06 August 2020

News Flash

पोलिसांवरील कामाचा ताण कमी करावा

वरिष्ठावर गोळय़ा झाडून पोलीस अधिकाऱ्याने स्वत: आत्महत्या केल्याच्या खळबळजनक बातमीने (३ मे) मुंबईकरांची झोप उडाली.

| May 4, 2015 12:16 pm

वरिष्ठावर गोळय़ा झाडून पोलीस अधिकाऱ्याने स्वत: आत्महत्या केल्याच्या खळबळजनक बातमीने (३ मे) मुंबईकरांची झोप उडाली. ज्यांनी गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवायचे त्यांनी स्वत:च गुन्हेगार बनायचे यापेक्षा आणखी दैवदुर्वलिास तो कोणता!  वाकोला पोलीस ठाण्यातील ही दुर्दैवी घटना एकच दर्शविते की, पोलिसांवर सध्या असलेला अति ताण, ज्यामुळे मानसिक व शारीरिक संतुलन बिघडते. कामाच्या अति ताणामुळे आतापर्यंत अनेक पोलीस  हृदयविकाराने मरण पावले आहेत. या विषयी गेल्या अनेक वर्षांपासून ओरड होत असली तरी ठोस उपाययोजना केली जात नाही. आज अनेक विभागांत गरजेपेक्षा अधिक कर्मचारी आहेत आणि अत्यावश्यक सेवा मानलेल्या पोलीस विभागात मात्र  मनुष्यबळ फारच कमी आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत  म्हणून पोलिसांवरील कामाचा ताण कमी करणे अत्यंत गरजेचे आहे.

चीनची मानसिकता
‘चीतपट की ‘चीन’पट’ हा गिरीश कुबेर यांचा लेख (२ मे) वाचला. ‘अन्यथा’ या सदरातून चीनपासून भारताला असणारा धोका वारंवार अधोरेखित केला जात आहे आणि अतिशय गंभीर बाब ही की, हा धोका सामरिक कमी आणि आíथक क्षेत्र व पायाभूत प्रकल्पांच्या बाबतीत किती तरी जास्त आहे. स्वत:ची मनुष्यहानी होऊ देण्यापेक्षा या क्षेत्रांमध्ये स्वत:चे वर्चस्व स्थापन करून समोरच्याला नामोहरम करण्याची चीनची मानसिकता स्पष्ट दिसत आहे. ‘एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक’ स्थापन करण्याची चीनने केलेली घोषणा हा या मानसिकतेचाच एक भाग आहे.
 काही मुद्दय़ांवर अधिक विचार होणे आवश्यक वाटते. उदाहरणार्थ, जागतिक बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक किंवा तत्सम बँकांचा कारभार कितपत पारदर्शक आहे? ‘आपल्याच’ देशांसाठी त्यांनी किती रकमेची कर्जे दिली आहेत व त्यांची वसुली व्यवस्थित होत आहे का? ‘िवडो ड्रेसिंग’ कितपत चालते? झुकते माप कोणाला दिले जाते? ज्या उद्दिष्टांसाठी अशा बँकांची स्थापना झाली आहे, त्यांची पूर्तता होत आहे का व असल्यास किती प्रमाणात? आज अमेरिकेची दादागिरी चालते आहे, उद्या चीनची चालेल. मुळात पोलादी पडद्याआडून कारभार करणारा चीन काही किमान पारदर्शकता तरी ठेवेल का याची शंका वाटते. आशिया खंडात असणाऱ्या तिसऱ्या जगातील देशांना या बँकेचा उपयोग किती होणार ते चीनच्या हातात आहे. त्यामुळे या बँकेत भारताचे ‘उपाध्यक्ष’रूपी संभाव्य अस्तित्व हे ‘मम’ म्हणण्यापुरते राहणार, की  लेखात म्हटल्याप्रमाणे मोदी सरकार या आव्हानांच्या आकाराची ओळख करून त्याप्रमाणे पावले उचलणार हे काळच ठरवेल.
 – अभय दातार, ऑपेरा हाऊस (मुंबई)

वेगळे आयोग स्थापन करा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या वर्ग एक व वर्ग दोन शासकीय अधिकाऱ्यांना आता विदर्भ आणि मराठवाडय़ात नेमणूक देण्यात येणार असल्याची बातमी  (१ मे) वाचली. या परीक्षेत मुंबई, पुणे, सोलापूर, नाशिककडील उमेदवारांचेच वर्चस्व असते. मुंबई, पुणे व नाशिक भागांतील उमेदवार आपली नियुक्ती विदर्भ,मराठवाडय़ात होऊ देत नाहीत आणि झाली तरी या भागात काम करण्यापेक्षा आपली बदली कशी होईल यासाठी ते आपली सर्व  ताकद खर्च करतात.
 यावर एकच उपाय, तो म्हणजे वेगवेगळे निवड आयोग स्थापन करून त्या त्या भागांतील उमेदवारांची निवड केली, तर फक्त सहा वर्षांसाठी नाही, तर ते आपल्या नोकरीचा संपूर्ण कार्यकाळ या भागात आनंदाने काम करण्यात घालवतील आणि या भागातील महत्त्वाची पदे वर्षांनुवर्षे रिकामी राहणार नाहीत. विदर्भ आणि मराठवाडय़ातील जनतेची कामे वेळेवर होतील. सरकारला कोणत्याही अधिकाऱ्यावर जबरदस्ती करावी लागणार नाही, कारण ज्या विभागातून उमेदवाराने परीक्षा दिली त्याच भागात त्याला संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करावा लागेल.
 – प्रा. राजेश झाडे, चंद्र
पूर

राजकारण्यांचा अज्ञानमूलक स्वार्थ
सध्या रामदेवबाबांच्या ‘पुत्रजीवक बीज’नामक आयुर्वेदिक औषधावरून भारतातील राजकारणी गोंधळ घालत आहेत. आपटे आणि मोनियर-विल्यम्स यांच्या संस्कृत शब्दकोशांमध्ये ‘पुत्र’ या शब्दाचा ‘मुलगा’ या अर्थाव्यतिरिक्त पुढीलप्रमाणे अर्थ सापडतात. पुत्र = मुलगा, मूल किंवा प्राण्याचे पिल्लू. हा शब्द एकवचनी, द्विवचनी, बहुवचनी संबोधनात बऱ्याचदा लहान मुलांना उद्देशून वापरला जातो. पुत्र (एकवचन) = मूल, पुत्रौ (द्विवचन) = मुलगा आणि मुलगी, पुत्रा: (बहुवचन) = मुले. पुत्रजीव = मुलाला जीवन (जन्म) देणे.
पुत्रजीवक हे आयुर्वेदिक वनौषधीचे पारंपरिक शास्त्रीय नाव असून अनेक आयुर्वेदिक कंपन्यांच्या संकेतस्थळावर तिचा उल्लेख आढळतो. ती वनौषधी पुत्रजीव वनस्पतीच्या बियांपासून बनवलेली असते. त्या वनस्पतीचे इंग्रजीमधील आधुनिक शास्त्रीय नाव पुत्रन्जीव रॉक्सबर्घी असे आहे. अशी सर्व पाश्र्वभूमी पाहता निदान या बाबतीत तरी रामदेवबाबांवर दोषारोप करण्यामागे राजकारण्यांचा अज्ञानमूलक स्वार्थ याशिवाय अन्य कुठलेही कारण दिसून येत नाही.
अर्थात ‘धर्म’ या संस्कृत शब्दाचा ‘रीलिजन’ असा इंग्रजांनी अज्ञानातून लावलेला चुकीचा अर्थ शिरोधार्य मानून भारतीय सेक्युलर मंडळींनी राजकीय स्वार्थासाठी गेल्या ५० वर्षांत जो गोंधळ घातला आहे, त्यामानाने ही गोष्ट किरकोळच म्हणायला हवी.
 – सलील कुळकर्णी, पुणे

सुटीत मुलांनी  शिक्षकांसोबत नव्हे, तर पालकांसोबत राहणेच योग्य
‘शाळा १५ एप्रिल ते ५ मेदरम्यान बंद का?’ या बातमीमध्ये (२९ एप्रिल) एकतर्फी विचार केल्याचे जाणवते. परीक्षा संपल्यानंतर निकालाचे काम अचूकरीत्या पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना वेळ द्यावाच लागतो. अजूनही जुन्याच पद्धतीने म्हणजेच संगणकाचा वापर न करताच मूल्यमापनाचे तपशील ठेवावे लागत असल्याने शिक्षकांसाठीदेखील ही प्रक्रिया वेळखाऊ आहे. अशा वेळी परीक्षा संपल्यानंतरही मुलांना जर शाळेतच विविध उपक्रमांद्वारे थांबवून ठेवायचे असेल, तर अधिक मनुष्यबळाची तसेच तितक्याच उपयुक्त उपक्रमांची गरज आहे. इथे शिक्षकांनीच मूल्यमापनाबरोबरच उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांकडेही लक्ष द्यावे, अशी अपेक्षा ठेवणे म्हणजे शिक्षकांवरील कामाचा भार वाढून मूल्यमापनाच्या अचूकतेवर परिणाम होण्याला आमंत्रण देण्यासारखे होईल.
आजकालच्या पालकांना मुलांना देण्यासाठी पुरेसा वेळ नसतो.  वर्षभर शाळा व खासगी शिकवण्यांमधून मुलांना कुटुंबासोबत वेळ मिळत नाही. हे सुट्टीचे दिवस मुलांनी विविध उन्हाळी शिबिरे, सहली आणि इतर उपक्रमांद्वारे जरूर उपयोगात आणावेत; पण शिक्षकांसोबत नव्हे, तर पालकांसोबत.
 – स्नेहल चव्हाण

दोन संकल्पनांची सरमिसळ !
‘३१ ऑगस्टला सर्वात उंच लाट’ ही बातमी (१ मे) आणि त्यासंबंधीचे (लोकमानस, २ मे) वाचले. यासंबंधी काही माहिती स्पष्ट करू इच्छितो.
बातमी देताना उच्चतम भरतीची पातळी (Highest high tide level) व लाटेची उंची (Wave height) या दोन संकल्पनांची सरमिसळ झाली आहे. ३१ ऑगस्ट रोजी उच्चतम भरतीची पातळी ४.८७ मी. असणार आहे, लाटेची उंची नव्हे.
भरतीची पातळी ही चंद्राच्या आकर्षणाचा परिणाम असून ती अचूक व्यक्त करता येते, पण लाटेची उंची ही वातावरणातील इतर घटक, जसे वाऱ्याचा वेग, वादळी हवामान, कमी दाबाचा पट्टा इत्यादी घटकांवर अवलंबून असते व तारीखवार वर्तविणे शक्य नाही. चक्रीवादळाच्या वेळी लाटांची उंची प्रसिद्ध केली जाते आणि ती एक तात्कालिक घटना असते.
 – हेमंत देव, मुलुंड (मुंबई)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2015 12:16 pm

Web Title: reduce workload over cops
Next Stories
1 आत्ममग्न मध्यमवर्ग आपली जबाबदारीच विसरलाय!
2 ‘कोणी न ऐकती कानी’
3 बुद्धिझम विरुद्ध ब्राह्मिनिझम हा संघर्ष कपोलकल्पित
Just Now!
X