‘गाइड’सारख्या सिनेमातील तुफान गाजली. त्या गाण्यातले शब्द किंवा संगीताइतकाच त्यातला आवाज हाही अविस्मरणीय आहे. मग अशा वेळी गायकांना किंवा गाण्यातील इतर कलाकारांनाही या कमाईचा वाटा नको का मिळायला? कारण संगीतकार व गीतकार मात्र प्रसिद्धीच्या प्रमाणात पसे कमावत असतात. असाच प्रकार दूरचित्रवाहिन्या, नभोवाणी वा ध्वनिफिती काढणाऱ्या कंपन्यांबाबतही होत होता. यांना न्याय मिळण्यासाठीच मग एक करार करण्यात आला..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑस्कर सोहळा.. चित्रपट जगतातला सर्वोच्च पुरस्कार समजल्या जाणाऱ्या या सोहळ्याकडे जगातील सिनेप्रेमी डोळे लावून बसलेले असतात.. आपण भारतीय मात्र वर्षांनुवर्षे आपला एखादा चित्रपट या पुरस्कारासाठी नामांकित झाला यातच धन्यता मानत आलो आहोत. मात्र आपली मान अभिमानाने वर झाली २००९ साली.. जेव्हा ए आर रेहमान आणि गुलजारजींना ‘स्लम डॉग मिलिओनेयर’मधल्या ‘जय हो’ या गाण्यासाठी ऑस्कर मिळाले. गंमत अशी की ऑस्करमध्ये आपल्या बॉलीवूडच्या पुरस्कारांमध्ये संगीतासाठी असतात तसे ‘सर्वोत्कृष्ट संगीतकार, गीतकार, गायक आणि गायिका’ असे चार चार पुरस्कार नसतातच. पुरस्कार असतो फक्त ‘सर्वोत्कृष्ट गीत’ असा.. (शिवाय आणखी एक असतो सर्वोत्कृष्ट पाश्र्वसंगीताचा.. तोही त्या वर्षी ए आर रेहमानलाच मिळाला). महालक्ष्मी अय्यर आणि सुखविंदर सिंग या जोडगोळीने ‘जय हो’ हे गाणे फर्मास म्हटले होते.. मग तरी सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला ए आर रेहमान आणि गुलजारजींना.. असे का? या गायक-गायिकेचाही या गाण्यात सिंहाचा वाटा होता.. मग त्यांना का नाही त्याचे बक्षीस?
या प्रश्नाचे उत्तर शोधायला गेलो की कॉपीराइट्सशी संबंधित एक नवेच दालन उघडे होते. ‘शेजारी अधिकारांचे’ किंवा नेबिरग राइट्सचे. गाण्याचे दोन महत्त्वाचे भाग असतात. त्याचे शब्द आणि त्याचे संगीत. गाण्यावर कॉपीराइट कुणाचा? गाणे हे ज्याच्या बुद्धीची निर्मिती आहे त्यांचा. मग यातल्या शब्दांचा निर्माता आहे गीतकार आणि संगीताचा निर्माता आहे संगीतकार. म्हणून अर्थातच मग गाण्यावर या दोघांचा कॉपीराइट असतो. म्हणजे गाण्याच्या शब्दांवर गीतकाराचा आणि संगीतावर संगीतकाराचा. गाणी म्हणणारे गायक-गायिका किंवा त्यात संगीताचे तुकडे वाजवणारे कलाकार हे सगळेच त्या गाण्यात जीव ओतत असतात.. पण ही त्यांच्या बुद्धीची निर्मिती नसते. ते संगीतकारच्या सांगण्यानुसार आपले सादरीकरण करत असतात आणि हेच नाटकात किंवा चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्यांनाही लागू होते. लेखकाच्या आणि दिग्दर्शकाच्या सांगण्याबरहुकूम ते अभिनय करत असतात. त्यात त्यांच्या बुद्धीचा वाटा नाही.
