आंध्र प्रदेश व तेलंगणात सध्या गाजत असलेल्या लाच प्रकरणामुळे एक वर्षांपूर्वी झालेली विभाजनाची जखम वर्षपूर्तीनंतरही भळभळती आहे, हेच दिसते. आंध्र प्रदेशातील आमदाराला लाच देण्यावरून दोन राज्यांत सुरू झालेल्या या वादाला प्रादेशिक पक्षात नेहमी सुरू राहणाऱ्या वर्चस्वाच्या लढाईचीही किनार आहे. ही दोन्ही राज्ये स्वतंत्र असली तरी त्यांचा कारभार हैदराबाद या एकाच शहरातून सुरू आहे. सध्या या राजधानीतील कायदा व सुव्यवस्थेवर राज्यपालांचे नियंत्रण आहे. अशा स्थितीत तेलंगणाच्या पोलिसांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत एका अपक्ष आमदाराचे मत बाजूने वळवण्यासाठी ५० लाखांची लाच देताना तेलुगू देसमच्या आमदाराला पकडले. हे आमदार रेवंती रेड्डी चंद्राबाबू नायडूंच्या मर्जीतील आहेत. ज्या स्टीफन नावाच्या तेलंगणच्या आमदाराला लाच देण्यात आली, त्याच्याशी स्वत: चंद्राबाबू बोलले व हे संभाषण पोलिसांनी रेकॉर्ड केले. हा झाला कारवाईचा भाग. खरे राजकारण यानंतर सुरू झाले. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या मालकीच्या टी न्यूज या वृत्तवाहिनीवर हे संभाषण प्रसारित करण्यात आले. यावरून राजकीय वर्तुळात जो गदारोळ सुरू झाला तो तेलंगण राष्ट्रसमिती व तेलुगू देसम या दोन पक्षांतील वर्चस्वाची लढाई कोणत्या थराला गेली आहे, हेच दर्शवणारा आहे. विभाजनानंतर तेलंगणात सत्तेत आलेल्या राष्ट्रसमितीने काही महिन्यांपूर्वीच तेलुगू देसमचे पाच आमदार फोडले. के. चंद्रशेखर राव यांना काहीही करून तेलंगणातून तेलुगू देसमचे अस्तित्व संपवायचे आहे, तर विभाजनाला विरोध करून आंध्रात सत्ता मिळवणाऱ्या चंद्राबाबूंना पुन्हा तेलंगणात पाय रोवायचे आहेत. सध्या मरगळलेल्या अवस्थेतील काँग्रेस चालेल, फारसा प्रभाव नसलेला भाजप चालेल, पण तेलुगू अस्मिता असलेला दुसरा प्रादेशिक पक्ष नको, ही चंद्रशेखर रावांची भूमिका आहे, तर तेलुगू भाषिक दोन्ही राज्यांवर तेलुगू देसमचे वर्चस्व चंद्राबाबूंना निर्माण करायचे आहे. यातून हा लाचेचा वाद उद्भवला आहे. मुख्य म्हणजे, या वादात भाजप वा काँग्रेसने उडी न घेता हे राष्ट्रीय पक्ष ही प्रादेशिक लढाई दुरूनच बघत आहेत. या लाच प्रकरणात चंद्राबाबूंनाही आरोपी केले जाऊ शकते, हे लक्षात येताच देसम समर्थकांनी आंध्रातील अनेक शहरांत चंद्रशेखर रावांविरुद्ध पोलिसांकडे तक्रारी करण्याचा सपाटा सुरू केला. त्यावरून काही ठिकाणी गुन्हेही दाखल झाले. मुख्यमंत्री चंद्राबाबूंचा फोन टॅप करण्याचा अधिकार तेलंगणला कसा, असा देसमचा सवाल आहे, तर अपक्ष आमदाराच्या तक्रारीवरून पोलिसांनी हे केले, यात सरकारचा संबंध नाही, अशी राष्ट्रसमितीची भूमिका आहे. या लाच प्रकरणातील देसमचे आमदार रेवंती रेड्डी यांनी गेल्या वर्षभरापासून चंद्रशेखर रावांवर टीकेची झोड उठवली होती. आक्रमक विरोधक असलेल्या या आमदाराला जाणीवपूर्वक अडकवण्यात आले, असा देसमचा आक्षेप आहे. हे लाच प्रकरण आता उद्भवले असले तरी राष्ट्रसमिती व देसममध्ये विभाजनापासूनच वाद सुरू आहेत. यामुळेच प्रशासकीय यंत्रणेचे विभाजन अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही. आंध्रची राजधानी विजयवाडाजवळ निर्माण होणार असली तरी हैदराबादवर पाणी सोडायला चंद्राबाबू अजूनही तयार नाहीत. या पाश्र्वभूमीवर एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या या दोन नेत्यांनी आता कुरघोडीचे राजकारण सुरू केले आहे. निवडणुकीतील अर्थकारणात ही दाक्षिणात्य राज्ये अग्रेसर राहिली आहेत. त्यातून हा लाचेचा वाद उद्भवला आहे. त्यात तेलंगण पोलिसांनी चंद्राबाबूंना अटक केलीच, तर नेहमी भावनेच्या लाटेवर खेळणाऱ्या या दोन राज्यांतील संघर्ष टिपेला जाईल, यात शंका नाही.