस्तकवेडासोबत लेखिकेच्या ओघवत्या उत्साहाने वाचक अचंबित होतो.
माणसाच्या वाचनमर्यादा भवतालीय परिस्थिती आणि बुद्धिक्षमता यांच्यावर किती अवलंबून आहे, याची चर्चा करता करता येथे जगातील प्रकाशन संस्थांच्या वैश्विक पातळीवर सक्रिय होण्यातील अडचणींचा वेध घेण्यात आला आहे. वकूब असलेले साहित्यही देशांच्या सीमेमध्येच अडकू शकते; तर केवळ जागतिक पातळीवर पोहोचण्याच्या हेतूने लिहिले गेलेले साहित्य स्थानिक वाचकांशी प्रतारणा करणारे असू शकते, अशा खूप पटणाऱ्या निष्कर्षांनाही येथे स्थान आहे. इंग्रजीपुढे ९० टक्के भाषा अस्तंगत होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर काही गतप्राण भाषांमध्ये प्राण फुंकण्याच्या प्रयत्नांना लेखिकेने एका स्वतंत्र प्रकरणाद्वारे वाचा फोडली आहे.
साहित्यावर येणारा राजकीय दबाव, वादग्रस्ततेचा शिक्का बसल्याने मायभूमीपासून भूमिगत आयुष्य जगणारे लेखक, सांस्कृतिक घुसळणीतून धक्के खात उभे राहिलेले जागतिक भाषेत बोलणारे साहित्य, भाषांतरित साहित्याच्या मर्यादांतील वास्तव आणि तरीही त्याची गरज, इंटरनेट आणि तंत्रज्ञानाने वाचन आणि वाचकाच्या व्यवहारात झालेली उत्क्रांती आदी या लेखिकेचे ठळक अभ्यासविषय आहेत. या अभ्यासात तंत्रज्ञानामुळे ‘सपाट’ झालेल्या सांस्कृतिक स्फोटांचे संदर्भही येणारच असतात.. लेखिकेने ते चुकवलेले नाहीत. उदाहरणार्थ ‘सेक्स अ‍ॅण्ड द सिटी’ या अमेरिकी टीव्ही मालिकेचा वास्ता जागतिक महिला विचार उत्थापनाशी होता. चित्रपटांमध्ये क्वेन्टीन टेरेन्टिनोने आणलेल्या प्रवाहाचे संदर्भ आहेत, तर ब्रिटिश टीव्ही मालिका ‘शेरलॉक’च्या चीनमधील लोकप्रियतेचा आढावा आहे. वास्तविक या संदर्भाचा वाचनव्यवहाराशी थेट संबंध नाही. तरी त्यांची जागतिक व्याप्ती लक्षात घेतली, तर या लेखिकेच्या बहुश्रुततेचे दर्शन होते.
सन मारिनो या युरोपीय महासंघाचा घटक असलेल्या देशात इंग्रजी भाषेत अनुवादित झालेले एकमेव साहित्य लेखिकेला सापडले. ते होते १९७६ साली पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी छापलेले पत्रकपुस्तक. उत्तर कोरियासारख्या राजकीय जाचाखाली तयार होणारे ‘बंधकसाहित्य’, चीनमध्ये पाश्चिमात्य साहित्याची होणारी चक्रम रूपांतरे आणि त्या परिस्थितीतही त्या भाषांतरित साहित्यावर पडणाऱ्या उडय़ा, यांचा गमतीशीर आलेख येथे मांडण्यात आला आहे.
भारताविषयी या लेखिकेचे कुतूहल अनेक प्रकरणांमधून उमटले आहे. अ‍ॅगाथा ख्रिस्तीच्या कादंबऱ्या भारतातील छोटय़ा रेल्वे स्थानकांमध्ये सहजपणे उपलब्ध होतात, याचे लेखिकेला अप्रूप वाटते. एम.टी. वासुदेवन नायर यांचे मल्याळममधून अनुवादित झालेले पुस्तक प्रकल्पासाठी निवडले असले, तरी अमिश त्रिपाठीच्या मिथक कादंबऱ्यांना मिळालेल्या लोकप्रियतेशी ती ज्ञात आहे. (याशिवाय गोव्यातील पुस्तक प्रकाशन संस्थांची माहिती, गोरखालॅण्डच्या संघर्षांचा थेट उल्लेख वाचायला मिळतो.)
 अज्ञात पुस्तकांचे आणि लेखकांचे शेकडो संदर्भ लेखिकेने उपलब्ध करून दिले आहेत. पुस्तकांवरची पुस्तके वाचण्यातील सर्वात मोठी उपलब्धी हीच असते; पण येथे वाचलेल्या १९६ पुस्तकांसोबत अनेक देशांतील केवळ पहिल्या धारेच्या साहित्य-साहित्यिकांवर दृष्टिक्षेप नाही. अनुभववृद्धीसाठी अधिकाधिक खोलवर जाण्याची तयारी लेखिकेने केली आहे. त्यामुळेच ‘वर्ल्ड विदाऊट बॉर्डर्स’सारख्या निव्वळ जागतिक साहित्य प्रसविणाऱ्या मासिकाहूनही अधिक संदर्भ वाचकांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. शेकडो ब्लॉगर्स, हजारो वाचक आणि ब्रिटनमधील असलेल्या दूतावासांशी संपर्क साधून लेखिकेने आपले वाचनदेशाटन समृद्ध केले आहे. निव्वळ वाचन-उद्दीपनाचे कार्य न करता, तसेच अत्यंत संयतपणे-निरुपयोगी प्रवासचर्चाचा आणि खर्चाचा उल्लेख कटाक्षाने टाळत- हे वाचनदेशाटन लेखिकेने एकाही दिवसाची विश्रांती न घेता पूर्ण केले आहे, त्याचे कुतूहल आणि लेखिकेविषयी असूया अशा संमिश्र भावना वाचकांच्या मनात दाटून येऊ शकतात!  
पुस्तकांविषयीची पुस्तके जो मूलभूत क्षणिक परमानंद देतात, तो या पुस्तकाचा हेतूच नाही. जगातील साहित्यव्यवहाराचा त्रिमितीय वेध घेण्याचा येथे प्रयत्न आहे. साहित्याच्या निर्मितीवर परिणाम करणाऱ्या जवळजवळ सर्वच घटकांना येथे खणून काढण्यात आले आहे. त्यातून घडलेला जगाचा वाचनव्यवहार आज कोणत्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे, याचाही शोध घेण्यात आला आहे. ग्रंथप्रेमी असलो तर आपल्या वाचन अवस्थेची ‘लिटमस चाचणी’ घेऊ शकतो, हा पुस्तकाचा प्रमुख फायदा आहे. बाकी मिळू शकणाऱ्या वाचनाच्या नव्या संदर्भखाणी हिऱ्यांच्या आहेत की कोळशाच्याच हे व्यक्तिसापेक्ष ठरेल.

१९६ देश
१९६ पुस्तकं
१२ दीर्घ निबंध
१ लेखिका
१ वर्ष

*‘रीडिंग द वर्ल्ड- कन्फेशन्स ऑफ ए लिटररी एक्स्प्लोरर’
लेखिका  : अ‍ॅन मॉर्गन
प्रकाशक : हार्विल सेकर/ पेंग्विन
पृष्ठे : ३२६ , किंमत : ७९९ रु.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2015 1:25 am

Web Title: reading the world confessions of a literary explorer
Next Stories
1 पुस्तकवेळ!
2 मुंबईत ४५० वर्षांपूर्वी फुललेली ज्ञानाची बाग!
3 रेल्वे सांभाळणार कशी?
Just Now!
X