पण मग आपल्या माहितीतली किती तरी गाणी अशी आहेत जी  केवळ त्यातल्या गायकांच्या आवाजामुळे अजरामर झाली आहेत. ‘गाइड’सारख्या सिनेमातील सदाबहार गाण्यांची रफीऐवजी मुकेशच्या आवाजात कल्पना करून बघा. त्या गाण्यातले शब्द किंवा संगीताइतकाच त्यातला आवाज हाही अविस्मरणीय आहे. त्या गाण्याला मिळालेल्या अमाप प्रसिद्धीत गायकाचाही सिंहाचा वाटा आहे. मग त्याचा वाटा त्याला मिळायला नको का? हा त्याचे नाव होईल.. ते गाणे भले त्याच्या नावाने ओळखले जाईल, पण त्याचा आíथक वाटाही त्याला मिळाला हवाच ना. गाणे तयार होत असताना अर्थातच गायकाला त्याचा मोबदला मिळालेला असतो. पण कधी ते गाणं अतिशय प्रसिद्ध होतं.. तर कधी कुणाच्या लक्षातही राहत नाही. कधी त्या गाण्यामुळे चित्रपट चालतो, प्रचंड कमाई करतो. त्या गाण्याच्या ध्वनिफिती विक्रमी प्रमाणात विकल्या जातात. मग अशा वेळी गायकांना किंवा गाण्यातील इतर कलाकारांनाही या कमाईचा वाटा नको का मिळायला? लोकांनी ते गाणं डोक्यावर घेतले असेल तरी गायकांनी ठरलेला मोबदला घेऊन गप्प राहायचे का? कारण  संगीतकार आणि गीतकार मात्र प्रसिद्धीच्या प्रमाणात पसे कमावत असतात. ठरलेल्या मोबदल्याशिवाय त्यांनाही गाण्याने केलेल्या कमाईच्या प्रमाणात रॉयल्टी नको का मिळायला?
या कलाकारांप्रमाणेच आणखीही दोन वर्ग आहेत, ज्यांचे हक्क डावलले जात असत. एक म्हणजे प्रसारण करणारी माध्यमे म्हणजे टीव्ही किंवा नभोवाणी वाहिन्या (ु१ूिंं२३ी१२). उदा. ‘गीतरामायण’ हे सर्वप्रथम आकाशवाणीने प्रसारित केले. मग सुधीर फडके आणि गदिमा यांच्याशिवाय आकाशवाणीचाही त्यावर काही अधिकार असला पाहिजे किंवा क्रिकेट सामन्याचे हक्क पसे देऊन विकत घेणाऱ्या टीव्ही चॅनेलचाही यावर अधिकार असायला हवा आणि दुसरे म्हणजे फोनोग्राम बनविणाऱ्या किंवा ध्वनिमुद्रण करणाऱ्या कंपन्या. उदा. टिप्स कॅसेट्स किंवा टी सीरिज वगरे. तर अशा सर्व मंडळींसाठी, म्हणजे सादरीकरण करणारे कलाकार (गायक, नट वगरे), प्रसारण करणाऱ्या संस्था आणि ध्वनिमुद्रक अशा तिघांसाठी निर्मिती करण्यात आली कॉपीराइट्सशी ‘संबंधित अधिकार’ (रिलेटेड राइट्स), ज्याला काही देशांत म्हणतात ‘शेजारी अधिकार’ (नेबिरग राइट्स) म्हणजे कॉपीराइट्सच्या शेजारी राहणारे अधिकार.
या सगळ्यांच्या अधिकारांना मान्यता देणारा रोम कन्व्हेंशन हा करार मान्य करण्यात आला आणि या कराराशी सहमत असलेल्या देशांत कॉपीराइट्सबरोबरच या शेजाऱ्यांचेही अधिकार मान्य केले जाऊ लागले. या कराराला मान्यता देणाऱ्या देशांपकी भारत हाही एक देश आहे आणि म्हणून इथे या तिन्ही वर्गातील लोकांना आपापले अधिकार बजावण्याची मान्यता आहे.
कॉपीराइट्स आणि या शेजारी अधिकारांवर मालकी असणाऱ्यांना दोन प्रकारचे अधिकार असतात. एक म्हणजे आíथक अधिकार. म्हणजे त्या कलाकृतीमुळे निर्माण होणाऱ्या पशांवरचे अधिकार आणि दुसरे म्हणजे नतिक अधिकार. हे नतिक अधिकार कुठले? तर कलाकृतीवरचे पितृत्व हक्क. म्हणजे जिथे जिथे ती कलाकृती सार्वजनिक होत असेल तिथे तिथे तिच्या निर्मात्याचा नामनिर्देश झालाच पाहिजे. दुसरा म्हणजे आपल्या कलाकृतीचे बीभत्सीकरण थांबविण्याचा अधिकार.
