या पुस्तकाचे शीर्षक आणि मुखपृष्ठ पाहून ही साचेबद्ध गुन्हेगारी कथा असावी, असा समज होतो. पण त्याला छेद देणारी ही सत्यकथा असल्याची भावना पुस्तक वाचून संपल्यानंतर होते.
‘द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ सीरियल किलर्स डॉटर’ हे उपशीर्षकच या पुस्तकाचे सूत्र आहे. मेलिसा मूर हिने एम. ब्रिजेट कूकच्या मदतीने ही सत्यकथा सांगितली आहे. ती सांगणे ही तिची मानसिक गरज तर होतीच, पण त्यापेक्षाही अधिक काही तिला त्यातून सुचवायचे आहे, आवाहन करायचे आहे. तिला अपेक्षित परिणाम ती साधते. साध्या, सोप्या, प्रवाही भाषेत मेलिसाच्या कुटुंबाची कहाणी उलगडत जाते. किथ जेसपर्सन या ‘सीरिअल किलर’ची ती मुलगी. मात्र पुस्तकात तिच्या वडिलांनी केलेल्या आठ महिलांच्या खुनांचा तपशील नाही. तर या विकृत, दुहेरी व्यक्तिमत्त्वाच्या गुन्हेगाराच्या कुटुंबाला कोणत्या दुर्दैवी प्रसंगांमधून जावे लागते याची ही गोष्ट आहे.
अमेरिकेतील कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रश्नाकडेही यातून लक्ष वेधले जाते. मेलिसाचे वडील घटस्फोट घेतात आणि दुसरे लग्न करतात. तिची आईही हाच कित्ता गिरवते. सावत्र वडील आपल्या आईला एवढय़ा-तेवढय़ा कारणावरून मारहाण करत असल्याचा अनुभव मेलिसा व तिच्या भावाला आणि बहिणीला किशोरवयातच येतो. तिच्या आईला पैसे मिळवण्यासाठी राबावे लागते. खुद्द मेलिसावर तिचा एक मित्र बलात्कार करतो. तिचा गर्भ पाडण्यासाठी तिला अमानुष मारहाण करतो. तिच्या बहिणीच्या हाताचा चावा तिचे सावत्र वडील घेतात. तिची आई त्यांना रोखू शकत नाही. सावत्र वडिलांनाही पोलिसांच्या ताब्यात द्यावे लागते. मेलिसा तसेच तिच्या बहीण व भावाला सावत्र वडिलांचा जाच सहन करत अगदी कमी जागा असलेल्या घरात दिवस काढावे लागतात. त्यांची खाण्यापिण्याची, कपडय़ालत्त्यांची आबाळ होते. याला कारणीभूत असतात तिचे वडील. ते खुनी असल्याचे उघड झाल्यानंतर या भावंडांना जबरदस्त मानसिक धक्का बसतो. त्यांना बाहेर तोंड दाखवायला जागा राहत नाही. मानसिक त्रासाला आणि सामाजिक अवहेलनांना तोंड द्यावे लागते.
वडिलांचे सावट या भावंडांवर अखंडितपणे पडलेले राहते. पुस्तकाच्या पानापानांमधून ते जाणवते. ही सर्व भावंडे त्यांच्या वडिलांमध्ये भावनिक पातळीवर गुंतलेली असतात. मेलिसाला तर वडिलांचा जास्तच लळा असतो. मात्र तिन्ही भावंडांमध्ये तीच जाणती असल्याने तिला वडिलांच्या विकृतीची जाणीव तीव्रपणे होते आणि त्याच्या वेदनाही सहन कराव्या लागतात. मात्र तिने वडिलांचे दुहेरी व्यक्तिमत्त्व, त्यांच्यातील क्रौर्य, कामपिसाटपणा आणि त्यामुळे निर्माण झालेली मानसिक आंदोलने यांचे संयमित चित्रण केले आहे.
वडील एका मांजरीच्या पिल्लाचा गळा आवळून त्याला शेतात फेकून देतात, तेव्हा लहानग्या मेलिसाला त्यांच्यातील क्रौर्य पहिल्यांदा जाणवते. मुलीला ते त्यांच्या लैंगिक संबंधांचे तपशील सांगतात. हा प्रकार शहारा आणणाराच वाटतो. आपले वडील लैंगिक संबंधांबाबत बेछूट आहेत, हे तिला या तपशिलांमधूनच समजते. एकीकडे असे धक्के बसत असताना मेलिसा आणि तिच्या भावंडांनाही त्यांचे उंचेपुरे, भरदार शरीरयष्टीचे वडील हवे असतात. कारण ते त्यांच्याशी प्रेमळपणे वागतात. त्यांचे लाड पुरवतात. त्यांच्या कपडय़ांच्या गरजा भागवतात. त्यांना खाऊपिऊ घालून त्यांचे गरिबीतील काही दिवस सुसह्य़ करतात. मात्र आता आपल्याला वडिलांचा सहवास कधीच लाभणार नाही; इतकेच नव्हे तर त्यांची ओळखही सांगता येणार नाही, याची दुखरी जाणीव मेलिसा व तिच्या कुटुंबीयांना होते. तिच्या वडिलांचे गुन्हे उघड होणे, त्यांना माध्यमांमधून प्रसिद्धी मिळणे या दुर्दैवी, मानसिक पातळीवर उद्ध्वस्त करणाऱ्या घटनांना मेलिसाचे कुटुंबीय सामोरे जाते.
या सर्व दाहक भूतकाळाला मागे टाकून मेलिसा व तिचे कुटुंबीय जगण्याला ताकदीने सामोरे जातात. सकारात्मक पर्याय शोधून काढतात. त्यांना ते मिळतातदेखील. वाईटाबरोबरच चांगल्या मानवी प्रवृत्तीही त्यांच्या वाटय़ास येतात. त्याचे वेधक चित्रण केले आहे.
मेलिसाने ही आपली सत्यकथा मांडताना तिच्या ‘सीरिअल किलर’ वडिलांबद्दल तसेच स्वतबद्दलही सहानुभूती निर्माण होऊ दिलेली नाही. निर्णयाचे धाडस योग्य वेळी दाखवल्यास कितीही विपरीत स्थितीतून बाहेर पडता येते हेच तिने ठळकपणे मांडले आहे.
या पुस्तकाच्या दोन त्रुटी ठळकपणे जाणवतात. पहिली म्हणजे मेलिसाच्या आईला तिच्या खुनी नवऱ्याबद्दल काय वाटते, एक माणूस म्हणून, पती म्हणून तिला तो कसा वाटतो याचा तपशील ठळकपणे आलेला नाही. दुसरी त्रुटी म्हणजे कथेचा शेवट दहा उपदेशांनी केला आहे. तो खटकतो. तो अधिक परिणामकारक करता आला असता. पण तरीही ही कथा वाचनीय ठरते. शेवटची या कुटुंबाची छायाचित्रे त्यांच्या शोकात्म जगण्याची सुखी सुरुवात अधोरेखित करतात.

शॉटर्ड सायलन्स-द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ सीरियल किलर्स डॉटर :  मेलिसा जी. मूर, एम. ब्रिजेट कूक
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे,
पाने : २४०, किंमत : ३२० रुपये.

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
lokrang article, book review, ekla chalo re, Autobiographical book, sanjeev sabnis, loksatta,
सकारात्मक आत्मकथन
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन