24 January 2020

News Flash

१६७. धर्मसंस्कार

गेले काही भाग आपण स्वामी स्वरूपानंद संकलित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील ३४व्या ओवीचं विवरण पहात होतो. ती ओवी अशी : ‘‘हे ऐसें असें स्वभावें। म्हणौनि कर्म न

| August 26, 2014 01:51 am

गेले काही भाग आपण स्वामी स्वरूपानंद संकलित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील ३४व्या ओवीचं विवरण पहात होतो. ती ओवी अशी : ‘‘हे ऐसें असें स्वभावें। म्हणौनि कर्म न संडावें। विशेषें आचरावें। लागे संतीं।।’’ सारांश, कर्म कुणालाच सुटत नाहीत. संतही कर्म करतात, मात्र ती जिवांना कर्माच्या गुंत्यातून सोडवणारी विशेष र्कम असतात! या आधीच्या म्हणजे ‘नित्यपाठा’तील ३३व्या ओवीचा आपण मागोवा घेतला नाही, मात्र आता तिचा अर्थ नीट पोहोचेल. ती ओवी अशी : ‘‘एथ वडील जें जें करिती। तया नाम धर्म ठेविती। तें चि येर अनुष्ठिती। सामान्य सकळ।। ’’(ज्ञानेश्वरी अ.३, ओवी १५). म्हणजे संत-सत्पुरुष जे आचरण करतात तेच धारण करण्यायोग्य आहे, अनुसरण्यायोग्य आहे, या भावनेनं सर्वसामान्य साधक त्यानुसार कृतीचा प्रयत्न करतात. (मग पुढील ३४वी ओवी सांगते की, म्हणून कार्य सोडू नये. संत तर विशेष कर्मे पार पाडतात.) आता सत्पुरुषांच्या कोणत्या गोष्टीचं सर्वसामान्य साधक अनुकरण करतो? त्यांच्यासारखी वस्त्रं घालणं, त्यांच्यासारखं गंध लावणं, त्यांच्यासारखी तुळशीमाळ घालणं; अशा बाह्य़ गोष्टींचं अनुकरण इथे अभिप्रेत नाही. भगवद्भावानं सदोदित व्याप्त असणं, स्वयानंदानं पूर्ण आत्मतृप्त असणं, स्वयाधारानं पूर्ण निर्भय असणं; या त्यांच्या आंतरिक स्थितीचं अनुकरणही कुणी करू शकत नाही. मग इथे कोणतं आचरण अभिप्रेत आहे? तर ते प्रापंचिकच आहे. माझं जीवन मी कसं जगावं, जीवनातल्या अडचणींना मी कसं सामोरं जावं, याबाबत सत्पुरुष जे सांगतात ते आचरणात आणण्याचा माझा प्रयत्न असतो. ते त्यांच्या जीवनात अडचणींना कसं सामोरं जातात, ते त्यांचं जीवन कसं सहजतेनं जगतात हे मला अनेक प्रसंगातून उमगत असतं. तसं जगणं हेच सर्वसामान्य साधक आदर्शवत् मानतो. अर्थात त्यानुसार तो आचरण करण्याचा प्रयत्न करतो. आता हे आचरण त्यांच्या कृपेशिवाय साधत नाही, हे खरं. तरी तेदेखील मला जगण्याची ती कला त्यांच्या बोधातून शिकवू पाहतात. सत्पुरुषांचा बोध हा सार्वत्रिक असतोच, पण तो व्यक्तिसापेक्षही असतो. गृहस्थाला, साधकाला, गृहस्थ साधकाला, शिष्याला, सुहृदाला, योग्याला, तपस्व्याला, विद्यार्थ्यांना ते जेव्हा बोध करतात तेव्हा तो बोध कशाचा असतो? गृहस्थाला गृहस्थाश्रम धर्माचा बोध असतो, साधकाला साधकधर्माचा बोध असतो, गृहस्थ साधकाला प्रपंच आणि परमार्थ यांचं वास्तव स्वरूप जाणून घेऊन परमार्थाच्या ‘सुदूर’ ध्येयाकडे अग्रेसर करणारा बोध असतो, शिष्याला शिष्यधर्माचा, सेवकाला सेवाधर्माचा, सुहृदाला मित्रधर्माचा, योग्याला योगधर्माचा, तपस्व्याला तपोधर्माचा, विद्यार्थ्यांला विद्यार्थी धर्माचा बोध ते करतात. हे वर्गीकरण स्वामी स्वरूपानंद यांचं चरित्र डोळ्यापुढे ठेवूनच केलं आहे बरं! या प्रत्येकानं स्वामींची भेट घेतली आणि त्या प्रत्येकाच्या पायरीनुसार, आकलन क्षमतेनुसार, साधनक्षमतेनुसार स्वामींनी त्यांच्याशी जे आत्मीय वर्तन केलं आणि खऱ्या ध्येयाचा सूक्ष्म संस्कार त्यांच्यावर केला तो डोळ्यासमोर आणा!

First Published on August 26, 2014 1:51 am

Web Title: religious cultures
टॅग God
Next Stories
1 तेल-निरक्षरांची ‘रॅली’बाजी!
2 टँकरवाडय़ाच्या नावानं चांगभलं!
3 लोभस मि. डार्लिग
Just Now!
X