ज्याला कोणतंही ज्ञान नव्हतं अशा गिरीला शंकराचार्यानी सर्वज्ञ केलं. या चराचरात सर्वत्र जे तत्त्व भरून आहे त्याचं ज्ञान ज्याला झालं तोच सर्वज्ञ झाला. याच गिरीचं रूपांतर मग तोटकाचार्यामध्ये झालं आणि उत्तरेतील ज्योतिर्मठ पीठाचे ते पहिले जगद्गुरू झाले. ‘‘साधनांनी जे साधत नाही ते संतांच्या सहवासात राहिल्याने साधते’’ या श्रीगोंदवलेकर महाराज यांच्या बोधवचनाच्या अनुषंगाने आपण ही कथा पाहिली. आता याचा अर्थ साधनेचं महत्त्व कमी लेखून नुसत्या सहवासालाच अधिक महत्त्व आहे का? इथे सहवासाचा खरा अर्थ जर जाणला नाही तर गोंधळ होऊ शकतो. या सहवासाचा अर्थ आपण गेल्या काही भागांत चर्चिला आहेच. त्याचा श्रीमहाराजांच्या आधाराने अधिक विचार करू. सहवास किंवा समागम म्हणजे नुसतं जवळ राहाणं नव्हे. एक कथा आपण अन्य एका सदरामध्ये मागेही पाहिली होती. भगवान बुद्धांचा एक ज्येष्ठ शिष्य होता. तो स्वत:ला भगवानांचा सर्वोत्तम शिष्य मानत असे. काही काळाने भिक्खूंच्या संघात एक तरुण शिष्य दाखल झाला. त्याची प्रेमळ वागणूक आणि भगवान बुद्धांचा बोध आचरणात आणण्याची धडपड सर्वाच्याच मनाला प्रेरित करीत होती. भगवानांनी त्याला एका उपक्रमासाठी प्रमुख म्हणून नेमले. या ज्येष्ठ शिष्याला हा आपला अपमानच वाटला. संतापाच्या भरात थेट भगवान बुद्धांनाच जाब विचारायला तो गेला. तेव्हा भगवान बुद्धांसमोर खिरीचं एक पात्र होतं. ते खीर खाणार तोच हा शिष्य तावातावानं आपलं म्हणणं मांडू लागला. भगवान हसले आणि त्याला म्हणाले, ‘‘जरा या खिरीची चव घेऊन सांगा ती ठीक झाली आहे का?’’ त्यानं खिरीचा चमचा तोंडात टाकला आणि म्हणाला, ‘‘हो खीर चांगली झाली आहे, पण ते महत्त्वाचं नाही, आधी माझं ऐका..’’ भगवान म्हणाले, ‘‘तुम्ही येण्याआधीपासून हा चमचा या पात्रात होता पण त्याला खिरीची चव सांगता आली नाही, तुम्ही क्षणार्धात ती सांगितलीत!’’ तेव्हा सहवास म्हणजे नुसतं जवळ असणं नव्हे. आपण कुणाच्या जवळ आहोत आणि या जवळ असण्याचा हेतू काय, लाभ काय, याचं ज्ञान असणं हा खरा सहवास आहे. हा खरा समागम आहे. श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘सम रीतीने जाता आले तर खरा समागम घडतो. पण आमचा मार्ग विषय आहे; म्हणून संत भेटूनही त्याचा समागम होत नाही’’ (प्रवचन, १२ एप्रिल). वरील वाक्यात श्रीमहाराज विषम शब्दाऐवजी विषय शब्द वापरतात. याचं कारण विषय हाच विषम आहे. विषयांनी प्रेरित होऊन माणूस जी कृती करतो ती नि:स्वार्थ असूच शकत नाही. जिथे स्वार्थ आहे तिथे समता नाही. तेव्हा विषम स्थिती प्रसवणाऱ्या विषयांच्या मार्गानं आम्ही सद्गुरूकडे जातो आणि राहतो मग समत्व येणार कुठून? मग खरा समागम, खरा सहवास घडणार कसा? खरा समागम नसताना, आंतरिक एकरूपता नसताना साधनांची कितीही आटाआटी केली तरी काही साधणार नाही. खऱ्या सहवासानंच साधेल, असाच श्रीमहाराजांचा सांगावा आहे.

avimukteshwaranand saraswati
VIDEO : “गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळवून देऊ”, नववर्षानिमित्त शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींनी व्यक्त केला संकल्प!
Why is neem and jaggery consumed during Gudi Padwa 2024
गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळाचे सेवन का करतात? काय आहे कारण, तज्ज्ञांकडून जाणून घ्या….
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र