एखादा कलाकार जेव्हा आपल्या कलाकृतीवरचा कॉपीराइट दुसऱ्या कुणाला विकतो. म्हणजे समजा तो आपल्या कादंबरीवरचा कॉपीराइट एखाद्या चित्रपट निर्मात्याला चित्रपट बनविण्यासाठी देऊन टाकतो- तेव्हा तो त्यावरचा आíथक हक्क देत असतो. म्हणजे एक ठरावीक रक्कम तो निर्मात्याकडून घेतो आणि त्या बदल्यात तो चित्रपट निर्माण झाल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या पशांवर पाणी सोडतो. पण इथे लक्षात ठेवण्यासारखी अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही की, कलाकाराने आपल्या कलाकृतीवरचा कॉपीराइट कुणाला देऊन टाकला म्हणजे त्याने त्यावरचे आíथक अधिकार देऊन टाकलेले असतात आणि हे आíथक अधिकार जरी रीतसर लेखी दस्तावेज करून देऊन टाकलेले असतील तरी त्या कलाकृतीवरचा नतिक अधिकार मात्र कलाकाराकडेच राहतो. म्हणजे सार्वजनिकरीत्या त्या कलाकृतीला आपली म्हणण्याचा कलाकाराचा हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि कलाकृतीचे बीभत्सीकरण थांबविण्याचा अधिकारही सदैव कलाकाराकडे असतो. हे दोन्ही कलाकाराचे नतिक अधिकार आहेत आणि हे नतिक अधिकार कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. ते आजन्म त्याचेच राहतात.
कॉपीराइट्सची अंमलबजावणी करण्यात कलाकारांना येणारी आणखी एक अडचण म्हणजे त्यांचे उल्लंघन होतेय हे समजणार कसे? म्हणजे समजा भारतात मी संगीतबद्ध केलेल्या हिन्दी गाण्याची धून कुणी माझ्या परवानगीशिवाय वेस्ट इंडिजमध्ये कॉपी करत असेल तर मला ते कसे कळणार?
तर यावरचा तोडगा म्हणजे कॉपीराइट सोसायटय़ा. गायकांच्या, लेखकांच्या, फोनोग्राम प्रोडय़ूसर्सच्या अशा सोसायटय़ा प्रत्येक देशात असतात. या सोसायटय़ा आपल्या सभासदांच्या हक्कांची अंमलबजावणी करतात आणि त्या बदल्यात आपल्या कमाईचा काही भाग हे सभासद या सोसायटय़ांना देतात. म्हणजे मी समजा एक गायक आहे आणि माझ्या परवानगीशिवाय मी गायलेले गाणे जर कुठल्या नभोवाणी वाहिनीवर प्रसारित होत असेल तर त्याचा शोध मला लावणे अवघड असते. पण मी जर भारतात नोंदणीकृत असलेल्या गायकांच्या कॉपीराइट सोसायटीची सदस्य असेन तर माझ्या हक्काचे उल्लंघन होत नाही आहे हे पाहण्याचे काम माझ्या कॉपीराइट सोसायटीचे, माझे नाही.
त्या बदल्यात या सोसायटय़ा दणदणीत मोबदला माझ्याकडून घेतात. पण माझा मोबदला साफ बुडण्यापेक्षा ‘र्अध त्यजती पंडित:’ या न्यायाने त्यांचा मोबदला देणे मला परवडते. शिवाय देशोदेशीच्या अशा कॉपीराइट सोसायटय़ांचे एकमेकांशी लागेबांधे असतात आणि त्यांच्या मदतीने कलाकाराला केवळ आपल्याच देशातील नव्हे, तर इतर देशांतीलही- आपल्या हक्कांचे उल्लंघन थांबवता येते.
तर ही झाली कॉपीराइट्स आणि त्यांचे सख्खे शेजारी असणाऱ्या ‘संबंधित अधिकारांची’ गोष्ट. कलाकारांमध्ये हे वाचून आपल्या हक्कांबद्दल थोडी जरी जागृती झाली तरी ही साठा उत्तराची कहाणी सुफल संपूर्ण!
प्रा. डॉ. मृदुला बेळे – mrudulabele@gmail.com

*लेखिका औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापिका असून बौद्धिक संपदा कायद्यातील पदवीधर व पेटंट सल्लागार आहेत.

मराठीतील सर्व कथा अकलेच्या कायद्याची बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recording industry and copyright
First published on: 25-06-2015 at 12:30 IST