जनक आदींना व्यवहार न सांडतादेखील मोक्षसुख मिळालं. देख पा जनकादिक। कर्मजात अशेख। न सांडिता मोक्षसुख। पावते जाहले।। आता मोक्ष ही स्थिती ज्या अर्थी व्यवहार न सोडता अनुभवता आली, त्याअर्थी मोक्ष वा मुक्ती ही मृत्यूनंतरची नव्हे तर जगत असतानाचीच स्थिती आहे. मग मृत्यूनंतर परमानंदात विलीन होण्यापेक्षा जगतानाच परमानंदात डुंबता येणं अधिक चांगलं नाही का? ते कधी होऊ शकेल? जनकादिकांना ते का साधलं? कारण भौतिकाचं, व्यवहाराचं वास्तविक रूप ते जाणत होते आणि म्हणूनच त्यांचा परमार्थही वास्तविकच होता!  वास्तविक म्हणजे काय? तर जसा आहे तसा. भौतिक जसं आहे तसंच त्यांना स्पष्टपणे आकळत होतं आणि परमार्थ जसा असला पाहिजे तसाच ते करीत होते! आपल्याला भौतिक जसं आहे तसंच जाणवतं का हो? नाही. भ्रम, मोह, आसक्ती, अज्ञान यांच्या भिंगातून आपण भौतिकाकडे पाहत असतो. मग ते भ्रामकच दिसतं. आजारात तोंड असं कडू होतं की कोणत्याही पदार्थाची चव जशी आहे तशी जाणवतंच नाही. तसं भवरोगानं ग्रासल्यामुळे भौतिकाचं वास्तविक रूप आपल्याला समजतच नाही. आपण आपल्या कल्पनेतून, अपेक्षांतून भौतिकाकडे पाहतो आणि ते आपल्या मनासारखं व्हावं, यासाठी धडपडत राहातो. त्यामुळे प्रत्यक्षात जे दु:खाचं आहे तेच मला सुखाचं वाटत असतं, त्याच्याच प्राप्तीसाठी मी धडपडत असतो. प्रत्यक्षात ज्यात हानी आहे त्याद्वारेच लाभ होईल, असं मी मानत असतो. आता भौतिकात माझी फसवणूकच होत असते आणि परमार्थात मी सद्गुरूंना फसवू पाहत असतो! समर्थ सांगतात, ‘‘प्रपंची जो अप्रमाण। तो परमार्थी खोटा।।’’ अप्रमाण म्हणजे प्रमाण न पाळणं. प्रमाणापेक्षा अधिक किंवा प्रमाणापेक्षा कमी. प्रमाणापेक्षा कमी प्रपंच तर आपण कधीच करीत नाही. उलट प्रपंच आपण प्रमाणाबाहेर करीत असतो आणि त्यात प्रमाणाबाहेर गुंतलोही असतो. त्यामुळे चोवीस तास धडपडूनही माझा प्रपंच कधीच पुरा होत नाही, पण उपासना मात्र अध्र्या तासात पूर्ण होते! आपण म्हणतो ना? आजचा जप करून टाकला, आजची उपासना करून टाकली, आजचं पारायण करून टाकलं! बरं ते ‘करून टाकताना’ही सर्व लक्ष प्रपंचाकडेच असतं! प्रपंचातली उरलेली कामं आपल्याला खुणावत असतात. मग तो परमार्थही खोटाच नाही का? तेव्हा उपासना झाली एकदाची, असं आपण मानतो पण आजचा प्रपंच झाला एकदाचा, असं कधीच म्हणत नाही! कुठलं तरी काम उरलंच असतं आणि त्याची चुटपुटही असते. तेव्हा जनकादिकांनी व्यवहार सांडला नाही आणि आपण तर तो बिलकूल सांडत नाही. थोडक्यात व्यवहार दोघांनी केला, पण व्यवहार करतानाच मोक्षाचं सुख जनकादिकांना मिळालं आपल्याला मात्र ते नाही! श्रीगोंदवलेकर महाराज म्हणाले की, चोराला बेडय़ा ठोकून पोलीस रस्त्यानं जात असतो. एक बेडी चोराच्या तर दुसरी पोलिसाच्या हातात असते. चोर गांगरलेला असतो तर पोलीस निर्भय असतो! तसे संसारात, व्यवहारात संत आणि आपण दोघे वावरतो. फरक एवढाच की आपण भेदरून तर ते निर्भयपणे वावरत असतात.